स्वित्झर्लंडमधील सर्वांत मोठे सरोवर. स्वित्झर्लंडच्या पश्चिम भागातील जुरा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या स्वीस पठारावर, समुद्रसपाटीपासून ४२९ मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. या सरोवराची लांबी ३८ किमी., रुंदी ६ ते ८ किमी., सरासरी खोली ६४ मी., कमाल खोली १५३ मी. आणि क्षेत्रफळ २१८ चौ. किमी. आहे. सरोवराचा सर्वाधिक विस्तार न्यूशटेल कँटनमध्ये असून त्याशिवाय व्हो, फ्रीबुर्ग आणि बर्न या कँटनमध्येही या सरोवराचा विस्तार झालेला आहे. न्यूशटेल कँटनवरूनच या सरोवराला हे नाव देण्यात आलेले आहे. सरोवराच्या नैर्ऋत्य टोकाशी थील ही नदी या सरोवरात प्रवेश करते आणि ईशान्य टोकाशी ती सरोवरातून बाहेर पडते. याशिवाय अरूशी आणि ब्रॉयी या दोन प्रमुख नद्या सरोवराला मिळतात.
न्यूशटेल सरोवरापासून जवळच पूर्वेच्या बाजूस मॉरॉ (मुर्टन) हे सरोवर आहे, तर ईशान्येस पाच किमी. वर बील (बायेन) हे सरोवर आहे. ही तीनही सरोवरे प्राचीन काळातील हिमानी सरोवरांचे, जुरा पर्वताच्या पायथ्यालगतच्या अर नदीच्या खालच्या खोऱ्यातील अवशेष आहेत. ही तीनही सरोवरे निसर्गसुंदर नद्या आणि कालव्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यांपैकी मॉरॉ (मुर्टन) हे सरोवर ब्रॉये नदी व कालव्याने, तर बील हे सरोवर थील-झील या नदी व कालवामार्गाने न्यूशटेल सरोवराशी जोडलेले आहे. त्यामुळे एका सरोवरातून दुसऱ्या सरोवरात असा सहज प्रवास करण्याचा आनंद घेता येतो. तसेच ती बोटींच्या साहाय्याने एकमेकांशी जोडलेली आहेत. सरोवरालगतच्या पर्वतमाथ्यावरून येथील तीनही सरोवराचे सुंदर विहंगम दृश्य दिसते. सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील ला टेन येथे प्रागैतिहासकालीन व पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. सरोवर व त्याचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. सरोवराच्या परिसरातील सौम्य हवामान, निसर्गसुंदर परिसर, लगतचे राष्ट्रीय उद्यान, समृद्ध जैवविविधता, अरण्यातील काही दुर्मिळ पशु-पक्ष्यांचा अधिवास, वनस्पतींच्या दुर्मिळ जाती, परिसरातील द्राक्षमळे, किनाऱ्यावरील रोमन साम्राज्यकालीन आणि मध्ययुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेली काही ऐतिहासिक नगरे व खेडी, क्रूझ जहाजातून सरोवरपर्यटन सुविधा, नौकानयन व जलक्रीडा तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध असणाऱ्या इतर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवासुविधांमुळे पर्यटक मुद्दामहून या व इतर सरोवरांतून व सरोवराच्या परिसरातून फिरण्यासाठी तसेच परिसरातील नगरे आणि खेड्यांना भेटी देण्यासाठी येतात; परंतु वाढत्या प्रदूषणामुळे पोहण्यासारख्या काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
सरोवराच्या किनारी प्रदेशात वाहतूकमार्गांचे दाट जाळे निर्माण केले गेल्यामुळे तेथील आर्थिक विकासही चांगला झालेला आहे. २०२१ च्या उन्हाळ्यात यूरोपच्या मुख्य भूमीवरील विस्तृत पूरपरिस्थितीमुळे सरोवरातील पाणी ऐतिहासिक दृष्ट्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर बील, वायव्य किनाऱ्यावरील न्यूशटेल, दक्षिण किनाऱ्यावरील ईव्हेरडों, ईस्टाव्हेयर-ली-लॅक, नैर्ऋत्य किनाऱ्यावरील ग्रांसो ही सरोवरच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. वायव्य किनाऱ्यावरील न्यूशटेल कँटन हा प्रदेश दाट लोकवस्तीचा भाग असून तेथील पर्वताच्या उतारावर मोठ्या संख्येने द्राक्षबागा आढळतात. सरोवराचा परिसर वाइन, बेलबुट्टीदार कापड, इंडियनी कापड (छापील नक्षीदार कापड) उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. न्यूशटेल हे शहर घड्याळांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
समीक्षक : नामदेव स. गाडे