(संगणकीय उपकरण; रॅण्डम ॲक्सेस मेमरी; आरएएम). संगणकाची मुख्य स्मृती (मेमरी; memory). रॅण्डम ॲक्सेस मेमरी अर्थात रॅम संगणकामध्ये माहिती साठवण्याचा एक भाग. रॅम हा संगणकाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण संगणक सुरू केल्यापासून ते बंद करेपर्यंत सर्व कार्य हे रॅमचा वापर करून होत असते.

प्रामुख्याने मेमरी सीपीयूमध्ये असलेल्या मदरबोर्डच्या स्मृती-फट (Memory Slot) मध्ये जोडली जाते. संगणकाच्या मेमरीचे दोन भागांत वर्गीकरण केले जाते.

१) रॅण्डम ॲक्सेस मेमरी (Random Access Memory)

२) रीड ओनली मेमरी (Read Only Memory)

रॅण्डम ॲक्सेस मेमरी (Random Access Memory) : रॅम मध्ये साठवलेली माहिती ही कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. संगणकावर कार्य करत असताना उर्जा खंडित झाल्यास रॅम मध्ये साठवलेली सर्व माहिती नष्ट होते, याच कारणामुळे रॅमला अस्थिर मेमरी (Volatile memory) असे म्हटले जाते. सीपीयूद्वारे अगदी थोड्या वेळात कुठल्याही क्रमवारीची आणि जागेची पर्वा न करता विशिष्ट मजकूर वाचण्या अथवा लिहिण्याकरिता रॅममध्ये थेट प्रवेश करता येते. हार्डडिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क (CD), डि.व्हि.डि. (DVD) आणि चुम्बकीय फित (Magnetic Tape) यांवर कार्य करीत असताना उर्जा खंडित झाल्यास साठवलेली माहिती टिकून रहाते, पण त्यांच्या मेमरी स्थळांवर साठवलेली माहिती तांत्रिक मर्यादेमुळे फक्त एका ठराविक पुर्व निश्चित्क्रमामध्येच साठवता किंवा उपलब्ध करता येवू शकते. रॅमचे मुख्यत: दाेन प्रकार आहेत.

१) एसआरएएम (SRAM; Static RAM; स्थितिक अथवा स्थिर रॅम)

२) डिआरएएम (DRAM; Dynamic RAM; गतिकीय रॅम)

रॅम

एक मेमरी चिप ही अनेक दशलक्ष मेमरी पेशींनी बनलेली असते. एसआरएएमच्या चिपमध्ये प्रत्येक मेमरी पेशीमध्ये द्विमान अंक (binary digit; 1 or 0) जोपर्यंत विद्युत पुरवठा देण्यात येतो तोवर साठविण्यात येताे. तर डिआरएएमच्या चिपमध्ये माहिती टिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक मेमरी पेशीमधील प्रभार हा नियमितपणे रीफ्रेश करण्यात येताे, कारण त्याचे घटक कमी असतात. डिआरएएमला एसआरएएमपेक्षा कमी चिप क्षेत्र लागते त्यामुळे डिआरएएममध्ये प्रवेश करण्याकरिता उशीर लागत असला तरी, डिआरएएमची चिप जास्त स्मृती संग्रहित करू शकते.

फायदे : १) रॅम ही संगणकाची कार्य-गती वाढवते, जर रॅमची साठवणूक क्षमता जास्त असेल तर संगणकाचे कार्य करण्याची गती वाढते. २) संगणकावर कार्य करत असताना रॅम हे लिखाण (Write) आणि मिटवणे (Delete) दोन्ही कार्ये करू शकते.

तोटे : १) रॅम ही महागडी असून तिची साठवणुकीची क्षमता मर्यादित असते. २) रॅममध्ये तात्पुरत्या स्वरूपातच माहिती साठवता येते.

कळीचे शब्द : #वोलाटाईल #स्मृती # सीपीयू

संदर्भ :

समीक्षक : रोहित सुनील गुप्ता