रूढ अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा. ऊर्जेचे अर्थशास्त्राचा उदय आधुनिक काळातला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार एक वेगळी शाखा म्हणून या शाखेचा उदय १९७३ मध्ये खनिज तेल म्हणजेच जीवाश्म इंधनाच्या (फोसील फ्युल्स) संकटापासून झाली आहे. या संकटाने ऊर्जा व तिचे स्रोत आणि आर्थिक विकासातील त्यांचे योगदान यांचा सबंध स्पष्टपणे प्रस्थापित केला; परंतु सुमारे सोळाव्या शतकापासून या शाखेच्या अस्तित्वाचे संदर्भ इतिहासामध्ये उपलब्ध होतात.

मानवी अस्तित्व हे मूलतः ज्यावर अवलंबून आहे व जी मानवी जीवनाचा आरंभबिंदू आहे अशी शक्ती म्हणजे ऊर्जा. मुळात जी शक्ती आपणास कोणतेही काम करण्यासाठी अत्यंत गरजेची असते, ती शक्ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जेचे अर्थशास्त्र म्हणजे ऊर्जेच्या आधारे आपण जे काम करतो, ते पर्याप्त पद्धतीने करणे होय. अर्थशास्त्राची व्याख्या ही मुळातच संसाधने व गरजा यांतील सहसंबंध व संसाधनांच्या बाबतींतील पर्यायी परिव्यय (अपोर्च्युनिटी कॉस्ट) यांच्या पर्याप्त वापराच्या संदर्भात आहे. त्यामुळे ऊर्जेचे अर्थशास्त्र ही संकल्पना ऊर्जेचे विविध स्रोत व ऊर्जेशी निगडित वस्तू यांच्या संदर्भाने होणाऱ्या विविध आर्थिक घडामोडींचा परामर्श घेते.

ऊर्जेचे अर्थशास्त्र या शाखेचा पाया हा ऊर्जेसंबंधातील उष्मागतिक (थर्मोडायनॅमिक्स) शास्त्रामधील ऊर्जेच्या व्याख्येशी संबंधित आहे. अर्थतज्ज्ञांनी ऊर्जेसंबंधी दोन सिद्धांत मांडले आहेत. एक, ऊर्जा ही निर्माण करता येत नाही व ती अविनाशी असून ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होऊ शकते. दोन, ऊर्जा ही भौतिक वातावरणातून येते व अंतिमतः तेथेच परत जाते. या दोन सिद्धांतामुळे ऊर्जा किंवा ऊर्जा स्रोत हे बरेचदा घटत जाणारे किंवा संचय करता न येणारे असल्याने त्यांचा पर्याप्त वापर हा अर्थशास्त्राशी निगडित विषय ठरतो. यातूनच ऊर्जेच्या अर्थशास्त्रात ऊर्जा स्रोतांचा मानवाकडून होणारा वापर, ऊर्जा निर्मितीचे साधन व त्यांच्या वापराचे परिणाम या महत्त्वाच्या बाबींचा विचार होतो. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, ऊर्जा ही इतर वस्तुंसारखी विकता येणारी किंवा विकत घेता येणारी वस्तू नाही; परंतु वेगवेगळी इंधने ही वस्तुंच्या रूपात असल्याने त्यांचा वापर मात्र ऊर्जेच्या अर्थशास्त्रात अंतर्भूत होतो. भौतिक दृष्टीने ऊर्जा ही एखादे कार्य करण्याची शक्ती असते; तर अर्थशास्त्रीय दृष्टीने ऊर्जा ही वस्तू किंवा स्रोत जे आवश्यक ते कार्य करतात व त्या वस्तुला किंवा स्रोताला ते कार्य करण्याची क्षमता प्रदान करतात.

अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबिन सिक्क्लेस यांच्या मते, ‘ऊर्जेचे अर्थशास्त्र हे ऊर्जा स्रोत व ऊर्जा वस्तू यांचा अभ्यास करते. त्यात उद्योग संस्था, उपभोक्ते यांना ऊर्जेचा पुरवठा, वहन, रूपांतरण करणार्‍या प्रेरणा, बाजार व त्याचे नियमन, ऊर्जेचे पर्यावरणीय परिणाम, ऊर्जेचा आर्थिक दृष्ट्या सक्षम वापर इत्यादी बाबींचा विचार होतो. खनिज तेल या इंधनासारख्या सतत घटणार्‍या ऊर्जा स्रोतांचा यात होणारा अभ्यास हा या शास्त्राला वेगळेपणा देतो’.

अर्थतज्ज्ञ सुभेस भट्टाचार्य यांच्या मते, ‘ऊर्जेचे अर्थशास्त्र ही उपयोजित अर्थशास्त्राची शाखा असून त्यात अर्थशास्त्रीय तत्त्वे व साधने यांच्या साह्याने काही प्रश्नांची उकल केली जाते व तार्किक आणि सुयोग्य/सुसंगत पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जाते’.

ऊर्जेच्या अर्थशास्त्रामध्ये व्यक्ती, उद्योगसंस्था, सरकार असे विविध आर्थिक अभिकर्ता किंवा प्रतिनिधी जे या उपलब्ध ऊर्जा स्रोतांना उपयुक्त अशा ऊर्जारूपांत बदलून ते उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवून पुन्हा त्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावतात अशा सर्वांचा अभ्यास केला जातो. थोडक्यात, ऊर्जेचे अर्थशास्त्र म्हणजे ऊर्जेची मागणी, तिचा पुरवठा, त्यानुसार ठरणारी ऊर्जा स्रोतांची किंमत, वेगवेगळ्या इंधनांची पर्याप्तता व त्यांच्यातील स्पर्धा, ऊर्जेबाबतची धोरणे आणि ऊर्जेच्या वापराचे पर्यावरणीय परिणाम या सर्व बाबींचे अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेले विश्लेषण होय.

आजच्या आधुनिक काळातील ऊर्जेच्या संकल्पनेप्रमाणे ऊर्जेची व्याख्या करण्याचे श्रेय अर्थतज्ज्ञ थॉमस यंग यांना जाते. त्याचबरोबर अंकगणित तज्ज्ञ हॅरॉल्ड हॉटेलिंग यांनी इ. स. १९३१ मध्ये संसाधनांच्या घटीचा पर्याप्तता सिद्धांत (थिअरी ऑफ ऑप्टिमल डिप्लेशन ऑफ रिसोर्सेस) मांडून ऊर्जेचे अर्थशास्त्र या शाखेत मोलाची भर टाकली. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी नैसर्गिक साधन-संपत्तीच्या मर्यादित उपलब्धतेवर प्रकाश टाकून तिच्या पर्याप्त वापराचे महत्त्व प्रस्थापित केले आणि ऊर्जेच्या अर्थशास्त्राला एक वेगळी दिशा दिली.

१) ऊर्जेचे वर्गीकरण : ऊर्जेचे वर्गीकरण ऊर्जेच्या स्रोतानुसार केले जाते.

प्राथमिक स्रोत : नैसर्गिक संसाधंनांपासून जशीच्या तशी मिळालेली ऊर्जा. उदा., सौर ऊर्जा, कोळसा, नैसर्गिक वायू ऊर्जा, इत्यादी.

दुय्यम स्रोत : प्राथमिक स्रोतांच्या रूपांतरातून मिळालेली ऊर्जा. उदा., वीज इत्यादी.

२) स्रोतांच्या कमी-जास्त प्रमाणानुसार :

पुनर्स्थापित (रिन्युबल) : प्राथमिक स्रोतांपासून ऊर्जा मिळते व त्यांचा कितीही वापर झाला, तरी हे स्रोत न घटता सतत उपलब्ध होत असतात. उदा., सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इत्यादी.

अपुनर्स्थापित (नॉन रिन्युबल) : मर्यादित प्राथमिक स्रोतांपासून ऊर्जा मिळते आणि हे ऊर्जा स्रोत सततच्या वापरांमुळे घटत जाणारे असतात. उदा., कोळसा, खनिज तेल इत्यादी.

३) व्यापारी दृष्टीने :

व्यापारी ऊर्जा : ज्या ऊर्जांची बाजारामध्ये एका विशिष्ट किमतीला खरेदी किंवा विक्री करतात त्यांना व्यापारी ऊर्जा म्हणतात. उदा., कोळसा, खनिज तेल, वीज इत्यादी.

अव्यापारी ऊर्जा : या ऊर्जांची बाजारामध्ये एका विशिष्ट किमतीला खरेदी किंवा विक्री होत नाही, तर व्यक्ती स्वत: त्या आपल्या उपयोगासाठी गोळा करतात. उदा., जळाऊ लाकूड, गवत, पालापाचोळा इत्यादी.

४) तंत्रज्ञानाच्या दृष्टीने :

पारंपरिक ऊर्जा : हे ऊर्जा स्रोत मिळविण्यासाठी फार कुशल तंत्रज्ञानाची गरज नसून फार प्रक्रिया न करता हे ऊर्जा स्रोत उपलब्ध होतात.

