ॲस्क्लीपिअस/अस्लिपिअस : चिकित्सा, उपचार आणि स्वास्थ्याशी संबंधित असलेला एक प्राचीन ग्रीक देव. हा अपोलो देवतेला कोरोनिस नावाच्या राजकुमारीपासून झालेला पुत्र. वेदना कमी करणारी देवता इपॉन (एपिओन) ही ॲस्क्लेपिअसची पत्नी. त्यांना ५ मुली आणि ३ मुलगे होते. स्वास्थ्य आणि स्वच्छतेची देवता मानली जाणारी हायजिया (Hygea) ही ॲस्क्लेपिअसचीच मुलगी. हिच्याच नावावरून पुढे हायजिन शब्दाचा उगम झाला.

ग्रीक पुराणकथेनुसार ॲस्क्लेपिअसला जन्म देतेवेळी कोरोनिसचा मृत्यू झाला आणि अपोलोने ॲस्क्लेपिअसला कोरोनिसच्या उदरातून कापून बाहेर काढले. ॲस्क्लेपिअसचे पालनपोषण चिरॉनने (शिरोन) केले. चिरॉनच्या शरीराचा अर्धा भाग मनुष्याकृती व अर्धा भाग अश्वाकृती असल्याचे म्हटले आहे. चिरॉनने ॲस्क्लेपिअसला चिकित्सा आणि उपचार पद्धती शिकवली. मृतांनादेखील नवसंजीवनी देण्याची कला ॲस्क्लेपिअसला अवगत होती.

एका आख्यायिकेनुसार ॲस्क्लेपिअसच्या योग्य उपचार पद्धतीमुळे सर्वांचेच स्वास्थ्य उत्तम राहू लागले आणि मृतांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे हेडीस हा पाताळदेव चिडला; कारण कोणताही मृतात्मा हेडीस राज्यात येईनासा झाला. त्यामुळे हेडीसने आपला भाऊ मुख्य देवता झ्यूस याला ॲस्क्लेपिअसला ठार मारण्यास सांगितले. ॲस्क्लेपिअस आपल्या परवानगीशिवाय मृतांना जिवंत करतो, हे ऐकल्यावर झ्यूसने चिडून वज्राच्या प्रहाराने त्याला मारून टाकले. ह्यावर अपोलोने चिडून सायक्लोप्सला वज्र बनवण्याच्या कृत्याबद्दल शिक्षा म्हणून त्याचा वध केला आणि मर्त्य एडमेटसची एक वर्षभर सेवा करायची शिक्षा दिली.

ॲस्क्लेपिअस मरण पावल्यावर झ्यूसने त्याचे मृत शरीर उचलून आकाशात ठेवले. जे आजही ‘Ophiuchus Serpent Holder’ नावाच्या नक्षत्राने ओळखले जाते. अशाप्रकारे मृत्यूपश्चातदेखील ॲस्क्लेपिअसला दैवी दर्जा प्राप्त झाला. ॲस्क्लेपिअस देवतेचा उगम थिसली येथील त्रिकाला प्रांतात झाला. ॲस्क्लेपिअन्स नावाची अनेक उपचार मंदिरे तिथे ॲस्क्लेपिअसच्या स्मरणार्थ बांधण्यात आली.

नंतरच्या काळात तो एपिडॉरस आणि कॉस यांमधल्या दोन प्रसिद्ध उपचारकेंद्रांचा आश्रयदाता देव मानला गेला. त्याच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही औषधी वनस्पती आजही उपचार पद्धतीत वापरल्या जातात.

सर्पाचे वेटोळे असलेला दंड (wand) हे ॲस्क्लेपिअस देवतेचे प्रतीक मानले जाते. आजही हे अनेक औषधी कंपन्यांचे प्रतीक आहे. माचोन आणि पोडेलिरीयस हे ॲस्क्लेपिअसचे दोन पुत्र वैद्यकशास्त्राचे संस्थापक म्हणून ओळखले जातात.

संदर्भ :

  • Stoneman, Richard, Greek Mythology : An Encyclopedia of Myth and Legend, London, 1995.
  • https://greekgodsandgoddesses.net/gods/asclepius/

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे