ऑम्वेट, गेल (Omvedt, Gail) : (२ ऑगस्ट १९४१ – २५ ऑगस्ट २०२१). प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधिका आणि दलित शोषितांच्या प्रेरणास्थान. गेल यांचा जन्म अमेरिकेतील मिनीॲपोलिस येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शलाका भारत पाटणकर हे त्यांचे सासरकडील नाव. गेल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मिनीॲपोलिस येथील कार्लटन महाविद्यालयात झाले; तर मिनीॲपोलिस विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्र विषयात एम. ए. ही पदवी संपादन केली. एम. ए. च्या शिक्षणानंतर त्या १९६३ मध्ये सर्वप्रथम भारतात आल्या. येथे त्यांनी अनेक चळवळींच्या अभ्यासाला सुरुवात केली; मात्र त्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, सांस्कृतिक संघर्षांवरील चळवळी यांचा अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्यांनी महात्मा फुले यांच्या चळवळींवर आधारित ‘दी कल्चरल रिवोल्ट इन ए कोलोनेल सोसायटी : दी नॉन ब्राह्मण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया, १८७३ – १९३०’ (वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड : पश्चिम भारतातील ब्राह्मणेत्तर चळवळ १८७३ – १९३०) हा पीएच. डी.साठी प्रबंध लिहून अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे सादर केला आणि १९७३ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी लिहिलेला प्रबंधसुद्धा पुस्तकरूपाने १९७६ मध्ये प्रकाशित झाला.

गेल यांनी आपल्या कामातून जात आणि वर्ग यांतील गुंतागुंतीच्या नात्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः वसाहतकालीन धोरणांमधून जात कशी पुनरुत्पादित होत होती, यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे असे प्रतिपादन होते की, वसाहतिक शिक्षणाने आणि त्यांच्या धोरणांनी ब्राह्मण उच्चभ्रूंना वसाहतिक नोकरशाहीमध्ये उदयास येणार्‍या प्रभावी कामांमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत केली होती. तथापि, ब्राह्मणेत्तर किंवा अस्पृश्यांना अशा प्रकारचे स्थानांतर अनुभवता आले नाही आणि ते सर्वाधिक प्रमाणात परिघावरच राहिले. त्यामुळे जात ही केवळ उतरंडीची व्यवस्था नव्हती, तर ती एक राजकीय प्रक्रिया होती आणि ती तत्कालीन वर्गव्यवस्थेला छेद देत होती. यासंदर्भात त्यांनी महात्मा फुले यांच्या चळवळीचे आकलन ‘सांस्कृतिक बंड’ म्हणून करतात; ज्यामध्ये या वसाहतकालीन जात-वर्गीय व्यवस्थेला धक्के देण्याची क्षमता होती. त्यामुळे महात्मा फुले यांची चळवळ केवळ सुधारणावादी चळवळ नव्हती, असे मत गेल यांनी मांडले.

शास्त्रीय दृष्ट्या विचार केल्यास गेल यांनी ऐतिहासिक अभ्यासपद्धत वापरून जातीचा अभ्यास केला होता. भारतातील आधुनिक इतिहासकारांनीदेखील जातीचा अभ्यास करताना पौर्वात्यवादी दृष्टीकोन स्वीकारल्याचे दिसते. ज्यामध्ये जातीचे भौतिकवादी आकलन पुढे येऊ शकले नाही; परंतु गेल यांनी स्वीकारलेल्या ऐतिहासिक पद्धतीमुळे त्यांना जातीचे वर्ग आणि लिंगभाव यांच्यासोबतचे छेदनबिंदू सहजपणे पाहता आले. यातूनच जात व वर्ग यांचे गुंतागुंतीचे नाते विषद करणारा जातीविषयीचा भौतिकवादी दृष्टीकोन त्या विकसित करू शकल्या.

