सांख्य-योग दर्शनांमध्ये पुरुष आणि प्रकृती ही दोन सर्वव्यापी आणि नित्य तत्त्वे आहेत. पुरुष म्हणजे चेतनतत्त्व आणि प्रकृति म्हणजे जडतत्त्व असे सामान्यरूपाने म्हणता येऊ शकते. ‘प्रकर्षेण करोति इति प्रकृति:’ अर्थात् जे (सृष्टीतील पुरुषाव्यतिरिक्त सर्व अन्य तत्त्वांना) उत्पन्न करते, ते तत्त्व म्हणजे प्रकृती होय. सांख्यदर्शनानुसार सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण जेव्हा साम्यावस्थेत असतात, त्या अवस्थेलाच प्रकृती हे नाव आहे (सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था प्रकृति:| सांख्यसूत्र १.६१). संस्कृतमधील ‘गुण’ या शब्दाचा अर्थ दुय्यम, गौण असा आहे. सत्त्व, रज आणि तम यांपैकी प्रत्येक गुण ‘गौण’ आहे. परंतु, या तीनही गुणांचा एकत्रित समन्वय असणारी प्रकृती त्यांच्या तुलनेने मुख्य असल्यामुळे तिला ‘प्रधान’ असेही म्हणतात. प्रकृती ही त्रिगुणांची साम्यावस्था वस्तुत: सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि प्रलयानंतर असते; पुरुषाच्या संयोगामुळे त्रिगुण क्रियाशील होतात व त्यांमध्ये विषमता उत्पन्न होऊन त्यापासून २३ तत्त्वे उत्पन्न होतात. परंतु, सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार कारण हे सूक्ष्मरूपाने कार्यात विद्यमान असते, त्यामुळे प्रकृतीदेखील २३ तत्त्वांमध्ये सूक्ष्मरूपाने आहे, असे मानले जाते.

प्रकृतीला मूलप्रकृती, अहेतुमत्, प्रधान, अव्यक्त अशीही नावे आहेत. महत् इत्यादी २३ तत्त्वांची उत्पत्ती तिच्यापासून होते, म्हणून ती मूलप्रकृती होय. तिच्या उत्पत्तीला दुसरे कारण, हेतु नसल्यामुळे तिला अहेतुमत् म्हटले आहे. इंद्रियांना न दिसणारी असल्यामुळे तिला अव्यक्त म्हटले आहे. तसेच प्रलयकाली महत् इत्यादी २३ तत्त्वे तिच्यातच विलीन होत असल्यामुळे तिला ‘प्रधान’ अशीही संज्ञा आहे. (प्रकर्षेण धीयते स्थाप्यते अत्र अखिलम् इति प्रधानम्| – सगळे जग प्रलयकाली जिच्यात संपूर्णत: ठेवले जाते ते  प्रधान होय.)

आ. १.

प्रकृती या संकल्पनेचा उगम श्वेताश्वतर  उपनिषदात आढळतो (४.५ व ४.१०). या उपनिषदात प्रकृतीला ‘अजा’ म्हणजे कोणापासूनही जन्माला न आलेली असे म्हटले आहे. प्रकृती ही अनादि आणि सर्वांचे मूळ कारण असल्यामुळे तिला उत्पन्न करणारे दुसरे कारण नाही. ‘अव्यक्त’ अशा या प्रकृतीपासून सर्व ‘व्यक्त’ पदार्थ निर्माण होतात. सांख्यदर्शनानुसार प्रकृतीपासून अन्य २३ व्यक्त तत्त्वांची उत्पत्ती खालीलप्रमाणे होते (आ. १) –

या तत्त्वांपैकी पंचमहाभूते ही स्थूल म्हणजे इंद्रियांना दिसणारी असून बुद्धी, अहंकार, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व तन्मात्र ही व्यक्त तत्त्वे असली तरी सूक्ष्म अर्थात् इंद्रियांना न दिसणारी आहेत. प्रकृती अचेतन असून तिच्यातून सारे विश्व विशिष्ट प्रक्रियेने उत्क्रांत झाले आहे. ती जड, प्रसवधर्मी, त्रिगुणात्मिका आहे. सांख्यमतानुसार तिला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे.

प्रकृतीचे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे होऊ शकत नाही, त्यामुळे तिचे अस्तित्व अनुमानाने सिद्ध करण्यासाठी सांख्यतत्त्वज्ञान पुढीलप्रकारे कारणमीमांसा करते –

(१) भेदांना परिमाणात् : सृष्टीतील विविध वस्तू परिमित म्हणजे मर्यादा असलेल्या आणि दुसऱ्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, फुलांचा हार हा त्याचे कारण असलेल्या माळ्यावर अवलंबून असतो. फुलेसुद्धा रोपट्यावर अवलंबून असतात व रोपटे मातीवर अवलंबून असते. शिवाय हा तयार झालेला हार अर्थ म्हणजे त्याचे प्रयोजन आणि स्वरूपासाठीही परावलंबी असतो. हाराचे प्रयोजन लक्षात घेण्यासाठी मूर्तीचा विचार केला पाहिजे व मूर्ती शिवाची आहे की विष्णूची यावर हारात तुळस असावी की नाही हे ठरेल आणि मूर्तीचे प्रयोजन लक्षात घेण्यासाठी भक्तीचे आकलन व्हायला पाहिजे. जे जे परिमित आहे ते ते पराधीन आहे. जे जे पराधीन आहे ते ते शेवटी कोणत्यातरी एका स्वाधीन तत्त्वावर अवलंबून असणार. सर्व सीमित पदार्थांचे कारण कोणते तरी असीमित तत्त्व असले पाहिजे. ते तत्त्व म्हणजे प्रकृती होय. ती पूर्णपणे स्वतंत्र असते. आपल्या क्रियाकलापासाठी ती कोणावरही व कशावरही अवलंबून नाही.

