पृथ्वीगोलावरील घन भाग (शिलावरण) आणि बाहेरचे वायुरूप वातावरण यांच्यापेक्षा वेगळा ओळखला जाणारा पाण्याचा भाग म्हणजे जलावरण होय. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने म्हणजे जलावरणाने व्यापला आहे. त्यामुळे या ग्रहाला ‘निळा ग्रह’ किंवा ‘जलरूप ग्रह’ असे संबोधले जाते. पृथ्वीवरील हे पाणी द्रवरूपात वा घनरूपात (हिम, बर्फ) आहे. जलावरणात महासागर (सुमारे ९३ टक्के), दोन्ही ध्रुवीय प्रदेशांवरील हिमबर्फ (सुमारे २ टक्के), जमिनीवरील व आतील पाणी (सुमारे ५ टक्के), वातावरणातील बाष्प (सुमारे ०.००१ टक्का) यांचा अंतर्भाव होतो. पृथ्वीवरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७.५ टक्के खारे पाणी आणि फक्त २.५ टक्के गोडे पाणी आहे. एकूण गोड्या पाण्यापैकी ६८.९ टक्के कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ आणि हिमाच्या स्वरूपात, ३०.८ टक्के भूमिगत पाण्याच्या स्वरूपात आणि फक्त ०.३ टक्के पाणी नद्या, नाले, सरोवरे, जलाशय इत्यादीमध्ये आढळते.
महासागर, भूमिजल, खडकांच्या पोकळ्यांतील व खनिजांमधील पाणी, हिमनद्या तसेच हिम-बर्फ यांतील गोठलेले पाणी, वितळलेल्या अग्निज खडकांतील वा शिलारसातील नवजात पाणी, उन्हाळ्यांमधील (गरम पाण्याच्या झऱ्यांमधील) व गायझरांमधील पाणी, तसेच नदी, नाले, सरोवरे, जलाशय, डबकी इत्यादींमधील पाणी यांचा जलावरणात अंतर्भाव होतो.
पृथ्वीवरील महासागरातील पाण्याची सरासरी लवणता दर हजारी ३५ भाग एवढी आहे; परंतु त्यात स्थलपरत्वे बराच फरक आढळतो. सागरी पाण्यात पन्नासहून अधिक मूलद्रव्ये, तसेच कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रोजन, अल्प प्रमाणात ऑक्सिजन व हायड्रोजन सल्फाइड हे वायूही असतात. गोड्या पाण्यातही अल्प प्रमाणात घन पदार्थ विरघळलेले असतात. हे घटक पाण्याच्या संपर्कातील खडक व मृदा यांतून आलेले असतात.
जलावरण व वातावरण यांमध्ये काही सारखेपणा आढळतो. दोन्ही द्रव व वायुरूपांत असू शकतात. या दोन्हींचे तापमान व दाब भिन्न खोलींवर बदलू शकतात. खूप खोलीवर पाण्याचे तापमान गोठणबिंदूच्या जवळपास असू शकते. पॅसिफिक महासागरात जलावरणाची कमाल खोली १० किमी. पेक्षा अधिक आहे.
पृथ्वीवरील सर्व पाण्याचे घनफळ १४० अब्ज घ. किमी. आहे. इ. स. सुमारे १ अब्ज वर्षांत पाण्याची एकूण राशी स्थिर राहिली आहे, असे आधुनिक संशोधनाद्वारे सूचित झाले आहे. अर्थात, जलावरणाच्या घटकांमधील पाण्याच्या घनफळांत भूवैज्ञानिक काळात झालेले बदल यात येत नाहीत. उदा., प्रमुख हिमयुगांच्या कालावधीत महासागरातील बरेच पाणी खंडांवरील हिमस्तरांमध्ये स्थानांतरित झाले होते.
जलावरणाच्या अभ्यासाच्या केंद्रभागी जलस्थित्यंतर चक्र (जलचक्र) असते. जलावरणातील सर्व प्रकारचे पाणी जलस्थित्यंतर चक्रामधून सतत फिरत वा वाहत असते. बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, वर्षण, अडविले जाणे, जमिनीत झिरपणे, निचरा होणे व पसरणे, जमिनीवरून वाहणे, इत्यादी गुंतागुंतीच्या प्रक्रियांद्वारे पाणी महासागरातून वातावरणात, तेथून खंडांवर, जमिनीत आणि महासागरात असे हे चक्र चालू असते. हे चक्र सतत चालू असले, तरी जलावरणाच्या घटकांची स्थिती व स्थान यांमध्ये एकसारखे बदल होत असतात. यामुळे पाण्याची एकूण राशी संतुलित राहत असते.
आधुनिक समाजाच्या व्यवहारांचे जलावरण व प्रत्यक्ष जलस्थित्यंतर चक्र यांच्या घटकांवर गंभीर परिणाम होत आहेत. विषारी रसायने व इतर औद्योगिक अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये) पाण्यात पडत असल्याने जलप्रवाह संदूषित होत आहेत. रासायनिक खते भूमिजलात पाझरतात; तर सांडपाणी नद्या, नाले, जलाशय यांत सोडले जाते. यांमुळे पाण्यातील फॉस्फरस, नायट्रोजन व इतर वनस्पतिपोषक द्रव्ये यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. कार्बन डाय-ऑक्साइड व इतर तथाकथित हरितगृह वायूंचे वातावरणातील वाढते प्रमाण, तसेच निर्वनीकरणासाठीची वृक्षतोड, लाकूड जाळणे, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारखी जीवाश्म इंधने जाळली जात असल्याने जागतिक तापमानात वाढ होत आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत भूपृष्ठाच्या मध्य तापमानात ५° से.पर्यंत वाढ होऊ शकेल. तापमानात वाढ झाल्याने जलस्थित्यंतर चक्राची गती वाढेल. त्यामुळे विविध प्रदेशांतील जलसंतुलन बिघडेल. विशेषतः उत्तर गोलार्धातील मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात हा परिणाम जाणवेल. जागतिक तापमानवाढीचा जलस्थित्यंतर चक्रावर आणखी परिणाम होईल. म्हणजे ध्रुवांवरचे हिमटोप व पर्वतांवरील हिमनद्या यांमध्ये घट्टपणे अडकून पडलेला बर्फ वितळेल. बर्फ वितळून तयार झालेले पाणी महासागरात जाईल आणि अनेक शतकांच्या कालावधीत समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होऊ शकेल. आर्क्टिक समुद्रातील बर्फही वितळू शकेल. यामुळे वादळाची हालचाल उत्तरेकडे सरकेल आणि वसंत व शरद या ऋतूंमध्ये उत्तर गोलार्धातील पर्जन्यमानात घट होईल.
समीक्षक : वसंत चौधरी