डी नोबिली, फादर रॉबर्ट : ( १५७७—१६ जानेवारी १६५६ ). ख्रिस्ती धर्मप्रसारक. फादर डी नोबिली हे मूळचे इटलीचे रहिवासी. रोममधील एका उमराव घराण्यात त्यांचा जन्म झाला. ‘येशू संघ’ या कॅथलिक ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संघाचा एक सदस्य म्हणून १६०५ साली त्यांचे गोव्यात आगमन झाले. आपल्या धर्मकार्यासाठी कर्मभूमी म्हणून त्यांनी भारताची निवड केली. गोव्यातील तत्कालीन सेंट पॉल कॉलेजमधून ईश ज्ञानाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १६०६ साली तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरात त्यांनी आयुष्यातील बराचसा काळ घालविला.

मध्ययुगीन काळात भारताच्या समुद्र किनाऱ्यावर पोहचलेल्या पाश्चिमात्य राष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि मिशनरींनी भारतात नव्याने ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केला. तेव्हा स्थानिक संस्कृतीविषयी आदर बाळगण्याऐवजी त्यांनी स्वत:चीच संस्कृती येथील ख्रिस्ती धर्मियांवर लादण्याचा कडवेपणा दाखवला. त्या काळात या प्रवाहाच्या अगदी विरुद्ध भूमिका घेऊन भारतातील संस्कृतीचे, जीवन प्रणालीचे, स्थानिक भाषांचे समर्थन करून आपल्या सहकाऱ्यांचा दोष पत्करून घेण्याचे धाडस या पाश्चिमात्य ख्रिस्ती मिशनरीने केले. या देशातील संस्कृतीशी पूर्णत: एकरूप होऊन देखील ख्रिस्ती धर्माचे आचरण राखता येते, असा विचार या मिशनरीने मांडला. असे करणे शक्य आहे, हे या ख्रिस्ती धर्मगुरूने आपल्या स्वत:च्या उदाहरणावरून इतरांना पटवून दिले.

इ. स. १६१४ मध्ये मदुराईत स्थायिक झाल्यादिवसापासून फादर डी नोबिली स्थानिक लोकांच्या रीतिरिवाजांबद्दल माहिती घेऊ लागले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, तेथील स्थानिक लोक सर्व यूरोपियन लोकांना ‘फिरंगी’ या संबोधनाने ओळखत असत. ‘फिरंगी’ हे संबोधन निश्चितच सन्मानदर्शक नाही, हे फादर डी नोबिली ह्यांना कळून चुकले. ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याच्या उद्देशाने यूरोपातील रोमहून शेकडो मैलाचा प्रवास करून डी नोबिली भारतात आले आणि आता एक ‘फिरंगी’ म्हणून आपल्याबाबत स्थानिक लोकांच्या मनांत काय भावना आहे, हे त्यांना उमगले. जोपर्यंत त्यांच्याकडे एक ‘फिरंगी’ व्यक्ती या नात्याने पाहिले जाते, तोपर्यंत मदुराई येथील समाजाच्या उच्च गटातील व्यक्ती त्यांच्याशी कुठल्याही स्वरूपाचा संबंध ठेवणे वा सुसंवाद प्रस्थापित करणे शक्यच नव्हते. फादर डी नोबिली ह्यांच्या आधीही मदुराई आणि नजीकच्या परिसरात इतर यूरोपियन ख्रिस्ती धर्मगुरू पोहचले होते. मात्र त्यांचा धर्मप्रसार त्या काळात अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाज घटकांपुरताच मर्यादित राहिला होता, ह्याचे उत्तर फादर डी नोबिली ह्यांना मिळाले. तेथील समाजाशी एकरूप व्हायचे असेल, तर स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे, याची जाणीव त्यांना झाली.