गेल या विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळींमध्ये सक्रीय होत्या. अमेरिकेतील साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधातील चळवळीमध्ये त्या अग्रेसर होत्या. तसेच कृष्णवर्णीयांच्या लढ्यात व स्त्रीमुक्ती आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. १९७० च्या दशकात महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीची प्रमुख शाखा असलेल्या ‘लाल निशाण’ या पक्षाशी त्यांचा सर्वप्रथम संबंध आला. गेल आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई पाटणकर यांची पहिली भेट याच ठिकाणी झाली. नंतर हळूहळू त्यांचा संबंध अनेक अभ्यासक, नेते, कार्यकर्ते, समाजसुधारक इत्यादींशी येऊ लागला. इंदुताई व गेल यांच्या भेटी अनेक सामाजिक कार्यक्रम व चळवळींत होत होत्या. गेल यांचा दलित, शोषित समाजाप्रती असलेली धडपड व आपुलकी, चळवळीतील सहभाग यांच्या संवादातूनच त्यांची आणि इंदुताई व भारत पाटणकर यांची जवळिक वाढली आणि भारत पाटणकर यांच्याशी गेल या विवाहबद्ध झाल्या. भारत पाटणकर हेसुद्धा थोर समाजसुधारक आहेत. त्यांनी गेल यांना अनेक चळवळी, आंदोलने, सामाजिक कार्ये इत्यादींसह आपल्या कौटुंबिक जीवनात मोलाचे सहकार्य व योगदान दिले आहे. त्यांना एक मुलगी असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे.

गेल यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. त्यांनी भारतातील अनेक चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक म्हणून आपले योगदान दिले आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील परित्यक्त्या स्त्रियांच्या चळवळींच्या त्या प्रमुख होत्या. त्यांनी दुष्काळ निर्मुलन चळवळ, वांग-मराठवाडी धरणाची निर्मिती, श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळी अशा शेकडो चळवळींत सहभाग घेऊन शोषित समाजाला न्याय मिळवून दिला. महत्त्वपूर्ण अशी सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरे घडवून आणण्यासाठी अशा चळवळी किती मोलाचे काम करू शकतात, याचे महत्त्व त्या जाणत होत्या. सततचा अभ्यास, चिंतन, संशोधन यांतून त्यांनी आधुनिक चळवळींना सैद्धांतिक रूप दिले. त्यांनी वंचित-बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी सक्रीय योगदान दिले. जात, धर्म, वर्ग, लिंगभाव, पितृसत्ताकपद्धती, जमीन इत्यादींचा स्त्रीशोषणाशी जवळचा संबंध आहे. भारतातील दलित-बहुजन आणि कनिष्ठ जातींतील स्त्रियांना पितृसत्ताक विचारांकडून होणारे अत्याचार सहन करावे लागत असून हिंसा, शोषण व लैंगिकता यांचा आंतरसंबंध त्या स्त्रीयांच्या अत्याचारामागे आहे, असे स्त्रियांच्या अस्तित्वाबद्दल गेल यांनी आपले परखड मत मांडले आहे. जातीअंत, स्त्री मुक्ती, रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या स्त्रियांवरील अन्याय इत्यादी व्यवस्थेचा अभ्यास करून या सर्व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल यांनी पुढाकार घेतला. स्त्री-पुरुष विषमता, जातिभेद इत्यादी सामाजिक विषमता दूर व्हाव्यात, यासाठी त्यांनी सत्यशोधक विचारांतून प्रथम स्वत: अभ्यास केला आणि नंतरच आपले विचार समाजापुढे मांडले. म्हणजेच महात्मा फुले यांची समाजहितासाठीची क्रांतिकारकता किती महत्त्वाची होती, ते त्यांनी आपल्या अभ्यासातून व्यक्त केले आहे. त्याच बरोबर गेल यांनी मार्क्सवाद, बुद्धाचे तत्त्वज्ञान, संत साहित्य इत्यादींची मांडणी करून आजच्या घडीला गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार संपविण्याचे षडयंत्र सुरू असून तसे करणे थांबले पाहिजे आणि अभ्यासपूर्ण संशोधनातून नवीन विचारांची मांडणी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

गेल यांनी भारत व विदेशांतील अनेक विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन केले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; समाजशास्त्र विषयाची प्रपाठक आणि त्यानंतर डॉ. आंबेडकर अभ्यागत प्राध्यापक, निस्वास, ओडिशा; नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी, नवी दिल्ली; इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, शिमला; नार्डिक इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडिज, कोपनहेगन; डॉ. बी. आर. आंबेडकर अभ्यागत प्राध्यापक, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू), नवी दिल्ली इत्यादींचा समावेश आहे.

गेल यांनी देश-विदेशांत अनेक शोधनिबंध सादर केले असून विविध ठिकाणी अनेक व्याख्यानेही दिली आहेत. त्यांनी आपले पती भारत पाटणकर यांच्यासह लिहिलेले दी ाँ ऑफ तुकोबा  हे पुस्तक प्रगल्भ विचारांचा ठेवा असून या पुस्तकाने संत तुकारामांना नव्या विचारविश्वात नेऊन ठेवले आहे. गेल यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांत पुढील ग्रंथांचे लेखन केले आहे. सर्क्युलर इव्हेंट इन कोलोनेल सोसायटी (१९७६); वुई विल स्मॅश धि प्रिझन : इंडियन वुमन इन स्ट्रगल (१९८०); लँड, कास्ट, अँ लिटिक्स इन इंडियन स्टेट्स (१९८२); व्हॉयलेन्स अगेन्स्ट वुमन (१९९०); िइन्व्हेस्टिंग रिव्होल्यशन (१९९३); दलित अँड दी डेमोक्रॅटिक रिव्होल्यशन (१९९४); जेंडर अँड टेक्नॉलॉजी (१९९५); दलित व्हिजन (१९९५); दी बुद्धिज्म इन इंडिया (२००३); आंबेडकर : टुवर्ड्स ॲन एन्लायटनेड इंडिया (२००४); ज्योतीराव फुले अँड दी आयडीऑलॉजी ऑफ सोशल रिव्होल्युशन इन इंडिया (२००४); आंबेडकर : प्रबुद्ध भारत की ओर (२००५); सिकिंग बेगमपुरा (२००८); अंडरस्टँडिंग कास्ट (२०११); दी ाँ ऑफ तुकोबा (२०१२); दलित दृष्टी (२०१४); भारतातील बौद्धधम्म (२०१६); जाती की समज (२०१८); इत्यादी.

गेल यांना आपल्या कार्यासाठी पुढील मानसन्मान लाभले : सावित्रीबाई फुले पुरस्कार, नासिक (२००२); डॉ. आंबेडकर चेतना पुरस्कार, पंजाब (२००३); एबीपी माझा सन्मान पुरस्कार (२०१२); मातोश्री भिमाबाई आंबेडकर पुरस्कार, (२०१२); विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२०१५); भारतीय समाजशास्त्रीय संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार (२०१८) इत्यादी.

गेल या भारतीय म्हणून येथील लोकांशी विशेषत: महाराष्ट्रातील लोकांशी, त्यांच्या प्रश्नांशी, समस्यांशी एकरूप राहून व त्यांच्या समस्यांना आपल्या मानून जीवन जगल्या. त्या इंग्रजीसह हिंदी व मराठी या भाषाही अस्खलित बोलत. थोडक्यात, गेल यांच्या लिखाणाने व कार्याने जात, वंचितता, पर्यावरण, लिंगभाव आणि कृषी राजकारण यांच्या सहसंबंधांची उकल केली व त्यांना सार्वजनिक चर्चेत आणले.

गेल यांचे निधन सांगली जिल्ह्यातील कासेगाव (वाळवा तालुका) येथे झाले.

संदर्भ :

  • Omvedt, Gail, Land, Caste, and Politics in Indian States, Delhi, 1982.
  • Omvedt, Gail, Dalits and the Democratic Revolution : Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India, India, 1994.
  • Omvedt, Gail, Buddhism in India : Challenging Brahmanism and caste, India, 2003.
  • Omvedt, Gail, Dalit Visions : The anti-caste Movement and the Construction of an Indian Identity, 2006.
  • Omvedt, Gail, Seeking Begumpura : The Social Vision of Anticaste Intellectuals, 2008.
  • Omvedt, Gail, Ambedkar : Towards an Enlightened India, UK, 2017.
  • Omvedt, Gail, Reinventing Revolution : New Social Movements and the Socialist Tradition in India, 2019.
  • Economic and Political Weekly, Mumbai, 2021.

समीक्षक : अनिल जायभाये