अपारंपरिक ऊर्जा : हे ऊर्जा स्रोत मिळविण्यासाठी कुशल व अभिनव तंत्रज्ञानाची गरज असते.

ऊर्जेच्या अर्थशास्त्राचा इतिहास : ऊर्जा या शब्दाचा संदर्भ ख्रिस्त पूर्व चवथ्या शतकामध्ये प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांच्या निकोमशीन इथिक  या नीतीशास्त्रावरील ग्रंथात सापडतो. Energy हा शब्द मूळ Energeia या ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ॲरिस्टॉटल यांनी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य म्हणजे ऊर्जा असे म्हटले आहे. व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे ख्रिस्त पूर्व पाचव्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लायटस यांनी प्रथमतः ऊर्जा हा शब्द आजच्या ऊर्जेच्या अर्थाशी अनुरूप अशा अर्थाने वापरला. त्यांनी Energy हा शब्द En-ergon या ग्रीक शब्दापासून घेतला असून एखाद्या कार्याचा स्रोत आणि अग्नी या कार्याच्या मूळ स्रोताचा अर्थ म्हणजे ऊर्जा अशा अर्थाने वापरला.

आज आपल्याला अपेक्षित असलेला ऊर्जेचा अर्थ किंवा व्याख्या साधारणपणे सोळाव्या शतकाच्या अखेरीस उदयास आली; कारण या काळापर्यंत ऊर्जा म्हणजे सूर्याकडून मिळणारी शक्ती किंवा सौर ऊर्जा हीच होती. सूर्य हा पृथ्वीला साधारणपणे १,३६६ वॉट इतकी ऊर्जा प्रति मिटर प्रति सेकंद पुरवीत असतो. आजच्या ऊर्जेच्या स्रोतांचा विचार केल्यास इतकी ऊर्जा १२,८०,००,००० द. ल. टन खनिज तेलाच्या ज्वलनाने मिळविता येईल. या ऊर्जेचा वापर वृक्षांकडून प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी, प्राण्यांच्या अन्नसाखळीसाठी व पर्यायाने मानवी प्रगतीशी जोडतात.

सोळाव्या शतकात पृथ्वीच्या एक अष्टमांश भाग शेती लागवडीखाली होता. ती संपूर्ण शेतीक्षेत्र मुख्यतः आशिया, ईजिप्त, उत्तर आफ्रिका, यूरोप व मध्य अमेरिका या देशांत होते. या काळात लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे ऊर्जेची कमतरता नव्हती. तसेच बहुतांश लोकसंख्या ही विषुववृत्तीय प्रदेशात एकवटलेली होती. त्यामुळे सौर ऊर्जा हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत होता. या काळात सेंद्रीय उर्जेवर आधारित अर्थव्यवस्था होत्या. साधारणपणे २,५०० वर्षांपूर्वी पाणचक्कीचा शोध लागला. जल व वायू या ऊर्जा अस्तित्त्वात आल्या आणि त्यांचा यूरोपभर खूप प्रसारही झाला. नंतरच्या काळात मात्र औद्योगिक क्रांती व रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर जगभर ऊर्जेची मागणी वाढू लागली. याच काळात लोकसंख्याही झपाट्याने वाढली व तिचा शेती आणि पर्यायाने जमिनीच्या क्षेत्रावरील भारही वाढला. याच काळात जंगलतोडीचेही प्रमाण बरेच वाढले व हळुहळु जळाऊ लाकूड या इंधनाचा तुटवडा भासू लागला. औद्योगिक क्रांतीमुळे दळणवळणाची साधनेही वाढू लागली आणि जगभरातील ऊर्जेची मागणी आणि तिचा पुरवठा यांत असंतुलन निर्माण होऊ लागला. औद्योगिक अर्थव्यवस्था उदयास येऊन त्यांचा व्यापारही वाढला. यातून पुढे ऊर्जा स्रोतांचा वापर इंधनासाठी व पर्यायाने उष्णतेच्या निर्मितीसाठी होऊ लागला. हॉलंड व नेदर्लंड्स या यूरोपीय देशांत वनस्पतींचे अवशेष (सेंद्रिय ऊर्जा स्रोत) व खनिज ऊर्जा स्रोत यांचे एकत्रित कुजून रूपांतरित झालेले वनस्पतीजन्य पदार्थ (पीट) हे उष्णतेच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ लागले; परंतु अशा ऊर्जास्रोतांचा संबंध हा जमिनीच्या उपलब्धतेशी जोडला गेला. जीवभार इंधन (बायोमास) हेदेखील एक महत्त्वाचा उर्जास्रोत म्हणून वापरले जाऊ लागले.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जळाऊ लाकडाच्या इंधनाची समस्या भीषण होऊ लागली. त्यामुळे जग सेंद्रिय इंधनावरून हळूहळू खनिज तेलाच्या स्रोतावरून खनिज कोळसा या इंधनाकडे वळले. सुरुवातीला कोळशाच्या किमती अनुकूल राहिल्यामुळे जगभरात त्याची मागणी वाढत गेली. त्यानंतर अठराव्या शतकात हॉलंड, नेदर्लंड्स इत्यादी देश इंग्लंडकडून कोळसा आयात करू लागले. कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे त्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला. तेव्हा अर्थतज्ज्ञ जेव्हन्स यांनी आपल्या द कोल क्वेशन  या पुस्तकात ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे ऊर्जा स्रोतांचे पर्याप्त वापर या समस्यांचा संदर्भ इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत प्रतिपादन केला. अप्रत्यक्षपणे येथूनच ऊर्जेचे अर्थशास्त्र उदयास आले.

