महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहराच्या पश्चिमेस सु. ६ किमी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेतील एका घळीच्या दोन्ही बाजूंना एकूण सात लेणी खोदलेली आहेत. यांपैकी चार उत्तरेकडील भागात पश्चिमाभिमुख असून, तीन विरुद्ध दिशेला आहेत. या लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने, तसेच शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक शिव मंदिर आहे.

धाराशिव लेणी, उस्मानाबाद.

आजपर्यंत अनेक विद्वानांनी या लेण्यांवर प्रकाश टाकलेला आहे. जेम्स बर्जेस यांनी १८७६ साली सर्वप्रथम या लेण्यांचे वर्णन केले. त्यांनी लेण्यांचे तलविन्यास, तसेच काही स्तंभ, दरवाजे व शिल्पांची रेखाचित्रे बनविली. त्यानंतर हिरालाल जैन (१९३६), म. के. ढवळीकर (१९६५, १९६८ व १९७३), वा. वि. मिराशी (१९७२), विराज शाह (२००८) यांनी मोलाचे संशोधनकार्य केले.

पार्श्वनाथ मूर्ती, लेणे क्र. १, धाराशिव.

लेणे क्र. १. हे उत्तरेकडील चार लेण्यांच्या ओळीतील पश्चिम टोकाला खोदलेले एक अर्धवट लेणे असून, त्यात दोन स्तंभ व अर्धस्तंभयुक्त व्हरांडा (७.८ x २.१ मी.) व अर्धवट खोदलेला मंडप आहे. या लेण्यात सु. ११-१२व्या शतकातले एक सुटे जैन चौमुख शिल्प आहे. या लेण्याच्या पूर्वेला लेणे क्र.२ आहे. हे लेणे सर्वांत विशाल असून, तलविन्यासानुसार छतविरहित प्राकारयुक्त प्रांगण, व्हरांडा (ओवरी), स्तंभयुक्त मंडप व गर्भगृह अशी सर्वसाधारण रचना आहे. प्राकारयुक्त प्रांगणाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारावर गोलाकृती भागाच्या आतील बाजूस पार्श्वनाथाची मूर्ती आहे. लेण्याच्या ओवरीत प्रवेश करताना लागणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस गण कोरलेले आहेत, तसेच प्रांगणात डाव्या बाजूला चौरस पाया असलेली एक गोलाकृती रचना आहे. व्हरांडा, सहा स्तंभ व दोन अर्धस्तंभांवर आधारलेला आहे. अर्धस्तंभाचा मध्यवर्ती भाग चौकोनाकृती असून शीर्षभाग तरंग पोटिकेसह अलंकृत आहे. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला एक खोली व पोढी असून त्यात चौरसाकृती स्तंभ तसेच जिनाचे एक शिल्प व दोन चौमुख आहेत. खोलीच्या भिंतीवर जिनांच्या दोन प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. व्हरांड्याच्या डाव्या बाजूलाही एक रिकामी खोली आहे. मंडपाच्या दर्शनी भागाची बरीच पडझड झाली असून, बर्जेस यांनी नमूद करून ठेवलेली जैनशिल्पे, चैत्य गवाक्षे व इतर अलंकृत भाग सध्या अस्तित्वात नाहीत.

लेणे क्र. २ चे दृश्य, धाराशिव.

