सुरण (ॲमॉर्फोफॅलस पिओनिआयफोलियस) : (१) वनस्पती, (२) फुलोरा, (३) कंद (गड्डा).

(एलिफंट फूट यॅम). एक कंदयुक्त खाद्य वनस्पती. सुरण ही वनस्पती अरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲमॉर्फोफॅलस कँपॅन्यूलेटस किंवा ॲमॉर्फोफॅलस पिओनिआयफोलियस आहे. तिचे मूळस्थान भारत आणि श्रीलंका हे देश असून ती या देशांमध्ये पिकविली जाते. ॲमॉर्फोफॅलस प्रजातीच्या एकूण २०० जाती असून त्यांपैकी १४ जाती भारतात आढळतात. सुरण त्यांपैकी एक आहे. सुरणाच्या सर्वच जाती आफ्रिका आणि आशिया खंडातील उष्ण प्रदेशात वन्य स्वरूपात किंवा लागवडीखाली आहेत.

सुरणाच्या कंदाला गड्डा म्हणतात. हा गड्डा म्हणजे अन्नसंचयामुळे मोठ्या गाठीसारखे बनलेले खोड (घनकंद) असते. घनकंद जमिनीत असतो आणि तो गर्द तपकिरी, मोठा (३–९ किग्रॅ.), अर्धगोलाकार, वरच्या बाजूने खोलगट चपटा असून त्यावर लहान कळ्या म्हणजे मुकुल असतात. सुरणाचे मुकुल लागवडीसाठी वापरतात. दृढकंदावरील मुकुलातून एक पान आलेले असते. पानाचा देठ सु. १ मी. लांब, जाड, गर्द हिरव्या रंगाचा असतो आणि त्यावर फिकट ठिपके असतात. पान संयुक्त, मोठे, तीन भागांत, परंतु अपूर्ण विभागलेले असून पानाचे दल ५–१५ सेंमी. लांब, पसरट आणि पिसासारखे असते. फुलोरा स्थूल कणिश प्रकारचा असून त्याचा दांडा गोलसर, गर्द लालसर जांभळा आणि खंडित असतो. फुलोऱ्यावर सहपत्रांचे घंटेसारखे आवरण असून त्याची किनार दुमडलेली, रंग बाहेरून हिरवट गुलाबी तर आतून जांभळा असतो. फुलोऱ्यात नर-फुले व मादी-फुले वेगवेगळी असतात; मादी-फुले फुलोऱ्याच्या खालच्या बाजूला, तर नर-फुले वरच्या बाजूला असतात. फुलांतील स्राव दुर्गंधीयुक्त असतो. त्याकडे निळ्या, मोठ्या कॅरियन माश्या आकर्षित होतात आणि त्यांच्याद्वारे परागण होते. मृदुफळ लाल आणि आकाराने लंबगोल असून त्यात २-३ बिया असतात.

सुरणाच्या कंदाची आणि कोवळ्या देठांची भाजी करतात. कंदामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटिक असल्यामुळे कच्चा कंद खाजरा लागतो. तो काढून टाकण्यासाठी चिंच, आमसूल यांचा कोळ टाकून खाजरेपणा कमी करतात. सुरणाचा कंद दीपक, पौष्टिक, वायुसारक असून आमांश व मूळव्याध यांवर गुणकारी असतो.