रोमन कॅथलिक चर्चमधील व्रतस्थांचा एक संघ. संत इग्नेशिअस लॉयोला पॅरिस विद्यापीठात असताना त्यांचा संत फ्रान्सिस झेव्हिअर व पीटर फेबर यांच्याशी संबंध येऊन ह्या तिघांनी पुढाकार घेऊन ‘येशूचे स्नेही’ (Society of Jesus) हा व्रतस्थ धर्मगुरूंचा संघ १५ ऑगस्ट १५३४ रोजी स्थापन केला. ह्या संघाच्या सभासदांना ‘जेज्वीट’ म्हणतात. ते आपल्या नावाच्या शेवटी ‘एस. जे.’ ही आद्याक्षरे लावतात. २७ सप्टेंबर १५४० रोजी तिसरे पोप पॉल यांनी ह्या संघास मान्यता दिली. ‘टू द ग्रेटर ग्लोरी ऑफ गॉड’ हे या संघाचे ब्रीदवाक्य आहे. इग्नेशिअस हे स्वत: लष्करप्रमुख असल्यामुळे त्यांनी या संघासाठी जी घटना लिहून काढली तिच्यामध्ये सैनिकी शिस्तीला व आज्ञाधारकपणाला प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीस तिचे स्वरूप काहीसे लष्करी पद्धतीचे होते. संघाचा सर्वोच्च पदाधिकारी हा संस्थेचा सर्वाधिकारी असतो. त्याची सत्ता अमर्याद व नेमणूक कायम स्वरूपाची असते. संघाची घटना त्याला योग्य न वाटल्यास प्रसंगी तो ती तात्पुरती स्थगित करू शकतो; तथापि ह्या घटनेत फेरबदल करण्याचे अधिकार मात्र त्याला नाहीत.

जेज्वीट संघाचे संस्थापक : संत इग्नेशिअस लॉयोला.

ह्या संघाच्या सभासदांना दोन वर्षे उमेदवारी केल्यानंतर पुढील चार व्रते स्वीकारून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागते : १) निष्कांचन वा साधेपणा, २) शुचिता वा आजन्म ब्रह्मचर्यपालन, ३) आज्ञापालन व ४) धार्मिक बाबतीत पोपचा आदेश निरपवादपणे मान्य करणे. आज्ञापालनाच्या व्रतात ह्या संघाचे सामर्थ्य प्रत्ययास येते. ह्या संघाच्या सभासदास जगातील कोणत्याही प्रदेशात पाठविले व कोणत्याही कार्यास वाहून घेण्याचा आदेश देण्यात आला, तरी तो तत्काळ पालन केला जातो.

ह्या संघाला अभ्यासक्रमासाठी कोणताच विषय वर्ज्य असा राहिला नाही. अंतराळातील नक्षत्रांच्या संशोधनापासून समुद्राच्या तळातील माशांच्या जाती-प्रजाती व जीव-जीवाणूंपर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी अभ्यासात केवळ रसच घेतला नाही, तर त्यांत प्रावीण्यही मिळवून दाखविले. त्यामुळे या संघातील काही सभासद ‘संशोधक’ म्हणूनही नावारूपाला आले. शिक्षण क्षेत्रातील नैपुण्य, कार्यक्षमता व कडक शिस्तपालन ह्या गुणांमुळे हा संघ जेवढा नावारूपास आला, तेवढाच तो विरोधकांच्या रोषासही पात्र ठरला. कॅथलिक शिक्षणाच्या क्षेत्रात जेज्वीटांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. या संघाच्या शाखा जगभर पसरल्या असून आज जवळ जवळ २४ हजार ‘जेज्वीट’ जगभर कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा दर्जा इतका उच्च प्रतीचा आहे की, जगभरातल्या त्यांच्या काही महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

सोळाव्या शतकात महाराष्ट्रात आलेल्या चार कॅथलिक व्रतस्थ संघांपैकी सर्वांत नव्या दमाचा हा संघ होता. जेज्वीट संघाला अद्ययावत स्वरूप व स्थीरस्थावरता येण्यापूर्वीच ह्या संघाचा एक अग्रणी संत फ्रान्सिस झेव्हिअर हे स्पॅनिश सदस्य इ.स. १५४२ मध्ये भारतात आले. एके काळी पॅरिसमध्ये प्राध्यापक म्हणून नावाजले गेलेले विचारवंत एक झपाटलेले धर्मप्रचारक होऊन भारतापासून जपानपर्यंत धर्मप्रसार करत गेले. गेल्या तीन शतकांत त्यांच्या नावाने अनेक महाविद्यालये व चर्चेस उभारली गेली आहेत.

जेज्वीट संघीयसदस्य ज्या काळात भारतात आले त्या वेळेला सम्राट अकबर दिल्लीच्या तख्तावर होता. वेगवेगळ्या धर्मांतील पंडित त्याला आपल्या दरबारात हवे होते. गोव्याला आलेले तीन जेज्वीट धर्मगुरू त्याच्या दरबारात बोलाविण्यात आले. त्यात थॉमस अक्वाविवा हे धर्मपंडित अग्रगण्य होते. भारतात गोवा येथील रायतूर या गावातील त्यांच्या कॉलेजला लागून इ.स. १५५६ मध्ये पहिला छापखाना उभारण्याचे श्रेय संत झेव्हिअर यांना जाते.

ह्या उच्च विद्याविभूषित जेज्वीट फादरांचा नावलौकिक ऐकून जयपूरचा राजा सवाई जयसिंह दुसरा यांनी इ.स. १७३४ मध्ये जी वेधशाळा उभारली तिच्या आखणीत सिंहाचा वाटा या संघाच्या धर्मगुरूंचा आहे. मराठी साहित्यात अग्रगण्य ठरलेले व ख्रिस्तपुराण हे महाकाव्य लिहिणारे कवी फादर थॉमस स्टीफन्स हे याच संघाचे सभासद. मद्रास येथे मरिना बीचवर ज्या फादरांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ते थेंबावणी या पुस्तकाचे लेखक व व्याकरणकार फादर कॉन्स्टंन्स बेस्की हे याच संघाचे सदस्य. ज्यांच्या नावाने पुण्याला धर्मगुरूंच्या प्रशिक्षणासाठी प्रख्यात महाविद्यालय उभे आहे व दक्षिण भारतात संस्कृतीकरणासाठी प्रसिद्धीस आलेले फादर डी नोबिली हेदेखील याच संघाचे सदस्य.

संदर्भ :

  • Brodrick, James, The Origin of the Jesuits, New York, 1940.
  • Guilbert, Joseph de, The Jesuits, Chicago, 1964.
  • https://www.jesuits.global/

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो