रिठा हा पानझडी वृक्ष सॅपिंडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सॅपिंडस ट्रायफोलिएटस आहे. लिची व बकुळ या वनस्पतीही सॅपिंडेसी कुलातील आहेत. रिठा मूळचा भारतातील असून त्याची लागवड पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांत केली जाते. याखेरीज शोभेकरिताही तो लावतात. सह्याद्री परिसरात त्याची सॅ. लॉरिफोलियस ही जाती आढळते. मात्र सॅ. ट्रायफोलिएटस आणि सॅ. लॉरिफोलियस ही एकाच वनस्पतीची नावे आहेत, असे वैज्ञानिकांचे मत आहे. भारतात रिठ्याची सॅ. मकेरोसी ही आणखी एक जाती आढळते. ती मूळची चीनमधील असून उत्तर भारतात लागवडीखाली आहे.
रिठा मध्यम आकाराचा वृक्ष असला तरी अनुकूल परिस्थितीत सु. २० मी. उंच वाढू शकतो. साल करडी व चकचकीत असून त्यावर खरबरीत व गळून पडणारे खवले असतात. पाने संयुक्त, एकाआड एक व मोठी असतात. प्रत्येक दल भाल्यासारखे, लंबगोल किंवा आयत आकाराचे असते. फुले लहान, नियमित व पांढरी असून स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात येतात. पुष्पवृंत ३ मिमी. लांब व लोमश असतो. निदलपुंज पाच दलांचे व तळाशी जुळलेले असते. दलपुंज पाच पाकळ्यांचे असून पाकळ्या सुट्या असतात. पुमांगात आठ सुटे पुंकेसर असतात. जायांग ऊर्ध्वस्थ व तीन संयुक्त अंडपींचे बनलेले असते. फुले हिवाळ्यात फुलतात. फुलांचा मोहोर आंब्याच्या मोहोरापेक्षा काहीसा लहान, लोमश आणि विरळ असतो. त्याचा रंग हिरवट पांढरा असून त्यात असंख्य व लहान फुले असतात. उन्हाळ्यात फळे तयार होतात. ती गोलसर व बोराएवढी परंतु स्पष्टपणे त्रिभागी असतात. बिया काळ्या, वाटाण्यापेक्षा दुप्पट आकाराच्या, गोल व कठीण असतात.
रिठ्याच्या फळांचा उपयोग मुख्यत: मळ काढण्यासाठी होतो. त्यात सॅपोनीन वर्गातील संयुगे असतात. ही संयुगे पाण्यात विरघळणारी ग्लायकोसाइडे आहेत. रिठ्याची फळे पाण्यात घुसळल्यास त्यांतील सॅपोनिने फेस तयार करतात. म्हणून त्यांचा उपयोग साबणासारखा केला जातो. लोकरी, रेशमी आणि नाजूक व तलम सुती कपडे धुण्यासाठी रिठे वापरतात. हल्ली त्यांचा उपयोग वॉशिंग पावडरमध्ये सुद्धा करतात. सोन्याचे दागिने स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी आणि साबण, शाम्पू व टूथपेस्ट बनविण्यासाठी तसेच कीटकनाशकांमध्ये रिठ्याची फळे वापरली जातात. मूळ व फळे आयुर्वेदिक आणि युनानी उपचार पद्धतींत औषधे म्हणून उपयोगात आणली जातात. दमा, अर्धशिशी, सांधेसूज, विंचुदंश इ. विकारांवर फळे गुणकारी मानतात. रिठ्याचे लाकूड कठीण, जड आणि पिवळसर रंगाचे असते. ते बांधकामासाठी आणि बैलगाड्या तयार करण्यासाठी वापरतात. बियांपासून रोपे तयार करता येतात. रस्त्याच्या कडेला सावलीसाठी, उद्यानात शोभेसाठी आणि वनशेतीसाठी रिठा हा एक उपयोगी वृक्ष आहे.
आपल्याकडे हे देशी वृक्ष महापालिकेने रस्त्याच्या मध्यभागी लावायला हवेत. वृक्षाची जोपासना होईल व देशी झाडे टिकतील!