एक भारतीय आदिवासी जमात. सिद्दी हे मुळचे आफ्रिका खंडातील आहेत. सुमारे ७५० वर्षांपूर्वी त्यांना पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून भारतात आणले असावे असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र काही सिद्दींना ते मान्य नाही. त्याशिवाय तुघलकांच्या फौजेतूनही ते भारतात आले असावेत असा अंदाज आहे. रेजिनॉल्ड एडवर्ड एन्थोव्हेन यांच्या मते, सिद्दी जमात राजकोट, जुनागड (गुजरात), धारवाड, उत्तर कन्नडा (कर्नाटक), आंध्र प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राच्या जंजिऱ्याच्या भागात वास्तव्यास आहेत. तसेच ते पाकिस्तानातही आढळतात. सिद्दींची भारतातील लोकसंख्या सुमारे ५० हजार आहे (२०२१).
सिद्दी या शब्दाचा शब्दशः अर्थ चंद्रास्त किंवा चंद्राची काळी अवस्था किंवा अमावस्या असा आहे. त्यांच्या शरीराच्या रंगावरून तसा अर्थ लावण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सिद्दी यांचा उल्लेख आंध्र प्रदेशात हाबशी किंवा जाशी; दीव-दमण भागात काफीर, गमथा किंवा गोमथा; कर्नाटकात सिदीज, काफरे किंवा हाबशी असा केला जातो. तसेच त्यांचा बादशा असाही काही ठिकाणी उल्लेख केला जातो.
सिद्दी जमात अनेक कुळांत विभागाला गेलेला आहे. गुजरातमध्ये त्यांची भोकुल, मोकवाना, परमेर किंवा परमार, मरी किंवा मोरी, चेटियारा, राजेका, बागीया, बागीस, सिरवाम, नोबी, वालीया ही कुळे असून त्यांचा उल्लेख ते आडनावासारखा करतात. गोवा, दीव-दमण भागांत सोळंकी, मकवाना, चौहान, मानसुरी अशी त्यांची कुळे आहेत. सिद्दी समाज हा मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू अशा तीनही धर्मांत विभागाला गेला आहे.
सिद्दी लोकांचा रंग, केस, नाक, ओठाची ठेवण ही दक्षिणपूर्व आफ्रिकेतील बांतू वंशाप्रमाणे आहे. परिस्थितीनुसार स्थानिकांप्रमाणेच स्त्रिया व पुरुषांचा पेहराव असतो. हे लोक हिंदी, गुजराती व उर्दू या भाषांसह स्थानिक भाषेचा आणि लिपीचा वापर करतात.
बहुतेक सिद्दी लोक भूमिहीन आहेत. फार थोडे लोक शेतीव्यवसायात आहेत. पूर्वी शिकार आणि कंदमुळे जमा करूनच त्यांची उपजीविका होत असे. काही सिद्दी निजामाचे शरीररक्षक म्हणून निजामांच्या सेवेत होते. घोड्यांना माणसाळवून प्रशिक्षण देण्यातही ते तरबेज होते. सध्या ते गुरेपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, शेतमजुरी, मोलमजुरी, गॅरेज, वाहतूक, रिक्षा, गाईड इत्यादी व्यवसायांसह शिक्षण घेऊन पोलीस, सैनिक व इतर सरकारी नोकऱ्यांमध्येही कार्यरत आहेत. सिद्दी स्त्रियाही आर्थिक व्यवहार आणि उपजीविकेसाठी व्यवसाय करतात; परंतु कौटुंबिक निर्णयात त्यांना फारसे स्थान नसते.
सिद्दी जमातीत जन्मानंतर सातव्या दिवशी बाळाचे बारसे केले जाते. मुस्लिम सिद्दी मुलांचा सुंता करतात. मुले-मुली वयात येताच त्यांचा विवाह केला जातो. त्यांच्यात बहुपत्नित्वाची चाल असून आते-मामे भावंडे, चुलत भावंडे, मामा-भाची यांच्यात विवाह होतात. सिद्दी लोक केवळ आपल्याच समुहामध्ये विवाह करतात. त्यामुळे आजही त्यांच्यात शारीरिक एकरूपता दिसून येते. विवाह वधूच्या घरी होतो. ‘काळी पुथ’ अथवा ‘लाटेला’ हा लग्नाचा दागिना अथवा खूण असून विवाहानंतर ते वधूच्या गळ्यात घातली जाते. सर्वमान्य विवाहाची खूण म्हणजे ‘थाळी’ हा प्रकार असतो; परंतु ख्रिश्चन सिद्दीत अंगठीच वापरतात. वधूमूल्य रोकड अथवा कामाच्या स्वरूपात दिली जाते. लग्न आणि भोजनाचा खर्च दोन्ही बाजुंकडून उचलला जातो. मृत पत्नीच्या धाकट्या बहिणीशी तसेच धाकट्या भावाच्या विधवा पत्नीशी विवाह होऊ शकतो. जमातीमध्ये विधवा अथवा घटस्फोटित महिलेला पुनर्विवाहाची परवानगी आहे. पूर्वी त्यांच्यात समाज पंचायत अस्तित्वात होती.
सिद्दी जमात वेगवेगळ्या राज्यांत विखुरला गेला असल्याने आणि तो मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू अशा धर्मांत विभागाला गेला असल्याने त्यांच्यावर त्या त्या ठिकाणच्या समाजाचा प्रभाव पडला. त्यामुळे हे लोक आजुबाजुच्या समजानुसार सणवार साजरे करतात. आफ्रिकन परंपरेचे काही सणवार त्यांच्यात दिसत नाहीत; परंतु आफ्रिकन पद्धतीचे ‘सुबू’ हे मूळ नृत्य त्यांच्यात आजही टिकून आहे.
सिद्दींमध्ये मृत्यूनंतर दहन किंवा दफन करतात. हे त्यांच्या त्या त्या धर्मानुसार होते; मात्र मृत्यूनंतर किमान तीन दिवस ते सुतक पाळतात. मुस्लिम सिद्दींचे दफन करताना चेहरा मक्केच्या दिशेने केला जातो. दफनाच्या तिसऱ्या, चाळीसाव्या दिवशी आणि एक वर्षानंतर काही विधी केले जातात. ‘अरफा’ हा पूर्वजांच्या नावाने केला जाणारा विधी आहे.
गुजरात सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात टुरिज्मसाठी बनविलेल्या खुशबू गुजरात की या लघुपटात सिद्दी लोकांना चित्रित केले.
संदर्भ :
- कुलकर्णी, शौनक, संस्कृती : निसर्ग आणि जीवनशैली, पुणे, २००७.
- Sing, K. S., India’s Communities, Vol. III, Delhi, 1997.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर