ॲनॅटिडी या पाणपक्ष्यांच्या कुलातील ॲन्सरिनी या उपकुलाच्या सिग्नस प्रजातीतील पक्ष्यांना राजहंस म्हणतात. जगभरात राजहंस पक्ष्याच्या ६–७ जाती आढळतात. प्रामुख्याने तो समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या चार जाती उत्तर गोलार्धात, एक जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे, तर एक जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. मात्र आशिया, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग व आफ्रिका खंड यांसारख्या उष्ण प्रदेशांत तो निवासी नाही. ॲनॅटिडी कुलामध्ये व इतर सर्व  पाणपक्ष्यांमध्ये राजहंस हा आकाराने सर्वांत मोठा व वजनाने जास्त असतो; इतर कोणताही पक्षी त्याच्याइतक्या वेगाने लांब अंतर पोहू किंवा उडू शकत नाही.

राजहंसाची डौलदार लांब मान, निमुळते परंतु मजबूत शरीर व शरीराच्या मागील बाजूस असलेले मोठे पाय ही त्याची लक्षणे आहेत. इतर पाणपक्ष्यांप्रमाणे त्याच्या पायांच्या बोटांमध्ये पडदा असून त्याचा उपयोग पोहताना होतो. चोच मोठी व चपटी असून वेगवेगळ्या जातींमध्ये चोचीच्या रंगांमध्ये बदल दिसून येतात. या पक्ष्यांना दात नसतात; परंतु चोचीला करवतीसारख्या कडा असतात. काही राजहंसांच्या चोचीच्या बुडाशी मोठी मांसल गोळीसारखी वाढ असते. राजहंस संथ परंतु डौलदारपणे पोहतो. तो सावकाशपणे पंख वरखाली करत व आपल्या लांब मानेला पूर्ण ताण देत उडत राहतो. दीर्घ अंतर पार करत तो जास्त उंचीवर जातो व थव्याने इंग्रजी ‘V’ आकारात उड्डाण करत राहतो.

राजहंस प्रामुख्याने शाकाहारी आहे. तो आपले अन्न पाण्यात व जमिनीवर मिळवितो.  पाणवनस्पती हे त्याचे मुख्य अन्न असून तो पाण्यात बुडी न मारता आपले अन्न खेचून वर काढतो. त्याच्या अन्नात पाणवनस्पतीची मुळे, कंद, खोड व पाने इत्यादींचा समावेश असतो. पिल्ले लहान असताना प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी ती पाण्यातील कीटक खातात. ४–६ आठवड्यांनंतर त्यांचा आहार प्रौढ राजहंसाप्रमाणे पूर्णपणे शाकाहारी होतो. पाळलेले राजहंस तृणधान्ये व गवताचे बी देखील खातात.

सामान्यत: राजहंसाचे मोठे थवे आढळतात. प्रजननकाळात मात्र नरमादीच्या जोड्या आढळतात. त्यांच्या जोड्या जन्मभर टिकतात. साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर ते घरटे बांधायला सुरुवात करतात. पाणवनस्पती, गवत, पानांचा ढिगारा आदींचा वापर करून ते उंचवट्यावर घरटे बांधतात. घरट्याच्या सभोवताली २०–३० फूट लांबीचा मोठा पाण्याने भरलेला खळगा असेल, हे पाहिले जाते. ज्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळते. घरट्याच्या आतील बाजूस अतिशय मऊ पिसांचे आच्छादन असते. मादी एकावेळी ६–८ फिक्कट पिवळ्या रंगाची अंडी घालते. ती अंडी उबवत असताना नर तिचे व अंड्यांचे रक्षण करतो. कधीकधी नर देखील अंडी उबविण्यास मदत करतो. पिल्ले ३२–४५ दिवसांनी अंड्यांतून बाहेर येतात. त्यांचा रंग फिक्कट तपकिरी किंवा फिक्कट करडा असतो. त्यांची मान आखूड असून अंगावर मऊ व लवदार पिसे असतात. जन्मल्यानंतर काही तासांत पिल्ले पोहू व उडू शकतात. काही जातींमध्ये पिल्ले मोठी होईपर्यंत मादी पोहताना त्यांना आपल्या पाठीवर घेते. तिसऱ्या ते चौथ्या वर्षी राजहंस प्रौढ होतो. नैसर्गिक परिस्थितीत राजहंस २०–३० वर्षे, तर पाळल्यास सु. ५० वर्षांपर्यंत जगतो.