स्थानिक समाजाच्या चालीरितीमध्ये बदल घडवून त्यांच्या जीवनपद्धतीत बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी फादर डी नोबिली ह्यांनी स्वत:च्याच जीवनपद्धतीत परिवर्तन करणे अधिक पसंत केले. सर्वप्रथम त्यांनी स्वत: मांसाहाराचे सेवन करणे बंद केले. तत्कालीन ख्रिस्ती धर्मगुरूंच्या काळ्या झग्याचा त्याग करून हिंदू संन्याशाप्रमाणे भगव्या वस्त्रांचा आणि पायात लाकडी खडावांचा वापर ते करू लागले. डोक्यावरील केसांचे मुंडण करून कपाळावर चंदनाचा लेप लावू लागले. उजव्या हातात एक दंड आणि डाव्या हातात पाण्याचा कमंडलू अशा वेशात ते वावरू लागले. जवळजवळ दीड हजार वर्षांच्या ख्रिस्ती धर्माच्या परंपरेत प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरूने अशा प्रकारच्या पेहरावाचा स्वीकार केला होता. कॅथलिक चर्चच्या इतिहासात हा क्रांतिकारी बदल होता. फादर डी नोबिली यांनी तमीळ आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळविले. त्यांना ‘अय्यर’ ऊर्फ गुरू म्हणून मान्यता मिळाली.

स्थानिक भाषा शिकत असतानाच फादर डी नोबिली यांनी हिंदू धर्माची तत्त्वे जाणून घेण्यासाठी वेदांचाही अभ्यास सुरू केला. अनेक शतकांपूर्वी वेदांची रचना झालेली असली, तरी सतराव्या शतकापर्यंत कुठल्याही पाश्चिमात्य व्यक्तीने वेदांचा अभ्यास केला नव्हता. संस्कृत भाषा शिकून या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करणारे फादर डी नोबिली ही पहिलीच पाश्चिमात्य व्यक्ती ठरते.

फादर रॉबर्ट डी नोबिली यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार प्रामुख्याने ब्राह्मणवर्गात आणि इतर उच्च जातींमध्ये केला. त्या काळात ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा ताबडतोब ‘फिरंगी’ वर्गात समावेश केला जाऊन ती व्यक्ती समाजातून बहिष्कृत केली जाई. त्या काळी समाजाचे धार्मिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रांतील नेतृत्व पूर्णत: ब्राह्मणवर्गाच्या हाती होते. या उच्च आणि कनिष्ठ जातींमध्येही ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे अधिक सोपे होईल, हे फादर डी नोबिली यांनी ओळखले.

भारतातील ख्रिस्ती समाजाचे आध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी स्थानिक लोकांमधून धर्मगुरू निर्माण झाले पाहिजेत आणि या उमेदवारांना खास भारतीय परंपरेनुसार प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, असे फादर डी नोबिली यांचे मत होते. यासाठी धर्मगुरूंना संस्कृत भाषेत ख्रिस्ती तत्त्वज्ञान शिकविणारी सेमिनरी सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी १६१० साली केला. या सेमिनरीत संस्कृतमध्ये अध्ययन करण्याच्या हेतूने फादर डी नोबिली यांनी योग्य ती परिभाषा तयार केली. मात्र काही अडचणींमुळे ही सेमिनरी सुरू झाली नाही.

ख्रिस्ती उपासनापद्धतीत सर्व जगभर वापरल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेऐवजी भारतात संस्कृत भाषेचाच वापर व्हावा, असा आग्रह फादर रॉबर्ट डी नोबिली यांनी धरला. संस्कृत भाषा ही हिंदू धर्मियांच्या उपासनेत वापरली जाते. तसाच या भाषेचा वापर स्थानिक ख्रिस्ती धर्मियांना आपल्या उपासनेत करता यावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कॅथलिक चर्चच्या उपासनापद्धतीत संपूर्ण जगभर अनेक शतके केवळ लॅटिन या भाषेचाच वापर झालेला आहे. अगदी महाराष्ट्रातील चर्चमध्येसुद्धा उपासनापद्धतीत लॅटिन भाषाच वापरली जात असे. १९६० च्या दशकात पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेच्या ठरावानुसार संपूर्ण जगभर कॅथलिक चर्चच्या उपासनेत स्थानिक भाषांचा वापर होऊ लागला. या परिषदेमुळे जगभर लोकांसाठी, लोकांच्याच भाषेत उपासनाविधी, धार्मिक विधी होऊ लागले. मात्र यासाठी तीनशे वर्षांपूर्वी फादर डी नोबिली यांनी सुरू केलेल्या या धार्मिक सुधारणांची चळवळ त्यांच्यानंतर आलेल्या धर्मगुरूंनी चालू ठेवली असती, तर कॅथलिक चर्चचा भारतातील व संपूर्ण जगातील चेहरामोहराच बदलला असता.