इसवी सन १८६० मध्ये पहिले तेलक्षेत्र अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे उपयोगात आणले गेले. नंतर येथूनच विविध क्षेत्रांत पेट्रोलियमचा सर्वदूर वापर सुरू झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर तर खाजगी दळणवळण क्षेत्रात खनिज तेलाची मागणी वाढून १९७३ मध्ये आलेल्या खनिज तेल धक्क्यांनी पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनाचे (ओपेक) महत्त्व अधोरेखित केले. याच काळात विजेचा वापर जगभरात वाढू लागला. त्यासाठी कोळशाऐवजी खनिज तेलाचा वापर वाढला. इ. स. १९५० पासून हा ऊर्जा स्रोत एकूण ऊर्जेच्या मागणीचा ७५ टक्के व आजमितीला सुमारे ८० टक्के गरज भागवीत आहे. खनिज तेलाचे साठे हे ऊर्जा स्रोत मर्यादित व संचयन करता न येणारे असल्यामुळे त्याचा पर्याप्त उपयोग व त्यासाठी निश्चित असे सरकारी धोरण हे सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरू लागले आणि यातूनच ऊर्जेचे अर्थशास्त्र ही वेगळी शाखा निर्माण झाली. मागील चार ते पाच शतके ऊर्जेची मागणी व तिचा पुरवठा यांमध्ये असंतुलन दर्शवितो. सोळा-सतराव्या शतकाच्या सुरुवातीची काही वर्षे पुरवठा ही मागणीपेक्षा जास्त होती; तर त्यानंतर आजपर्यंतची ऊर्जेची मागणी ही पुरवठ्याच्या तुलनेत सतत वाढतच आहे. एकूणच ऊर्जेची किंमत ही तिची मागणी व पुरवठा या दोन घटकांनी ठरविली जाते.

भारतामध्ये उदारीकरणापूर्वी ऊर्जेचे उत्पादन व तिची किंमत ही सरकारकडून नियंत्रित केली जात असे; मात्र उदारीकरणानंतर या क्षेत्राचे अंशतः खाजगीकरण झाले. त्यानुसार ऊर्जेच्या किंमती या बाजारातील मागणी व पुरवठा यांनुसार ठरू लागल्या. साहजिकच कोळशासारख्या अपुनर्स्थापित व मर्यादित स्रोतांपासून मिळणारी औष्णिक ऊर्जा आणि पवन किंवा सौर या पुनर्स्थापित स्रोतांपासून मिळणारी ऊर्जा यांच्या किंमतीत तफावत असते. भारतात ऊर्जेचा दरडोई वापर हा इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहे; मात्र भविष्यकाळात जलद आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठताना सर्व ऊर्जा स्रोतांचे महत्त्व व विशेषतः पुनर्स्थापित स्रोतांबाबत निश्चित धोरणाची गरज आहे.

संदर्भ :

  • Bhattacharyya, Subhes C., Energy Economics : Concepts, Issues, Markets and Governance, 2011.
  • Durlauf, Steven N.; Blume, Lawrence E., The New Palgrave Dictionary of Economics, 2nd edition, 2008.
  • Evans, Joanne; Hunt, Lester C., International Handbook On The Economics of Energy, 2009.
  • Hotelling, Harold, Journal of Political Economy, Vol. 39, Chicago, 1931,
  • Jevons, William Stanley, The Coal Question : An Inquiry Concerning the Progress of the Nation, and the Probable Exhaustion of Our Coal Mines, London, 1865.
  • Sweeney, James L., Economics of Energy, Stanford.
  • Tiago, Oliveira, Energy Economics : An Early Modern History, 2013.

समीक्षक : राम देशपांडे