मूक राजहंस (सि. ओलोर)

भारतात सिग्नस ओलोर या जातीचा राजहंस बहुतकरून दिसून येतो. तो राजहंस स्थलांतरित असून  इतर राजहंसांच्या तुलनेत कमी आवाज काढतो म्हणून त्याला मूक राजहंस म्हणतात. ही जाती यूरोप, दक्षिण रशिया, चीन व रशियाच्या सागरी भागांत आढळते. तिची लांबी १२५—१७० सेंमी. असून पंखांची व्याप्ती २००—२४० सेंमी. असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून मादी नरापेक्षा लहान असते. नराचे वजन ९–१४ किग्रॅ. तर मादीचे ७–१० किग्रॅ. असते. ही जाती पूर्णपणे पांढरी शुभ्र असते. तिच्या मानेला किंचित बाक असतो. चोच नारिंगी असून चोचीच्या टोकाचा काही भाग काळा असतो. चोचीच्या वरच्या बाजूस असलेल्या गाठीसारख्या भागामुळे तो पटकन ओळखता येतो. नरामध्ये ही गाठ मोठी असते. या जातीला मूक म्हणत असले तरी ती फिस्कारल्यासारखा, रेकल्यासारखा, कर्कश शीळ मारल्यासारखा आवाज काढू शकते.

शीळ घालणारा राजहंस (सि. कोलंबियानस)

राजहंस निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढतात. त्या आवाजावरून त्यांना ट्रम्पेटर (तुतारी/बिगुल फुंकल्यासारखा आवाज असणारा), व्हूपर (खोकणारा) व व्हिसलिंग (शीळ घालणारा) अशी नावे पडली आहेत.

ट्रम्पेटर राजहंस : (सिग्नस बक्सिनेटर). ही जाती उत्तर अमेरिकेत आढळते. सर्व राजहंसांमध्ये ती आकाराने व वजनाने मोठी असते. तिच्या शरीराचा रंग पांढरा शुभ्र असून चोच काळी असते. तिच्या पसरलेल्या पंखांचा विस्तार सु. ३ मी.पेक्षा जास्त असू शकतो. तिची मान बाकदार नसून सरळ असते.

व्हूपर राजहंस (सि. सिग्नस)

 

 

 

व्हूपर राजहंस : (सिग्नस सिग्नस). ही जाती सामान्यपणे यूरोपात आढळते व ती ट्रम्पेटर राजहंसाला जवळची मानली जाते. ती आकाराने व वजनाने ट्रम्पेटर राजहंसाच्या खालोखाल असते. तिच्या चोचीमध्ये पिवळा व काळा रंग असून पिवळा रंग अधिक भागात असतो.

व्हिसलिंग राजहंस : (सिग्नस कोलंबियानस). ही जाती टुंड्रा प्रदेशात आढळते. ही जाती आकाराने लहान असून तिचा रंग पांढरा शुभ्र असतो. तिच्या चोचीचा रंग काळा असून चोचीचा काही भाग पिवळा असतो आणि चोचीचे भाग जुळतात तेथे गुलाबी रेषा तयार झालेली असते.

काळा राजहंस : (सिग्नस अट्रॅटस). ही जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांत आढळते. या जातीचा रंग पूर्ण काळा असून मान सर्व राजहसांमध्ये लांब असते आणि इंग्रजी S या आकारात वळलेली असते.

सिग्नस मेलॅंकोरिफस : ही जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. तिचा रंग पांढरा शुभ्र असून मान व डोके यांचा भाग काळा असतो, तर चोच राखाडी रंगाची असते.

मूक राजहंस आणि शीळ घालणारा राजहंस या दोन्ही जाती भारतात उन्हाळी पाहुणे म्हणून येतात. शीळ घालणारा राजहंस दिल्ली आणि कच्छ भागात तर मूक राजहंस सिंधू नदीच्या काठी पंजाबमध्ये आढळतो.

राजहंस पक्षी अंशत: किंवा पूर्णपणे स्थलांतर करतात. पश्चिम यूरोपमधील मूक राजहंस अंशत: तर पूर्व यूरोप व आशियातील मूक राजहंस पूर्णपणे स्थलांतर करतात. व्हूपर राजहंस व व्हिसलिंग राजहंस देखील पूर्णपणे स्थलांतर करतात.

व्हूपर राजहंस फिनलँड देशाचा, तर मूक राजहंस डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. राजहंस हा प्रेमाचा व विश्वासाचा प्रतीक मानला जातो. कारण नर व मादी जन्मभर सोबत राहतात. राजहंसाच्या सौंदर्यामुळे आणि डौलदारपणामुळे त्याला अनेक संस्कृतींमध्ये व विविध धर्मांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.

 

 

 

This Post Has 2 Comments

  1. Nitin Belwankar

    अभिनंदन
    उपयुक्त माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा