ऑस्ट्रेलियातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. देशाच्या मध्य भागात असलेल्या ग्रेट ऑस्ट्रेलियन द्रोणीच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात हे सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीपासून १५ मीटर खाली असून ऑस्ट्रेलिया खंडातील हा सर्वांत निम्नतम भाग आहे. तुलनेने हे सरोवर बरेच उथळ आहे. सरोवराचा परिसर अतिशय कमी किंवा खंडित स्वरूपातील पर्जन्याचा असून येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५ मिमी. पेक्षाही कमी आहे. खंडांतर्गत जलवाहन खोऱ्यांतून या सरोवराला पाणीपुरवठा होतो. येथे बाष्पीभवनाचा वेग खूप जास्त असल्यामुळे या द्रोणी प्रदेशातील बहुतांश नद्या सरोवरापर्यंत पोहचण्यापूर्वीच कोरड्या पडतात. केवळ ज्या वेळी या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो, त्याच वेळी डायमँटिना आणि इतर नद्यांद्वारे सरोवराला पाणीपुरवठा होतो.

सरोवराच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला तरच ते भरते; अन्यथा बऱ्याच वेळा ते कोरडेच असते. सरोवराचे उत्तर आणि दक्षिण असे दोन स्वतंत्र भाग असून १३७ मी. रुंदीच्या गॉयडर चॅनेलने ते एकमेकांना जोडले गेले आहेत. दोन्हींची पाणलोटक्षेत्रे स्वतंत्र आहेत. त्यांपैकी लेक एअर नॉर्थ हा १४४ किमी. लांब, ६५ किमी. रुंद आणि स. स.पासून ७.६ मी. खाली आहे, तर लेक एअर साउथ हा ६५ किमी. लांब, २४ किमी. रुंद आणि स. स.पासून ११.९ मी. खाली आहे. सरोवराच्या पश्चिम भागातून मिळालेल्या काही पुराव्यांवरून सांप्रत लवणमय सरोवराचा खळगा सु. ३०,००० वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग खचून निर्माण झालेला असावा. या अध:क्षेपामुळे सरोवराचा समुद्राकडे जाणारा पूर्वीचा निर्गममार्ग बंद झाला.

इंग्लिश वसाहतकार एडवर्ड जॉन एअर या पहिल्या यूरोपीय व्यक्तीने १८४० मध्ये या सरोवराचा शोध लावला. जी. डब्लू गॉयडर याने १८६० मध्ये हे सरोवर नकाशात दाखवून एडवर्ड एअर याच्या नावावरून त्याला एअर हे नाव दिले. तेव्हापासून ते एअर सरोवर या नावाने ओळखले जाऊ लागले. रॉबर्ट ओहारा बर्क आणि विल्यम जे. विल्स हे दोन समन्वेषक या भागात हरवले होते. त्यांच्या शोधार्थ या सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरून १८६१ मध्ये जे. मॅकिन्ले फिरला होता. त्याच्या वृत्तांतानुसार येथील उंच गवताचा गवताळ प्रदेश आणि जलयुक्त प्रवांहामुळे आद्य पशुपालक या प्रदेशात आले असावेत. त्या वेळच्या अवर्षणकाळात आर्टेशियन विहिरींच्या माध्यमातून पाणी मिळविले जात असावे. १८७० च्या दशकात सरोवराचा विस्तार निश्चित करण्यात आला. जे. डब्लू लेविस याने १८७५ मध्ये या सरोवराचे विहंग छायाचित्रण (Aerial Photography) केले. सी. टी. मॅडिगन याने १९२९ मध्ये या सरोवराचा सविस्तर अभ्यास करून दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, सरोवरात आढळणाऱ्या ३८ – ४६ सेंमी. जाडीच्या मिठाच्या थरावरून मोटारगाडी चालविता येऊ शकेल. त्याच्या मते, सरोवराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रवाहांना वालुकागिरींनी अडविल्यामुळे सरोवर पुन्हा भरू शकणार नाही; परंतु त्याचा अंदाज खोटा ठरला. १९४९ मध्ये क्वीन्सलँड राज्यात आणि सरोवराच्या सभोवतालच्या प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरडे पडलेले प्रवाह भरून वाहू लागले. त्यामुळे सप्टेंबर १९५० मध्ये सरोवर जवळजवळ पूर्ण भरले गेले. सरोवर पूर्ण भरल्यापासून कोरडे पडेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या रॉयल जिऑग्रॅफिकल सोसायटीच्या साउथ ऑस्ट्रेलिया शाखेने या भागाच्या परिपूर्ण अभ्यासाचे काम हाती घेतले. त्या अभ्यासात येथील भूमिस्वरूपाची रचना, वैशिष्ट्ये, गुणधर्म, त्यातील उपसागर, बेटे, द्वीपकल्प इत्यादींचे सविस्तर वर्णन केलेले आहे. सरोवर पूर्ण भरल्यानंतर ते पुन्हा कोरडे पडण्यास दोन वर्षांचा कालावधी लागतो. १९५३ आणि १९५५ मध्ये अल्प प्रमाणात त्यात पाणी साचले आणि त्यानंतर ते कोरडे पडले. १९५० मध्ये उत्तर भागाचे जलक्षेत्र ८,०२९ चौ. किमी. होते. त्या वेळी सरोवर भरण्याच्या प्रक्रियेचे हवाई निरीक्षण करण्यात आले होते.

सरोवराचे उत्तर आणि पूर्व किनारे उत्तर-दक्षिण पसरलेल्या वालुकागिरींनी वेढलेले आहेत. त्यामुळे सरोवराला पाणीपुरवठा करणारे वॉरबर्टन आणि कूपरसारखे प्रवाह अभावानेच सरोवरापर्यंत पोहोचतात. पश्चिम किनारा प्री-कँब्रियन कालखंडात निर्माण झालेल्या खडकाळ भागाने आणि काही ठिकाणी कड्यांनी वेढलेला आहे. दक्षिण किनाऱ्यावर कमी उंचीचे खडक, गोटे (गिबर), मैदानी भाग आणि वाळूच्या टेकड्या आढळतात. येथील द्वीपकल्पाच्या सभोवती चुनखडकाचे कडे आढळतात.

सांप्रत या सरोवरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचे शीघ्र गतीने बाष्पीभवन होऊन सरोवराच्या तळावर मिठाचा पातळ थर तयार होतो. सरोवराच्या दक्षिण भागात निर्माण होणाऱ्या मिठाच्या थराची जाडी साधारणपणे ४६ सेंमी. असते. मिठाच्या या अत्यंत समतल पृष्ठभागाचा उपयोग जमिनीवरील वेगाचा विक्रम करण्यासाठी केला जातो. डोनाल्ड कँपबेल याने १७ जुलै १९६४ रोजी या समतल मिठाच्या थरावरून ब्लूबर्ड हे मोटार वाहन प्रतितास ६४८.७ किमी. वेगाने चालविण्याचा विक्रम केला.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा