वसंतकुमारी, एम. एल. : (३ जुलै १९२८ – ३१ ऑक्टोबर १९९०). कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका व संगीतकार आणि ख्यातकीर्त चित्रपटगीत गायिका. त्यांचे पूर्ण नाव मद्रास ललितांगी वसंतकुमारी. त्या ‘एमएलव्ही’ या नावानेही लोकप्रिय आहेत. पुरुषप्रधान गायन संस्कृतीमध्ये त्यावेळी एम. एल. वसंतकुमारी आणि त्यांच्या समकालीन डी. के. पट्टम्मल, एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना कर्नाटक संगीतातील महिला त्रिमूर्ती म्हणून गौरविण्यात आले होते.
वसंतकुमारी यांचा जन्म मद्रास येथे एका सांगीतिक परंपरा लाभलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील कुथनूर अय्या स्वामी अय्यर हे सुप्रसिद्ध संगीतकार होते; तर त्यांची आई ललितांगी यादेखील एक उत्तम संगीतकार होत्या; मात्र आपल्या मुलीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. वसंतकुमारी यांचे शालेय शिक्षण मद्रास येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. तेथे त्यांनी इंग्रजी या विषयामध्ये प्राविण्य प्राप्त केले. घरातील सांगीतिक वातावरणामुळे त्यांना संगीताची सवय व आवड होती. एकदा प्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार जी. एन. बालसुब्रमण्यम् (गुडलूर नारायणस्वामी बालसुब्रमण्यम्) यांनी वसंतकुमारींचे गायन ऐकले आणि त्यांना संगीत शिकवण्याचा त्यांच्या आईवडिलांकडे आग्रह धरला. तेव्हापासून जीएनबी यांच्याकडे त्यांचे संगीताचे विधिवत शिक्षण सुरू झाले. त्यांच्या वसंतकुमारी या पहिल्या शिष्या. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वसंतकुमारी यांनी काळजीपूर्वक व परिश्रमाने संगीतातील गुण आत्मसात केले; मात्र या काळात त्यांनी आपल्या गुरूंचे कधी अनुकरण केले नाही. त्यांनी आपल्या गुरूंप्रमाणेच आपल्या मूळ गाण्याची स्वतंत्र शैली विकसित केली.
वयाच्या १२ व्या वर्षी १९४० मध्ये एम. एल. वसंतकुमारी यांचे पहिले स्वतंत्र गायन शिमला येथे झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर त्यांनी बंगलुरूमध्ये आपले एकल गायन सादर केले. त्यावेळी त्यांची पहिली ७८ आरपीएम ध्वनिमुद्रिकादेखील तयार करण्यात आली. या ध्वनिमुद्रिकेमुळे त्या काळातील अनेक पुरुष गायक, संगीतप्रेमी, संगीत कलावंत यांच्यामध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्या अलौकिक सांगीतिक गुणांमुळे १९५० पर्यंत त्या एक प्रतिभाशाली कलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्या.
वसंतकुमारी या रागांतील अलापना व नरावल (कर्नाटक संगीतातील रागगायन शैली) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे उत्कृष्टपणे सादर करत. अत्यंत तरलता आणि आश्चर्यकारक स्वरसंयोजनासह सर्जनशीलपणे त्या स्वरप्रस्तार करीत. वसंतकुमारीच्या कृत्यांमध्ये (कर्नाटक संगीतातील वैशिष्ट्यपूर्ण संगीतरचना) सामान्यत: रागम्, थनम्, पल्लवी, वर्णम्, संकरीभरणम्, कल्याणी, भैरवी, कंबोजी, तोडी, खरारप्रिया या प्रमुख रागांतील कृत्यांशिवाय अमृतावर्शिनी, मोहनम्, अरबी, अंडोलीका, हिंदोलम्, पुर यांसारख्या रागांतल्या कृत्यांचाही समावेश होतो. त्यांनी कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध संगीतकार व संतकवी असलेल्या नारायण तीर्थ यांची ‘कल्याण गोपालम्’ आणि पुरंदरदासांची ‘व्यंकटचला निलयम्’ ह्या रचना राग सिंधू भैरवी रागामध्ये प्रस्तुत करून लोकप्रिय केल्या. तसेच पुरंदरदासांच्या गीतांचे उत्कृष्ट प्रस्तुतीकरण हे एम. एल. वसंतकुमारी यांच्या मैफलींचे प्रमुख आकर्षण असे.
वसंतकुमारी यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत मैफली केल्या. त्यामध्ये मृदंगवादक पालघाट टी. एस. मणी अय्यर तसेच मन्नारगुडी एस्वरण, श्रीमुष्णम् व्ही. राजा राव, सेरकाझी जे. स्कंदप्रसाद, थिरूवरूर भक्तवत्सलम्, आर. रमेश, कराईकुडी कृष्णमूर्ती, जी. हरिशंकर इत्यादींचा समावेश आहे. व्हायोलिनवादक ए. कन्याकुमारी यांच्यासोबत त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ मैफली गाजवलेल्या आहेत.
१९४६ पासून एमएलव्ही यांनी आपली पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली. त्यांचा पहिला मोठा चित्रपट मन मागल (१९५१) हा होता. यामध्ये त्यांनी रागमालिकेमधील एल्लाम इनबामयम हे गीत तसेच सुब्रमण्यम् भारथियर यांची सदाहरित रचना चिन्ननचिरू किलियाए गायले होते. त्यांनी अनेक हिंदी आणि पाश्चात्त्य गीतांवर आधारित गीतेही गायली. त्यांमध्ये अय्या सामी, कोंजुम पुरवे इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. त्यांनी मुन्नीता पवलींचू नागशयना हे दशावतारावरील गायलेले गीत गाजले.