(२) समन्वयात् : या सृष्टीमधील सर्व वस्तूंमध्ये काही ना काही साम्य आढळते. प्रत्येक मनुष्य वेगळा असला तरी त्या सगळ्यांमध्ये मानवजात ही समानता आहे. बुद्धी इत्यादी तत्त्वांमध्येही सुख-दु:ख, मोहात्मकता हे साम्य आहे. सर्व वस्तू त्रिगुणात्मक आहेत, चेतन पुरुषाच्या उपभोगासाठी आहेत इत्यादी. अशा रीतीने भिन्न वस्तूंतही समन्वय आहे. सर्व पदार्थांमध्ये समन्वय (समानता) दिसत असल्यामुळे असे म्हणता येते की सर्व पदार्थ एकाच कारणापासून उत्पन्न झाले असले पाहिजेत. ते कारण म्हणजे प्रकृती होय, असे अनुमान करता येते.

(३) शक्तित: प्रवृत्ते: कोणतीही वस्तू उत्पन्न होते तेव्हा तिला उत्पन्न करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कारणांमध्ये विशिष्ट शक्ती असते. सृष्टीमधील २३ तत्त्वांना उत्पन्न करण्याची शक्ती ज्या मूळ कारणामध्ये आहे त्या कारणालाच प्रकृती म्हटले जाते.

(४) कारण-कार्य-विभागात् : प्रकृतीला सृष्टीचे कारण न मानता २३ व्यक्त तत्त्वेच एकमेकांना उत्पन्न करतात, असे मानणे अयोग्य ठरते. कारण त्या तत्त्वांमध्ये ती शक्ती नाही. त्या सगळ्यांचे, जे कार्यकारणभावाची शृंखला पेलून धरते असे एक मूळ कारण असले पाहिजे आणि ते स्वत: कशाचेही कार्य नसले पाहिजे, म्हणजेच ते कारणविरहित असले पाहिजे असे आदिकारण म्हणजे प्रकृती होय.

(५) अविभागात् वैश्वरूप्यस्य : प्रकृती आणि तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या २३ तत्त्वांमध्ये भेद असला तरीही उत्पत्तीपूर्वी आणि प्रलयानंतर त्यांमध्ये भिन्नता नाही. सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसारही कारण आणि कार्य हे एकरूप असतात.

प्रकृतीची अन्य वैशिष्ट्ये संक्षेपाने अशी सांगता  येतील —

प्रकृतीच्या ठिकाणी आपण पुरुषाहून भिन्न असल्याची जाणीव म्हणजे विवेक नसतो. तिच्यामध्ये प्रसवक्षमता, परिवर्तन पावण्याचा धर्म (परिणामी असणे), पुरुषाच्या ज्ञानाचा विषय असणे आणि सामान्यत्व हे विशेष आढळतात. पुरुष अनेक असले तरी त्या सगळ्यांसाठी प्रकृती एकच असल्याने त्यांना एकच समान प्रकृती तत्त्व मुक्तीसाठी प्रवृत्त करते. प्रत्येक पुरुषासाठी स्वतंत्र प्रकृती नसते.

सृष्टिनिर्मितीचे कार्य प्रकृतीचेच असले आणि ‘पुरुष’ ‘अकर्ता’ असला तरी प्रकृती त्याच्या उपभोगासाठी आणि नंतर त्याच्या अपवर्गासाठी कार्यरत असते. पुरुष (आत्मा) जन्म-मृत्यूच्या बंधनात आहे व त्याला मोक्ष मिळतो असे सामान्यरूपाने जरी समजले जात असले तरी वस्तुत: आत्मा अपरिणामी (ज्यामध्ये परिवर्तन होत नाही) असा असल्यामुळे बंधन आणि मोक्ष हे प्रकृतीसाठीच आहेत. (तस्मान्न बध्यते नापि मुच्यते नापि संसरति कश्चित्| संसरति बध्यते मुच्यते च नानाश्रया प्रकृति:|| सांख्यकारिका ६२).

सेवकांचा जय झाला म्हणजे स्वामी विजयी झाला असे मानले जाते. त्याप्रमाणे भोग आणि मोक्ष हे वस्तुत: प्रकृतीचे असले तरी ते दोन्ही पुरुषाचे ठिकाणी राहतात असे म्हणण्याचा प्रघात आहे. धर्म, अधर्म, ऐश्वर्य, अनैश्वर्य, वैराग्य, अवैराग्य व अज्ञान अशा सात गोष्टींनी (भावांनी) प्रकृती ही पुरुषाच्या भोगासाठी आपणच स्वत:स संसारात बद्ध करते आणि स्वत:च स्वत:ला मुक्त करते. म्हणजेच पुरुषाला भोग व अपवर्ग देण्यापासून निवृत्त होते.

वेदान्तातील विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत तसेच शैवसिद्धान्त, वीरशैव इत्यादी मतांत प्रकृतीचे अस्तित्व मानले असले तरी ते प्रकृतीला सांख्यांप्रमाणे स्वतंत्र तत्त्व मानत नाहीत आणि तिला परमेश्वराची शक्ती असा दुय्यम दर्जा देतात. सांख्यमतानुसार प्रकृती एक स्वतंत्र तत्त्व आहे.

संदर्भ :

  • करंबेळकर, विनायक, सांख्य-कारिका, रामकृष्ण मठ, नागपूर, २०१४.
  • रस्तोगीलीना, साङ्ख्यतत्त्वदीपिका, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, २०१०.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर