नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात. अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते.
अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते. तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते. या दोन्ही वाटा अंकाई टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.
गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्त्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात. थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो. एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहेत. या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे. येथील एका लेण्यात देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते.
या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एक संकुल आहे. बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत. आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकोन करून उभा आहे. हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. या दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळया आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापि दिसून येतात. या दरवाजातून आत गेल्यावर अंकाई टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत प्रवेश होतो.
अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगराना उत्तम ताशीव कातळ कडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही; परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे. तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चर्या बांधलेल्या दिसतात. अंकाई किल्ल्याचे दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावच्या दिशेला कातळाममध्ये तीन लेण्या आहेत. यांपैकी दोन गुहा पाहता येतात; परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे.
खिंडीतून थोडे चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. हा दरवाजा देखील दोन दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस दोन भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरूज आहेत. यांपैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा असून आत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत. पुढे आणखी एक कमानयुक्त दरवाजा आहे. पुढे उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आहेत. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.
गडाचा दुसरा दरवाजा देखील संकुलातच बांधलेला आहे. यात एकूण दोन कमानयुक्त दरवाजे व मध्यभागी फक्त एक कमान अशी रचना आहे. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून या दरवाजाचे संकुल म्हणजे एक छोटा बोगदा आहे. तीव्र उतारावर हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजा पार करून खड्या कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर परत दोन दरवाजांचे मिळून एकत्र असे एक संकुल लागते. यांपैकी बाहेरील दरवाजा आयताकृती आकाराचा आहे. आतील दोन्ही बाजूंस बसण्यासाठी ओटे आहेत. पुढे एक कमानयुक्त दरवाजातून बाहेर पडून किल्ल्याच्या दिशेने जावे लागते. दोन दरवाजांचे हे संकुलसुद्धा एक छोटा बोगदा आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा आणखी एक भग्न दरवाजा दिसतो. येथून पुढे कातळातून खोदलेल्या मार्गाने गेल्यावर गडाचा शेवटचा भक्कम बांधणीचा कमानयुक्त दरवाजा लागतो.
गडावर प्रवेश केल्यावर दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. भौगोलिकदृष्ट्या गडाचे बालेकिल्ला आणि माची असे दोन भाग पडतात. माचीच्या सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर एक छोटी टेकडी आहे, त्याला बालेकिल्ला म्हणता येईल. माचीवर प्रवेश केल्यावर तीन घुमट असलेली एक वास्तू दिसते, ती म्हणजे हमामखाना. याच्या मागील बाजूस पाण्याचे टाके असून पुढे दोन लेण्या आहेत. या लेण्यांना सीता गुंफा असे संबोधले जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेण्या खोदलेल्या आहेत. सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्ती ऋषि यांची गुहा. या गुहेत अगस्ती ऋषिचे मंदिर असुन हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास बारमाही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथून पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते. या पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे. या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे. हि अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात. या तळ्यास काशीतळे असे नाव आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते, अशी आख्यायिका आहे.
तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला पिराचे एक ठिकाण आहे; परंतु मूळ वास्तूशी संबंधित नाही. अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बालेकिल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडी असा परिसर दिसतो.
टंकाई किल्ला पाहाण्यासाठी अंकाई किल्ला उतरून दोन्ही किल्ल्यांमधील खिंडीत परत यावे लागते. खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तर दिशेला असलेला दरवाजा पाहता येतो. हा उत्तराभिमुख दरवाजा भक्कम बांधणीचा असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे. टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी दिसून येतात. थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाची चौकट आणि कमान पुरातत्त्व विभागाने दुरुस्त केली असून (२०१९) बाजूच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे. मूळ बांधकामात हा पीर त्या जागेवर नसावा. टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे. या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात. पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे. मंदिराच्या भिंती शाबूत असून छत मात्र नाही. गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरूज असून गडावर काही इमारतींचे अवशेष आढळून येतात.
अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात आहेत. अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. अंकाई हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. शके ९७४ साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो. मोगल बादशाह शाहजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खानेखानान याने हा किल्ला जिंकून घेतला (१६३५). त्या आधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशाहीच्या ताब्यात होता. फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता. मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता. पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला (१७५२). या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतर (१८१८) इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने गडावर तोफांचा मारा केला, तेव्हा गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि अंकाई टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.
संदर्भ :
- Verma O. P. The Yadavas & their Times, Vidarbh Sanshodhan Mandal, Nagpur, 1970.
- पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०११.
- महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, इतिहास प्राचीन काळ, खंड १, भाग २, स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, २००८. समीक्षक : अंकुर काणे