कॅनडातील मॅनिटोबा प्रांताच्या दक्षिणमध्य भागातील एक सरोवर. या सरोवराची लांबी सुमारे २०० किमी., रुंदी ४५ किमी., खोली ७ मीटर आणि विस्तार ४,६२४ चौ. किमी. आहे. मॅनिटोबा प्रांताची राजधानी असलेल्या विनिपेग या शहराच्या वायव्येस ७२ किमी. वर हे सरोवर आहे. मॅनिटोबा, विनिपेग, विनिपेगोसस आणि सीडार या चार मोठ्या सरोवरांचा एक गट असून मॅनिटोबा हे त्यांतील सर्वांत लहान सरोवर आहे. एकेकाळच्या (इतिहासपूर्वकालीन) ॲगसी या हिमानी सरोवराच्या जागेवर ही सरोवरे स्थित आहेत. मॅनिटोबा सरोवर अनियमित आकाराचे आहे. एकमेकांना जोडलेल्या, परंतु दोन स्वतंत्र द्रोणींमध्ये मॅनिटोबा सरोवराचा विस्तार झालेला आहे. त्यांपैकी उत्तरेकडील द्रोणीमधील सरोवराचा भाग लहान व अनियमित आकाराचा, तर दक्षिणेकडील द्रोणीमधील सरोवराचा भाग अधिक मोठा आहे.
मॅनिटोबा सरोवराला विनिपेगोसस सरोवरातून बाहेर पडणार्या वॉटरहेन नदीद्वारे आणि इतर अनेक प्रवाहांद्वारे पाणीपुरवठा होतो. सरोवरातून बाहेर पडणारी फेअरफर्ड नदी – सेंट मार्टिन सरोवर – डॉफन नदी या मार्गाने हे सरोवर विनिपेग सरोवराला मिळते. पूरनियंत्रणासाठी फेअरफर्ड नदीवर धरण बांधण्यात आले आहे. व्यापारी मासेमारीसाठी हे सरोवर महत्त्वाचे आहे. येथे प्रामुख्याने हिवाळ्यात मासेमारी केली जाते. सरोवराच्या दक्षिण टोकाजवळ डेल्टा मार्श हा दलदली प्रदेश असून तो स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
फ्रेंच फर व्यापारी ला व्हेरेंद्री यांनी इ. स. १७३८ मध्ये या सरोवराचा शोध लावला. व्हेरेंद्री यांनी या सरोवरास लॅक देस प्रेअरीज हे नाव दिले होते. मॅनिटोबा हे नाव अलगॉनक्वीअन इंडियन शब्द मॅनिटो-बाऊपासून आले असावे असे मानले जाते.
समीक्षक : वसंत चौधरी