सपुष्प वनस्पतींपैकी एक औषधी वनस्पती. रास्ना ही वनस्पती ऑर्किडेसी कुलातील असून ती व्हँडा रॉक्सबर्घाय किंवा व्हँडा टेसेलॅटा अशा शास्त्रीय नावांनी ओळखली जाते. ती भारत, चीन व श्रीलंका या देशांमध्ये आढळते. व्हँडा प्रजातीत सु. ६० जाती असून त्यांपैकी भारतामध्ये १०–१२ जाती आढळतात. रास्ना ही दुसऱ्या वनस्पतींचा केवळ आधार घेऊन वाढत असल्यामुळे ती अपिवनस्पती म्हणून ओळखली जाते.
रास्ना या बहुवर्षायू वनस्पतीचे खोड ३०–६० सेंमी. लांब व बळकट असून त्यावर शाखायुक्त मुळे येतात. ही मुळे आधाराला चिकटून, वेढून आणि खोडाला आधार देत वाढतात. काही मुळे हवेतून पाणी शोषून घेतात. पाने साधी, एकाआड एक, लांबट, चिवट आणि मांसल असतात. पानांचे टोक विभागलेले असून दोन्ही अर्धे भाग पन्हळीप्रमाणे राहतात. फुलोरा १५–२५ सेंमी. लांब व मंजरी प्रकारचा असून त्यात ६–१० फुले असतात. परिदले सहा व पिवळी असून त्यांवर पिंगट रेषांची जाळी असते; ओठाची पाकळी म्हणजे ओष्ठक निळे व मोठे असून त्यावर पिंगट जांभळे ठिपके असतात. सोंडेसारखा परिदलांचा भाग म्हणजे शुंडिका सरळ व बोथट असते. पुंजायांग स्तंभ आखूड असतो. फळ लहान गदेसारखे असून त्यावर तीक्ष्ण कंगोरे असतात. बिया लहान व अभ्रूणपोषी असतात. बीजप्रसार वाऱ्याने होतो.
रास्ना वनस्पतीची मुळे सुगंधी परंतु कडू असून अग्निमांद्य व संधिवात यांवर गुणकारी आहेत. त्यांचा रस तेलात मिसळून चेतासंस्थेच्या विकारांवर तसेच सांध्यांवर लावतात. पानांचा लेप तापात सर्वांगावर लावतात. मुळांचा काढा अर्धांगवायूवर देतात. तसेच मुळांचा उपयोग मूळव्याधीवर व उचकी लागल्यावर होतो. दातदुखी, कंबरदुखी व डोक्यातील खवडा यांसारख्या विकारांवर ती गुणकारी आहे. २०१३ मध्ये एका संशोधनातून रास्ना वनस्पतीत उत्तेजक पदार्थही असतात, असे आढळून आले आहे.
कडू रास्ना : ऑर्किडेसी कुलातील या जातीचे शास्त्रीय नाव ॲकँपे वाइटियाना आहे. ती भारत, बांगला देश, श्रीलंका व मलेशिया या ठिकाणी आढळते. महाराष्ट्रात (कोकणात) व कर्नाटकात तिचा प्रसार आहे. खोड लांबट व मजबूत असते. मुळे लांब व जाडजूड असून पाने साधी, जाड, चिवट, सपाट व टोकाला दुभंगलेली असतात. फुलोरा लहान व गुलुच्छ प्रकारचा असून फुले लहान असतात. परिदले पिवळी असून त्यावर लाल रेषा असतात. फळ लांब व गदेसारखे असून त्यावर कंगोरे असतात. कडू रास्ना ही जाती कडू व पौष्टिक असून संधिवातावर गुणकारी आहे.