पृथ्वीवरील वातावरणाच्या उच्च थरातून अतिशय वेगाने, नागमोडी वळणांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण रितीने वाहणाऱ्या हवेच्या प्रवाहांच्या लांब व अरुंद पट्ट्याला झोतवारा असे म्हणतात. तरंगाच्या रूपात झोतवारे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्धांभोवती वाहतात. यातील वाऱ्याची दिशा सामान्यपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. ऋतुनुसार ते आपले स्थान, स्थिती, उंची, गती आणि दिशा सतत व अचानक बदलत असतात. त्यामुळे त्यांचे अचूक पूर्वानुमान सांगता येत नाही. ते उभ्या व क्षितिजसमांतर अशा दोन्ही दिशांनी वाहतात. उष्ण आणि थंड वायुराशी जेथे मिळतात, त्यांदरम्यानच्या प्रदेशातून झोतवारा मार्गक्रमण करित असतो. झोतवार्‍याच्या सर्वांत प्रबळ वा जोरदार वार्‍यांचा गाभा सुमारे ९७ किमी. रुंद व सुमारे १.६ किमी. जाड असून त्याची लांबी मोठ्या प्रमाणात बदलते; मात्र ती सरासरी ४,८०० किमी. असते. हे वारे ताशी १०५ किमी. पेक्षा जास्त गतीने वाहतात आणि त्यांची गती ताशी ३२० किमी. पेक्षा जास्त व ५०० किमी. पर्यंत आणि केंद्रापाशी हजारो किमी. असू शकते.

पृथ्वीजवळ असलेल्या वातावरणाच्या तपांबर स्तराच्या मधल्या किंवा वरच्या भागातून किंवा स्थितांबर थराच्या खालच्या भागातून वाहणारे तीन प्रमुख झोतवारे आढळतात. ते जमिनीच्या वर १० ते १५ किमी. उंचीवर असतात. ध्रुवीय झोतवारा, उपोष्ण कटिबंधीय झोतवारा आणि विषुववृत्तीय झोतवारा हे प्रमुख झोतवारे होत. ध्रुवीय झोतवाराप्रणाली अधिक शक्तीशाली, तर उपोष्ण कटिबंधीय झोतवाराप्रणाली कमी तीव्रतेची असते. ध्रुवीय झोतवारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. उत्तर गोलार्धात त्याचे स्थान मोठ्या प्रमाणात इतके बदलते, की नकाशात तो दाखविता येत नाही; परंतु उन्हाळ्यात तो सर्वसाधारणपणे ३०° ते ६०° उ. अक्षवृत्तीय पट्ट्यात आढळतो. उपोष्ण कटिबंधीय झोतवारा उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यावर आढळतो. समशीतोष्ण कटिबंधीय झोतवाराही पूर्वेकडे वाहतो. ध्रुवीय व उपोष्ण कटिबंधीय हे दोन्ही झोतवारे उन्हाळ्यात कमजोर (दुर्बळ) होतात आणि ते अधिक उत्तरेकडे स्थलांतर करतात. विषुववृत्तीय झोतवारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. तो ध्रुवीय व उपोष्ण कटिबंधीय झोतवार्‍यांप्रमाणे पृथ्वीभोवती चक्राकार फिरत नाही. विषुववृत्तीय झोतवारा आग्नेय आशिया व आफ्रिका यांच्यावर आणि फक्त उन्हाळ्यात आढळतो. त्याचा परिणाम भारतासह आग्नेय आशिया व आफ्रिका येथील उन्हाळी मॉन्सूनच्या निर्मितीवर आणि कालावधीवर होतो. इतर झोतवारे यांच्यापेक्षा अधिक उंचीवर आढळतात. उदा., ध्रुवीय रात्र झोतवारा तपांबराच्या वर असणाऱ्या स्थितांबर या वातावरणीय स्तरात आढळतो. हा पूर्वेकडे वाहतो व फक्त हिवाळ्यात आढळतो.

झोतवाऱ्याच्या निर्मितीस व त्यातील वाऱ्याच्या दिशेला पृथ्वीचे परिवलन, ऋतू, पृथ्वीवरील तापमानाच्या वितरणातील भिन्नता हे घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. झोतवाऱ्याचा परिणाम हवामान, हवाई वाहतूक आणि वातावरणातील इतर घटकांवर होतो. दुसऱ्या महायुद्धापर्यंत झोतवारे व्यापकपणे माहीत झालेले नव्हते. त्या काळात अमेरिकी व जर्मन वैमानिकांना त्यांचा अतिउंच ठिकाणी प्रत्यय आला. झोतवार्‍यांमधून वा झोतवार्‍यांजवळून जाणार्‍या विमानाच्या गतीवर या जोरदार वार्‍यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांच्यामधील व त्यांच्या जवळच्या भागातील जोरदार वार्‍यांच्या प्रेरणेमुळे (जोरामुळे) त्यांच्या जवळून जाणार्‍या विमानाला संक्षोभचा प्रत्यय येऊ शकतो. हा संक्षोभ धोकादायकही ठरू शकतो. झोतवाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या विमानांची गती कमी होऊन इंधन जास्त लागते. याउलट, झोतवाऱ्याच्या दिशेला अनुसरून जाणाऱ्या विमानांची गती वाढते आणि इंधन कमी लागते. त्यामुळे विमानांच्या उड्डानांचे नियोजन करणे, हे अतिशय कौशल्याचे असते. पृथ्वीच्या हवामानावरही झोतवार्‍यांचा प्रभाव पडतो. झोतवार्‍यातील हवेचे प्रवाह पुष्कळदा वादळांशी आणि घूर्णवाती वादळांशीही निगडित असतात.

समीक्षक : वसंत चौधरी