एम. एल. वसंतकुमारी यांनी १९५१ मध्ये विकटम् आर. कृष्णमूर्ती यांच्याशी लग्न केले. त्यांना के. शंकररामन हा मुलगा आणि के. श्रीविद्या ही मुलगी होती. त्यांची मुलगी के. श्रीविद्या या उत्तम गायिका आणि दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
एम. एल. वसंतकुमारी यांनी १९४६–७० ह्या कालावधीत हिंदी, कन्नड, मलयाळम्, तेलुगू आणि तमिळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांमधून पार्श्वगायन केले. या चित्रपटांमधील गाणी खूप गाजली. या चित्रपटांमध्ये मिस्टर संपत (१९५२), चोरी चोरी (१९५६) या हिंदी चित्रपटांचा; बेदरा कण्णप्पा (१९५४), मायाबाजार (१९५७), भूकैलास (१९५८), श्री पुरंदरा दासरू (१९६७) या कन्नड चित्रपटांचा; प्रसन्ना (१९५०), आशादीपम् (१९५३), चथूरंगम् (१९५८), सिथा (१९६०), शकुंतला (१९६५) इत्यादी मलयाळम् चित्रपटांचा आणि नववीथे नवरत्नलु, सौदामिनी (१९५१), इन्स्पेक्टर (१९५३), कालहस्ती माहात्म्य (१९५४), जयभेरी (१९५९) इत्यादी तेलुगू चित्रपटांचा समावेश होतो. त्यांनी सर्वाधिक पार्श्वगायन तमिळ चित्रपटांमध्ये केले त्यांत कृष्णभक्ती, राजमुक्ती (१९४८), कांचना, पनम्, पराशक्ती, श्यामला (१९५२),कावेरी, महेश्वरी (१९५५), मदुराई वीरन् (१९५६), भक्त रावण (१९५८), मनीमेकलाई, मीन्नल वीरन् (१९५९), मन्नाधी मन्नान, मींदा सोरगम, राजा देसिंगू, थिलकम् (१९६०), मल्लियम मंगलम् (१९६१), विक्रमाधीथन (१९६२), रंगूला रत्नम् (१९६६) इत्यादी अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
वरील चित्रपटांतील गीते कर्नाटक संगीतातील अनेक ख्यातनाम संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली आहेत. एम. एल. वसंतकुमारी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटगीतांचे पार्श्वगायन केले. यामध्ये एस. दक्षिणामूर्ति, जी. रामनाथन, सी. आर. सुब्बुरमन, एस. एम. सुबय्या नायडू, के. राघवन, के. व्ही. महादेवन, मास्टर वेनवा, चित्तोर व्ही., वेधा, विश्वनाथन राममूर्ती, जी. व्ही. दक्षिणामूर्ति, आर. गोवर्धनम्, नागैय्या, जी. अस्वस्थामा, टी. जी. लिंगप्पा, एस. व्ही. वेंकटरमण, के. जी. मूर्ती, जी. देवराजन, एस. राजेश्वरराव, सी. एन. पांडुरंगन, पेंदयाला नागेश्वरा राव, के. राघवन, जी. गोविंदाराजूलु नायडू, टी. ए. कल्याणम् इत्यादी अनेक संगीतकारांचा समावेश आहे. त्यांनी कर्नाटकातील ख्यातकीर्त गायक व गायिकांसोबत युगलगीतांचे पार्श्वगायन केले.
एम. एल. वसंतकुमारी या एक उत्कृष्ट गायिका, संगीतकार, पार्श्वगायिका होत्या. त्याचप्रमाणे त्या एक उत्तम गुरुही होत्या. आपल्या सांगीतिक प्रवासामध्ये त्यांनी आपल्या गुरूकडून प्राप्त केलेले ज्ञान आपल्या शिष्यांना भरभरून देत अनेक उत्तम शिष्य तयार केले. ज्यामध्ये त्यांची मुलगी श्रीविद्या, तर प्रथम शिष्या म्हणून सरस्वती श्रीनिवास यांच्यासोबतच सुधा रघुनाथन्, चारुमती रामचंद्रन्, ए. कन्याकुमारी, यमुना अरुमुगम्, व्ही. कावेरी, मीना सुब्रमण्यन्, योगम संथानम्, त्रिचूर व्ही. रामचंद्रन, रोझ मुरलीकृष्णन्, टी. एम. प्रभावती, जयंती मोहन, सरस्वती श्रीनिवासन् इत्यादी शिष्य गायक-गायिका व संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची शिष्या जी. कृष्णमूर्ती यांनी सुरू केलेल्या ऋषी व्हॅली या विद्यालयामध्येही त्यांनी संगीताचे शिक्षण दिले.
एम. एल. वसंतकुमारी यांना त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांमध्ये भारतीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७०), म्हैसूर विद्यापीठ यांच्याद्वारे पुरंदरदास यांच्याबद्दल केलेल्या विशेष कार्यासाठी पीएच. डी. पदवी (१९७६), भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा नागरी सन्मान (१९७७), मद्रास संगीत अकादमीकडून संगीत कलानिधी या विशेष पुरस्काराने सन्मानित (१९७७), भारतीय ललित कला संस्थान, चेन्नई यांच्याकडून संगीत कलासिखमनी पुरस्कार (१९८७) इत्यादींचा समावेश आहे.
एम. एल. वसंतकुमारी यांचे वयाच्या ६२व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले.
संदर्भ :
- श्रुती मॅगझिन, द श्रुती फाउंडेशन, एम.एल.वसंतकुमारी, चेन्नई, जून २०११.
- रूपा गोपाल, अ नाइटिंगेल कॉल्ड एमएलव्ही, द हिंदू, डिसेंबर, २००९.