विद्युत उपकरणांद्वारे कृत्रिम पद्धतीने मेंदूमध्ये बृहत् अपस्मार (Grand mal) झटके देऊन मेंदूच्या पुरो-पश्च भागात (fronto-temporal) किंवा मेंदूच्या प्रबळ नसलेल्या एका बाजूच्या भागात वीज प्रेरित केली जाते, या पद्धतीला विद्युताघात उपचार पद्धती (Electroconvulsive Therapy; ECT) असे म्हणतात. उगो चेरलेत्ती (Ugo Cerletti) आणि लुचिनो बीनी (Lucino Bini) यांनी १९३८ मध्ये सर्वप्रथम विद्युताघात उपचार पद्धतीचा शोध लावला. या उपचार पद्धतीमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्युताघाताचा दाब हा ७० ते १२० व्होल्ट असावा व तो ०.७ ते १.५ सेकंद इतक्या कालावधीसाठी दिला जावा असे १९७८ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ संघटनेद्वारे निर्धारित करण्यात आले. या उपचार पद्धतीत दिल्या जाणाऱ्या विद्युताघाताचे शक्तिवर्धक अवस्था (Tonic Phase; १० ते १५ सेकंदापर्यंत) आणि अवमोटन अवस्था (Clinic Phase; ३० ते ६० सेकंदापर्यंत) असे दोन प्रकार पडतात.
विद्युताघात उपचाराच्या कृतीची नेमकी यंत्रणा (Mechanism of Action) अद्याप माहीत नसली तरी एका शक्यतेन्वये विद्युताघात उपचार पद्धती शक्यतो मेंदूचा भाग असलेला अग्रमस्तिष्क (Diencephalon) आणि किनारी संस्था (Limbic System) या दरम्यान असलेल्या कॅटेकॉलामाईन (catacholamines) सारख्या चेतना तंतू मार्गावर परिणाम करते ज्यामध्ये अध:श्चेतकाचा (Hypothalamus) देखील समावेश आहे. या उपचाराचे थेट (Direct) विद्युत आघात (भूल आणि स्नायू विश्रांती सारख्या औषधांचा वापर न करता दिली जाणारी) आणि सुधारित (Modified) विद्युताघात (भुल आणि स्नायू शिथिलता औषधे रुग्णाला देऊन) असे दोन प्रकार पडतात. सामान्यत: थेट विद्युताघात ही पद्धत आता उपचारासाठी वापरली जात नाही. रुग्णाच्या आजारांच्या लक्षणांवर आधारित किंवा अवलंबून आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एकंदर ६ ते १० किंवा २५ वेळा आणि आठवड्यातून फक्त ३ वेळा विद्युताघात उपचारपद्धतीची रुग्णांना शिफारस केली जाऊ शकते.
विद्युत घटाचा वापर (Application of Electrodes) :
- द्विपक्षीय विद्युताघात उपचार (Bilateral ECT) : यामध्ये प्रत्येक विद्युत घट कानाच्या (tragus) आणि डोळ्यांच्या बाजूकडील (canthus) काल्पनिक रेषेच्या मध्यबिंदूवर २.५ ते ४ सेंमी. अंतरावर ठेवलेला असतो.
- एक पक्षीय / एकतर्फी विद्युताघात उपचार (Unilateral ECT) : या विद्युताघात उपचार पद्धतीमध्ये विद्युत घट सामान्यत: केवळ डोक्याची जी बाजू प्रबळ नसते त्या एका बाजूला ठेवतात एकतर्फी विद्युताघात उपचार पद्धती सुरक्षित असून यामध्ये विशेषत: स्मरणशक्ती कमजोरी सारखे दुष्परिणाम कमी होतात
तीव्र नैराश्य, चलन-वलनात अनियमितपणा, विकृत मन:स्थिती, तीव्र चेतना किंवा विसरभोळेपणा इत्यादी सूचक संकेत व्यक्तीमध्ये आढळल्यास विद्युताघात उपचार देण्यात येतात. मेंदूतील वाढलेला दबाव, रक्तस्राव, गाठ किंवा रक्तवाहिनीची वाढ तसेच हृदयाचा तीव्र झटका, न्यूमोनिया, रेटिना अलगाव इ. विपरीत परिस्थितीमध्ये विद्युताघात उपचार पद्धतीचा उपयोग करता येत नाही.
विद्युताघात उपचार पद्धतीचे दुष्परिणाम : विद्युताघात उपचारामुळे आयुष्याला धोका पोहोचवणारे दुष्परिणाम क्वचितच उद्भवतात. विद्युताघात उपचारांमुळे मेंदूला कोणतीही इजा किवा दुखापत होत नाही. परंतु हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये श्वास बंद होणे, स्मरणशक्तीचा कमकुवतपणा, गोंधळून जाणे, अस्वस्थपणा, स्वमग्नता, अशक्तपणा, डोके, पाठ व स्नायू दुखणे, तोंडात कोरडेपणा येणे, छातीत धडधडणे, उलट्या व मळमळ होणे, अस्थिरपणे चालणे, जीभ चावली जाणे इत्यादी परिणाम दिसून येतात.
विद्युताघात उपचार प्रक्रियेपूर्वीची परिचारिकेची भूमिका :
- विद्युताघात उपचार प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी परिचारिकेने रुग्णाची वैद्यकीय व मानसिक आजाराच्या इतिहासाची संपूर्ण माहिती घेणे; रुग्णाच्या मानसिक लक्षणांचे निरीक्षण करून उपचाराचे परिणाम, प्रभाव व जोखीम यांसंबंधी रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती देणे; कार्यपद्धती संदर्भातील त्यांना असणारी निराधार भिती दूर करून त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण करणे आणि संमती अर्जावर त्यांची स्वाक्षरी घेणे गरजेचे असते.
- रुग्णाला उपचार देण्यापूर्वी त्याने चार ते सहा तास काही खाल्लेले नाही, रात्री व सकाळच्या औषधांचे सेवन केलेले नाही, पोट व मूत्राशय रिक्त आहे, उपचारापूर्वी धूम्रपान केलेले नाही तसेच रुग्णाने केस धुतलेले असून त्यातील तेल पूर्ण गेलेले आहे याची परिचारिकेने खात्री करून घेतलेली असावी.
- उपचारादरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरिता उपचारापूर्वी रुग्णास शरीरावरील दागिने, कृत्रिम अंग, कृत्रिम दात, धातूच्या वस्तू, घट्ट कपडे इ. काढण्यास सांगावे.
- मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार परिचारिकेने रुग्णास उपचारापूर्वी अगदी आधी शिरेमध्ये किंवा उपचारापूर्वी ३० मिनिटे आधी स्नायूंमध्ये किंवा त्वचेखालील भागात ०.६ मिग्रॅ. ॲट्रोपिन (Atropine) नावाचे औषध द्यावे.
विद्युताघात उपचारादरम्यान परिचारिकेची भूमिका :
- परिचारिका रुग्णास पाठीच्या बाजूने आसनावर सरळ अवस्थेत झोपवते व जीभ चावण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी त्याच्या तोंडात मुख गॅग (Mouth Gag) ठेवते.
- मानसविकार तज्ञांच्या आदेशानुसार रुग्णांना भुली वरचे औषध (thiopental sodium) ३ ते ५ मिग्रॅ. प्रति शारीरिक किलो वजन व स्नायू विश्रांतीचे औषध (Succinyl scoline) १ मिग्रॅ. प्रति किलो शारीरिक वजन देण्यास परिचारिका मदत करते.
- स्नायू विश्रांतीच्या औषधांमुळे श्वसन प्रक्रियेतील स्नायू देखील अर्धांगवायू अवस्थेत असतात. परिचारिका रुग्णाच्या श्वसन प्रक्रियेसाठी योग्य वायुमार्ग निश्चित करून गरज असल्यास कृत्रिम श्वसन यंत्राचा (Ventilator) वापर करते.
- विद्युताघात उपचारादरम्यान परिचारिका रुग्णाच्या विद्युत घट ठेवण्याच्या जागा / ठिकाण सामान्य सलाईन किंवा २५ टक्के बायकार्बोनेट सोल्युशन किंवा वीज प्रवाह जेल यांनी साफ करते.
- परिचारिका उपचारादरम्यान रुग्णास दिलेल्या विद्युत प्रवाहाचा कालावधी, विद्युत दाब, त्याची तीव्रता, येणारे झटके, स्नायूंमधील प्राणवायूचे प्रमाण, हृदय व मेंदू यांमधील विद्युत लहरी यांचे निरीक्षण करून संबंधित निष्कर्ष आणि वापर केलेल्या औषधांची नोंद ठेवते.
विद्युताघात उपचारानंतर परिचारिकेची भूमिका :
- रुग्णातील अस्वस्थपणा, गोंधळ यांसारख्या लक्षणांचे निरीक्षण करून जोपर्यंत शारीरिक श्वसन प्रक्रिया स्वाभाविकपणे सुरू होत नाही तोपर्यंत रुग्णास कृत्रिम प्राणवायू प्रदान करते.
- रुग्णास तीव्र अस्वस्थपणा किंवा गोंधळल्यासारखे वाटत असेल तर परिचारिका मानसोपचार तज्ज्ञांच्या आदेशानुसार रुग्णाला Tab-Diazepam नावाचे औषध देते.
- रुग्णास शारीरिक इजा होणार नाही किंवा खाटेवरून पडणार नाही यासंदर्भात योग्य ती दक्षता घेते.
- रुग्ण पूर्णत: पूर्वपदावर येईपर्यंत त्याची काळजी घेते आणि संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान रुग्णासंबंधित केलेली विशिष्ट निरीक्षणांची नोंदवहीमध्ये नोंद करून ठेवते.
संदर्भ :
R. Sreevani, A Guide to Mental Health and Psychiatric Nursing; 4th Edition 2016.
समीक्षक : सरोज वा. उपासनी