अधिसत्तावाद : अधिसत्तावाद ही एक राजकीय प्रवृत्ती आहे. संमतीऐवजी आधिसत्तेवर आधारित शासन संस्थेचा पुरस्कार हे या अधिसत्तावादाचे वैशिष्ट्ये असते. सत्तेवर आधारलेली शासनसंस्था योग्य असते. अधिकार संमतीतुन निर्माण होत नाही. उलट संमतीसाठी अधिसत्ता आवश्यक असते.  लोकांनाही आधिसत्तेवर आधारलेल्या शासनाची गरज असते असे या प्रकारच्या शासन व्यवस्थेचे पुरस्कर्ते मानतात. राजकीय मतभेद व विरोध यांचा सत्तेचा वापर करून बीमोड केला जातो. लोकमतास महत्त्व न देण्याच्या प्रवृत्तीस अधिसत्तावाद असे म्हटले जाते. म्हणजे लोकशक्ती, लोकमत, लोकसत्ता अशा संकल्पनांशी अधिसत्तावादाचे शत्रुभावी नाते असते. अशा प्रकारची प्रवृत्ती कोणत्याही प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत असू शकतात. अल्पजनांच्या  हाती सत्ताकेंद्र असते.  सत्तेचे केंद्रीकरण झालेले असते. घटनात्मक जबाबदारी राज्यकर्त्यांना मान्य नसते. कायद्याच्या चौकटीत राजकीय व्यवहार केला जात नाही. कारभार मनमानी पद्धतीने केला जातो. विचार आणि कृतीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विरोधात ही प्रवृत्ती काम करते. अधिसत्तावाद आणि निरंकुशवाद या दोन विचारसरणीमध्ये फरक आहे.

संदर्भ :

  • व्होरा, राजेंद्र; सुहास पळशीकर (संपा), राज्यशास्त्र कोश, दास्ताने प्रकाशन, पुणे.