दोतोंडे, राम : (१ जुलै १९५७). सुप्रसिद्ध मराठी कवी आणि कथाकार. त्यांचा जन्म धाड जि. बुलढाणा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धाड येथे झाले. मिलिंद महाविद्यालयातून बी. ए. (१९७८) एम. ए. राज्यशास्त्र मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद (१९८१), पत्रकारिता पदवी (१९८२) या पदव्यांसह त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मिलिंद कॉलेजमध्ये असताना दलित युवक आघाडीमध्ये ते सक्रिय सदस्य होते. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९८३ ला जनसंपर्क अधिकारी म्हणून ते रुजू झाले. २०१५ ला ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्य महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले.रापी जेव्हा लेखणी बनते  (१९७८) व गल्ली बदललेला मोर्चा (२०००) हे दोन काव्यसंग्रह, भारत माझा देश  हे विडंबनपर पथनाट्य, दोन भाकरी तांब्यांभर कोल्ड्यास  हा कथासंग्रह आणि प्राचार्य ल. बा. रायमाने गौरव ग्रंथ (२०१२) व  प्रा. अविनाश डोळस गौरव ग्रंथ (२०१७) हे दोन गौरवग्रंथ अशी साहित्य त्यांच्या नावावर आहे.

राम दोतोंडे यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात ही माधव कोंडविलकर यांनी लिहिलेल्या कवितेतील आरी रापी या शब्दांपासून प्रेरणा घेऊन झाली. विद्यार्थीदशेतच रापी जेव्हा लेखणी बनते  हा काव्यसंग्रह वर्ग मित्रांच्या शिष्यवृत्तीच्या पैशातून प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. चांभार समाजामध्ये जन्माला आलेल्या पारंपरिक व्यवसायाशी संबंधित असलेल्या व आधुनिक परिवर्तनवादी विचारांचा स्पर्श झालेल्या व्यक्तीने दलितांमधील एका समूहाचं जगणं चिकित्सक वृत्तीने काव्याच्या स्वरूपात यात मांडलेलं आहे. समाजाची सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती याचे वर्णन तर केलेच आहे त्याच बरोबर त्या समाजासमोर परिवर्तनवादी विचार स्वीकारण्याचा प्रस्ताव देखील हा काव्यसंग्रह ठेवतो. गल्ली बदललेला मोर्चा  हा काव्यसंग्रह दलित चळवळ, दलित चळवळीचे अंतरंग व परिवर्तनवादी विचाराने प्रेरित झालेल्या जीवनमूल्यांचा साठा आहे. या काव्यसंग्रहामध्ये दोतोंडे यांच्या विचारांमधील स्त्रीवादी भूमिका ठळकपणे जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरच्या दलित चळवळीच्या वाटचालीतील स्थित्यंतरांवर भाष्य करणाऱ्या या कविता आहेत. राम दोतोंडे यांच्या कवितांनी दलित मराठी साहित्य क्षेत्राच्यापलीकडे जाऊन समाजशास्त्रासारख्या विषयातील लोकांना लिहिण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी दलित साहित्य चळवळीला एका नव्या जाणिवेची ओळख करून दिली. परिवर्तनाची ओळख, आंबेडकरी विचारनिष्ठा, एकात्म आणि एकसंघ चळवळीची आवश्यकता, जाती  समुहांची दुःख आणि वेदना त्यातील तरुणांचा संघर्ष, इतिहासाबद्दलच्या चिंतनाचे भान असणारी समाज एकसंघ टिकू पाहणारी अनुभवांशी प्रामाणिक असणारी काव्यरचना ही राम दोतोंडे यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. हिंदू धर्म संस्कृतीने प्रस्थापित केलेली माणसामाणसातील जातीजातीतील जुनी नाती बदलण्याची आणि नवीन नाती निर्माण करण्याची मागणी करणाऱ्या या कविता आहेत. अतंर्द्वव्दांनी व्यापून टाकलेल्या वैचारिक घुसळणीतून तयार झालेल्या गाभ्याला अतिशय साधेपणाने राम दोतोंडे यांनी शब्दबद्ध केले आहे. राम दोतोंडे यांनी मराठी साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितेसाठी महाराष्ट्र फाउंडेशन हा महत्त्वाचा ग्रंथ पुरस्कार (२००१), कै. संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार, लोकायत साहित्य पुरस्कार, कै. राय हरिश्चंद्र सहानी उर्फ दुःखी पुरस्कार, दिवंगत जमुनाबाई स्मृती पुरस्कार यासह महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात त्यांनी दिलेल्या सेवेसाठी ‘पब्लिक रेलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या भारतातील जनसंपर्क क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या संस्थेद्वारे २०११ यावर्षी उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

 संदर्भ : 

  • जेवळीकर, सुहास, राम दोतोंडे: सर्वव्यापी विषमतेचा समग्रतेने चिंतन करणारा कवी, अक्षर संवेदना, दिवाळी अंक २००२.
  • रायमाने, ल. बा., अंतर्मुख होऊन मूल्यांचा वेध घेणाऱ्या कविता, सकाळ, २३ एप्रिल २०००.