फादर डी नोबिली यांना आपले कार्य करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. ख्रिस्ती धर्मांतरितांना जानवे घालण्याची, कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याची व शेंडी राखण्याची मुभा देणे म्हणजे ख्रिस्ती धर्माविरुद्ध आचरण आहे, असाही मुद्दा काही कडव्या कॅथलिक धर्मगुरूंनी मांडला. ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी अनेकदा त्यांची चौकशी केली. त्यांच्याविरुद्ध सनातनी धर्मगुरूंनी चालविलेल्या मोहिमेचा एक परिपाक म्हणून फादर डी नोबिली यांचे धर्मगुरू म्हणून ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे अधिकार १६१३ साली काढून घेण्यात आले. अखेरीस १६२३ साली पोप पंधरावे ग्रेगरी यांनी खास आदेश काढून फादर रॉबर्ट डी नोबिली यांची मते ख्रिस्ती धर्मविरोधी नाहीत, असा निर्वाळा दिला. फादर डी नोबिली यांना बाप्तिस्मा देण्याचा म्हणजे ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचा अधिकार पुन्हा एकदा देण्यात आला. मदुराई परिसरातील नवख्रिस्ती समाजास त्यांच्या जुन्या संस्कृतीप्रमाणे टिळा लावण्याची तसेच गळ्यात जानवे घालण्याची मुभा असावी यांसारख्या त्यांच्या मागण्या कॅथलिक चर्चने अखेरीस मान्य केल्या.

१६३० च्या सुमारास फादर डी नोबिली यांचे मिशनरी कार्य मोरामंगलय, तिरुचिरापल्ली आणि मदुराई या शहरांत चालले होते. याच काळात मदुराई येथे स्थानिक राज्यकर्ते आणि पोर्तुगीज यांचे संबंध बिघडले. फादर डी नोबिली यांचा सत्तेच्या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, तरीही स्थानिक राज्यकर्त्यांच्या दृष्टीने ते ‘फिरंगी’ होते. त्यामुळे १६४० मध्ये साधारणत: एक वर्षाचा काळ फादर डी नोबिली यांना तुरुंगात काढावा लागला. हा एक अपवाद वगळता भारतातील त्यांच्या वास्तव्यात कुणाही राज्यकर्त्यांशी संघर्षाचे गंभीर प्रसंग आले नाहीत.

फादर डी नोबिली यांना तमिळ भाषेत सर्वप्रथम गद्यरचना करण्याचे श्रेय दिले जाते. तमिळ भाषेतील गद्यरचनेच्या या जनकाने तीन यूरोपियन आणि तीन भारतीय भाषांमध्ये म्हणजे अनुक्रमे इटालियन, पोर्तुगीज, लॅटिन, तमिळ, संस्कृत आणि तेलुगू या भाषांमध्ये विपूल लिखाण केले.

फादर डी नोबिली यांनी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली, तेव्हा त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी विश्रांतीसाठी त्यांना श्रीलंकेतील जाफना येथे पाठविले. जाफना येथे दोन वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर पुन्हा त्यांना भारतात पाठविण्यात आले. आयुष्याची अखेरची आठ वर्षे त्यांनी मैलापूर (चेन्नई) या शहरात घालविली. ‘इन्कल्चरेशन’ तथा ‘सांस्कृतीकरण’ याचा पाया भारतात रोवणाऱ्या या द्रष्ट्या धर्मगुरूचे वयाच्या ७९ व्या वर्षी मैलापूर येथे निधन झाले.

संदर्भ :