(मरीन पॉल्युशन). रासायनिक पदार्थ, तसेच औद्योगिक, कृषी आणि निवासी क्षेत्र अशा भागांतून आलेली अपशिष्टे महासागरात मिसळून सागरजलातील सजीवांसाठी अपायकारक स्थिती निर्माण होणे म्हणजे ‘सागरी प्रदूषण’ होय.

पृथ्वीचा सु. ७०% भाग महासागरांनी व्यापला आहे. त्यात पृथ्वीवरील महत्त्वाची मौल्यवान नैसर्गिक संसाधने आहेत. महासागर हा हवामानाचा नियंत्रक घटक आहे. हवेच्या शुद्धीकरणासाठी महासागर महत्त्वाचे आहेत. जगातील असंख्य लोकांचा अन्नपुरवठा हा महासागरापासून उपलब्ध होतो. महासागर हे बहुतांश सजीवांचे उत्पत्ती स्रोत आहेत. सूक्ष्म शैवालापासून ते महाकाय ब्ल्यू व्हेलपर्यंत अनेक सजीव महासागरांत आढळतात. असे हे महासागर मोठ्या प्रमाणांत प्रदूषित होत आहेत.

सागरजलात सु. ८०% पेक्षा जास्त प्रदूषके जमिनीवरून मिसळतात. हवा प्रदूषणामुळेही काही अंशी सागरी प्रदूषण होते. वाऱ्यामुळे हवेतील धूळ, कीटकनाशके सागरी जलात मिसळतात. भूमी आणि हवा यांमुळे होणाऱ्या सागरी प्रदूषणामुळे सागरी सजीवांना धोका निर्माण होतो. प्रदूषकाचे स्रोत दोन प्रकारांचे असतात; बिंदू स्रोत आणि अबिंदू स्रोत. एकाच स्रोतापासून झालेल्या प्रदूषणाला ‘बिंदू स्रोत’ म्हणतात, तर एकापेक्षा अधिक स्रोतांपासून झालेल्या प्रदूषणाला ‘अबिंदू स्रोत’ म्हणतात. सागरी प्रदूषण हे अबिंदू स्रोतामुळे होणारे प्रदूषण असून ते अनेक स्रोतांपासून होते. सागरी परिसंस्थेत जमिनीवरील अपशिष्टांचा थेट प्रवेश होतो. पावसाच्या किंवा नदीच्या पाण्यातून आलेली प्रदूषके सागरजलात प्रवेश करतात, तसेच वातावरणातील प्रदूषके सागरात मिसळतात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे केवळ भूमीवरील नव्हे, तर महासागरातील पर्यावरणही प्रदूषित होते. मानवनिर्मित कार्बन सागरजलात मिसळल्याने सागरजलाची आम्लता जलदतेने वाढते. अशाच प्रकारे जर कार्बन सागरजलात मिसळत गेले, तर सध्याच्या आम्लीय स्थितीत १५०% वाढ होऊ शकते आणि सागरी परिसंस्थेचा ऱ्हास होऊ शकतो. अतिआम्लीय जलामुळे प्रवाळ रंगहीन होतात. जागतिक तापनाचा प्रभावही सागरी तापमान वाढवण्यास कारणीभूत असतो. अतितापनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अतिरिक्त सकस द्रव्ये (नायट्रेट व फॉस्फेट) पृष्ठीय जलावर पसरतात आणि शैवालाची वाढ होते. विषारी पदार्थ पृष्ठीय जलात जमा होऊन सागरी अन्नसाखळी विस्कळीत होते. अनेक प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे ऑक्सिजनचा अवक्षय होतो. या रासायनिक पदार्थांमुळे प्रदूषित जल सागरी परिसंस्थेत मिसळल्यास त्याचे अन्नजाळ्यात शोषण होते. त्यामुळे तेथील जैविक स्थितीत बदल होतो. तेथील सजीवांना रोग होतात. अशी स्थिती मानवासाठीदेखील अपायकारक ठरू शकते. जैवरसायनांमुळे सागरी जीव प्रभावित होतात. असे सागरी विषारी घटक भूमीवरील प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. हेच घटक मांसामध्ये आणि दुग्धोत्पादनात आढळून येतात.

जहाज वाहतुकीमुळे महासागरी मार्ग आणि सागरी जल प्रदूषित होते. तेलगळतीमुळे सागरी सजीवांवर प्रतिकूल परिणाम होतो. तेलप्रदूषित पाणी शुद्ध करणे आणि स्वच्छ करणे अतिशय कठीण असते. हे तेल सागरी तळावरील गाळात दीर्घकाळ राहते. तेलगळती ही सागरी पर्यावरणासाठी अत्यंत त्रासदायक व धोकादायक ठरते. इंधन वाहिन्यांमधून व जहाज इंजिनातूनही तेलगळती होत असते, तसेच बंदरातून माल वाहतूक होताना सागरी प्रदूषणपूरक स्थिती निर्माण होते.