या लेण्याचा मंडप सु. २४ x २४ मी. असून आत जाण्यास तीन दरवाजे होते. मंडपात ३२ स्तंभ असून त्यांपैकी २० स्तंभांनी बाहेरचा, तर १२ स्तंभांनी आतील चौक झाला आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंना एकूण २२ खोल्या (निवासस्थाने) आहेत. गर्भगृहाच्या उजवीकडील दोन खोल्या वगळता इतर सर्व रिकाम्या आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत कायोत्सर्ग मुद्रेतील जिन कोरण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्यावर तीन दलयुक्त छत्र आहेत. जवळच एक चौमुख ठेवलेला आहे. गर्भगृहातील द्वारावर तीन सपाट शाखा आहेत. या चौकोनाकृती गर्भगृहात मध्यभागी प्रदक्षिणापथयुक्त पार्श्वनाथाची अर्धपद्मासन व ध्यान मुद्रेतील सिंहासनाधिष्ठित भव्य मूर्ती कोरलेली आहे. पार्श्वनाथांच्या डोक्यावर सप्तफणाधारी नाग आहे. सिंहासनाच्या पुढील भागावर भग्न चक्र व त्याच्या दोन्ही बाजूस समोरासमोर एक-एक सिंह व दोन-दोन हरिण कोरले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चामरधारी सेवक व मालाधारी विद्याधर आहेत. या व्यतिरिक्त या लेणीत काही सुटी शिल्पे असून, त्यामध्ये पाच चौमुख व एक पंचतीर्थिका दिसून येते. मंडपातील काही स्तंभांच्या शीर्षभागावर एका जिनासह काही भित्तिचित्रांचे अवशेष दिसून येतात.

जिन मूर्ती , लेणे क्र. २, धाराशिव.

लेणे क्र. २ च्या पूर्वेला लेणे क्र. ३ आहे. हे संपूर्ण लेणे बहुतांशी, लेणे क्र. २ सारखेच असून आकाराने थोडेसे लहान आहे. व्हरांड्यच्या स्तंभांना जोडणाऱ्या शीर्षपट्टीत चैत्यगवाक्षासह उत्कृष्ट कोरीव शिल्पे होती. ती सध्या अस्तित्वात नाहीत. व्हरांडा १८ मी. रुंद असून समोर ६ स्तंभ आणि २ अर्धस्तंभ आहेत. मंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखायुक्त असून यात २० स्तंभ आहेत. मंडपात १४ खोल्या असून गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत, मागील भिंतीत जिन कोरलेला आहे. गर्भगृह ५.७ x ५.४ मी. असून त्यात लेणे क्र. २ प्रमाणेच किंचित बदलासह पार्श्वनाथाची मूर्ती आहे.

लेणे क्र. ३ च्या बाजूला लेणे क्र. ४ आहे. यात एक खुले प्रांगण, मंडप व गर्भगृह आहे. मंडपात चार स्तंभ असून दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना दोन रिकाम्या खोल्या दिसतात. गर्भगृहात मागील भिंतीत पार्श्वनाथाची मूर्ती कोरलेली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या मागे प्रदक्षिणापथ नाही. या लेण्यात सुपार्श्वनाथाची अंबिका व क्षेत्रपालायुक्त एक सुटी मूर्ती आहे. या लेण्यातही भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. यानंतर घळ पार करून लेणे क्र. ५ येथे पोहोचता येते. हे एक अर्धवट शिल्पविरहित लेणे असून दोन खोल्या अव्यवस्थितपणे खोदलेल्या आहेत.

लेणे क्र. ५ च्या उजवीकडे वरच्या बाजूला लेणे क्र. ६ स्थित आहे. हे एक अर्धवट खोदलेले लेणे असून यात व्हरांडा, मंडप आणि गर्भगृह अशी रचना दिसते. व्हरांडा पूर्णपणे खोदलेला असून तो १३.३५ मी.रुंद व २.६ मी. खोल आहे. याला समोर चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. यानंतर मंडप असून तो काही प्रमाणात खोदलेला आहे. मंडपाचा आकार १३.०५ x ११.४ मी. असून आत १० स्तंभ कोरलेले आहेत. परंतु त्यांपैकी समोरील दोनच पूर्ण झालेले दिसतात. या स्तंभांची रचना लेणे क्र. ३ मधील स्तंभांसारखीच दिसते. भिंतीच्या मागील बाजूस             अर्धपद्मासनात पार्श्वनाथाची सप्तफणाधारी नाग असलेली एक मूर्ती कोरलेली आहे. सिंहासन साधारण असून आकृतीविरहित आहे. सेवकांपैकी फक्त एका चामरधारीणीचे रेखांकन पार्श्वनाथांच्या उजव्या बाजूला केलेले दिसते.

क्र. ७ चे वैष्णव पंथीय लेणे ६ व्या लेण्याच्या नैर्ऋत्येला आहे. यात केवळ १० स्तंभ व दोन अर्धस्तंभयुक्त एक व्हरांडा असून तो १८ मी. रुंद आहे. व्हरांड्याचा मागील भाग अर्धवट खोदून सोडलेला दिसतो. स्तंभांच्या वरच्या बाजूला प्रामुख्याने कृष्णलीलांचे शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत.

धाराशिव लेण्यांचा कालखंड बर्जेस यांनी इ. स. सु ६५०, नाईक यांनी. इ. स. सु ६०० ते ६५०, तर वॉल्टर स्पिंक यांनी इ. स. सु. ४८०-५०० ठरविला आहे. परंतु म. के. ढवळीकर व विराज शाह यांच्या मते तलविन्यास, स्तंभ व अलंकरण तसेच गर्भगृहातील मूर्तिशिल्प ठेवण्याची पद्धत पाहता लेणी क्र. २ व ३ चे अजिंठा येथील पाचव्या-सहाव्या शतकातील वाकाटककालीन लेणे क्र. सोळाशी साम्य वाटते.

धाराशिव लेण्यांचा इतिहास आणि वर्णन अपभ्रंश भाषेतील करकण्डचरिउ (११ वे शतक) व इ. स. ९३१-३२ मध्ये रचित बृहत्कथाकोश या संस्कृत ग्रंथात आलेले आहे.

बर्जेस यांच्या मते, धाराशिव येथील मुख्य लेणी जैन आहेत. ढवळीकरांच्या मते, लेणी क्र. १ ते ४ ही प्रथम खोदली गेली, तेव्हा ती बौद्धधर्मीय होती. नंतर नवव्या-दहाव्या शतकांत त्यांचे जैनधर्मीय लेण्यांत रूपांतर करण्यात आले असावे. वा.वि. मिराशी व विराज शाह यांनी अनेक दाखले देऊन लेणी क्र. २, ३, ४ व ६ ही जैन असल्याचे सिद्ध केले. मिराशी यांच्या मते, सिंहासनावरील चक्र व सप्तफणाधारी नाग ही वैशिष्ट्ये जैनांतही प्रचलित आहेत.

लेणे क्र. २ मधील जिनाचे भित्तिचित्र, अजिंठा लेण्यांतील गर्भगृहांत मुचलिंदबुद्ध मूर्तींचा अभाव, अजिंठ्यातील सर्व बुद्ध मूर्ती पद्मासनात, तर धाराशिव येथील शिल्पे अर्धपद्मासनात असणे, तसेच स्तूपसदृश्य रचनेचे धाराशिव येथील लेणे क्र. २ मधील स्थान (या काळात स्तूप लेण्यांबाहेर असण्याची उदाहरणे दिसत नाहीत. जे आहेत ते सुटे व आकाराने भिन्न आहेत) इत्यादी मुद्दे मांडून विराज शाह यांनी या लेणी बौद्ध नसून जैन ठरविल्या आहेत.

याशिवाय धाराशिव लेण्यांच्या नैर्ऋत्य भागात भोगावती नदीकिनारी चांभार (हिंदू लेणी) व लाचंदर लेणी आहेत.

संदर्भ :

  • Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, London, 1880.
  • Jain, Hiralal, ‘Some Fresh Light on the Dharashiva Caves and the Origin of the Shilahara Dynasty’, ABORI, XVI, p. 1-11, Pune, 1936.
  • Shah, Viraj, Jaina Rock-Cut Caves in Western India, Delhi, 2008.
  • ढवळीकर, म. के. ‘करकण्डचरिउतील जैन लेणी’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. १३८-४४, नागपूर, १९६५.
  • ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेण्यांवर नवा प्रकाश’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ११९-२७, नागपूर, १९६८.
  • ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेणी बौद्धधर्मीय होती काय?’, भारतीय इतिहास आणि संस्कृति, पृ. ५-९, मुंबई, १९७३.
  • मिराशी, वा. वि. ‘धाराशिव लेणी बौद्ध की जैन?’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ३७-५२, नागपूर, १९७२.

                                                                                                                                                                         समीक्षक : मंजिरी भालेराव