जहाजांमुळे महासागरात ध्वनी प्रदूषण होते. त्याचाही सागरी सजीवांना त्रास होतो. मानवनिर्मित ध्वनी प्रदूषणाचा परिणाम जलचरांवर होतो. अन्नग्रहण, संगत, सहवास, प्रजनन, जलतरण यांसाठी त्यांना शांतता लागते, ती ध्वनी प्रदूषणाने बिघडते.

सागरी खाणकाम हेदेखील सागर व किनारी प्रदेशांतील प्रदूषणास कारणीभूत ठरते. सागरी तळावर आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने खोल भागात खाणकाम केले जाते. हायड्रॉलिक पंपाने महत्त्वाची खनिजे मिळवली जातात. ती भूपृष्ठावर प्रक्रियेसाठी टाकली जातात. त्यामुळेही पर्यावरण प्रदूषित होते.

सागरी प्रदूषण : (१) तेलगळतीमुळे होणारे सागरी प्रदूषण, (२) सांडपाण्यामुळे होणारे सागरी प्रदूषण. 

सागरी प्रदूषण फार पूर्वीपासून होत आहे; परंतु १९५० नंतर संयुक्त राष्ट्रांच्या नियमानुसार या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सागरी प्रदूषणाला प्रतिबंध व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणे आखली जात आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते महासागराची व्याप्ती प्रचंड असल्याने या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे सदर प्रदूषण भूमीवरील प्रदूषणापेक्षा कमी अपायकारक असल्याचे त्यांना वाटते. सागरी प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी सु. एक लाख सागरी प्राणी मृत्यूमुखी पडतात. दरवर्षी सागरजलात सु. १० कोटी टन प्लास्टिक जमा होते. तज्ज्ञांच्या मते इ.स. २०५० मध्ये प्लास्टिकचे प्रमाण सागरी माशांपेक्षा जास्त असेल. चीन व इंडोनेशिया हे देश इतर देशांच्या तुलनेत जास्त प्लास्टिक सागरांत टाकतात. सागरजलातील अपशिष्टाचे अपघटन होण्यास फोमसाठी सु. ८० वर्षे, ॲल्युमिनियमसाठी सु. २०० वर्षे, तर प्लास्टिकसाठी ४०० वर्षे लागतात. काही अभ्यासकांच्या मते १० कोटी टन प्लास्टिक गाळ सागरतळावर असण्याची शक्यता आहे. सध्या तरंगणाऱ्या प्लास्टिकमुळे पॅसिफिक महासागरात तीन नवीन बेटे तयार झाली आहेत.

भारताच्या दोन्ही, पूर्व तसेच पश्चिम किनाऱ्यावर आणि अंतर्गत महासागरी भागात प्रदूषण वाढत आहे. जगातील इतर देशांच्या किनाऱ्याबाबतसुद्धा अशीच समस्या आहे. महाराष्ट्र राज्याला सु. ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारासुद्धा सर्वांत जास्त प्रदूषित आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय महासागरविज्ञान संस्था आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तरित्या काढला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारे तुलनात्मकरित्या कमी प्रदूषित आहेत, तर बोर्डी, घारापुरी, रेवदंडा, मुरुड इ. भागांत सागरी प्रदूषण ठळकपणे जाणवत आहे. त्यामुळे डॉल्फिनसारखे जलचरही मृत्यूमुखी पडत आहेत. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आणि प्लास्टिक पदार्थ यांमुळे कोकणातील खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. निवासी सांडपाणी, शेतजलाचे निर्गमन, औद्योगिक संकुलातील रसायने, विषारी पदार्थांचे उत्सर्जन इ. कारणांमुळे सागरी प्रदूषण होत आहे. खाड्या व पुळणीवरही प्रदूषण वाढले आहे.

सागरी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी सागरजलात अपशिष्टांची होत असलेली विल्हेवाट थांबवणे गरजेचे आहे. प्रकिया न करता अपशिष्टे सागरजलात मिसळणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. वस्तूंच्या वापरावर नियंत्रण, वस्तूंचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण याचा अवलंब करणे आवश्यक आहे. निरनिराळ्या अपघटन न होणाऱ्या वेष्टणांचा वापर कमी करणे गरजेचे आहे. समुद्रकिनारे ही करमणूकीची, तसेच मनोरंजनाची पर्यटन केंद्रे आहेत. येथे लोकांची वर्दळ होणे स्वाभाविक आहे; तथापि प्रत्येकाने आपली परिसंस्था स्वास्थ्यपूर्ण ठेवणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने सागरी लोकशिक्षण महत्त्वाचे ठरते.