लसीका संस्था ही शरीरातील अभिसरण संस्थेचा एक भाग आहे. अभिसरण संस्थेचे दोन भाग मानले जातात; (१) हृद्‌संवहनी संस्थेद्वारे रक्ताचे अभिसरण होते आणि (२) लसीका संस्थेद्वारे लसीका द्रवाचे अभिसरण होते. शरीरातील ऊतींपासून लसीका द्रव पुन्हा हृदयाकडे आणण्याचे कार्य लसीका संस्थेद्वारे केले जाते. लसीका संस्था ही हृद्संवहनी संस्थेप्रमाणे पूर्ण बंदिस्त नसते.

मानवी अभिसरण संस्थेमध्ये दररोज सु. २० लि. रक्त आणि त्यातील पाणी, प्रथिने व इतर पदार्थ असलेले घटक केशवाहिन्यांमधून गाळले जातात. या प्रक्रियेत रक्तपेशी व रक्तद्रव वेगळे होत असतात. त्यांपैकी सु.१७ लि. रक्तद्रव रक्तवाहिन्यांद्वारे पुन्हा रक्तामध्ये शोषला जाऊन थेट रक्तात मिसळतो. उरलेला सु. ३ लि. रक्तद्रव शरीरातील ऊतींमधील पेशींच्या बाहेरील जागेत असतो. या द्रवाला ‘अंतराली (इंटरस्टीशियल) द्रव’ म्हणतात. ऊतींमध्ये जशा केशवाहिन्या असतात तशाच लसीका केशवाहिन्या असतात. केशवाहिन्या बंदिस्त असतात, तर लसीका केशवाहिन्या ऊतींमध्ये सुरू होतात. अंतराली द्रवातील काही भाग केशवाहिन्यांच्या आवरणातून झिरपला जातो, तर उरलेला भाग लसीका केशवाहिन्यांमध्ये शिरून लसीका संस्थेद्वारे पुन्हा रक्तप्रवाहात मिसळला जातो. लसीका संस्थेत वाहणाऱ्या द्रवाला ‘लसीका द्रव’ म्हणतात. लसीका द्रव रक्तापासून तयार होत असून पुन्हा रक्तात मिसळत असल्यामुळे लसीका संस्था ही अभिसरण संस्थेचा भाग आहे. लसीका संस्थेत लसीका द्रव आणि लसीका वाहिन्या यांच्याशिवाय लसीका पेशी आणि लसीका ग्रंथिका यांचा समावेश होतो. तसेच लसीकाभ ऊती यादेखील या संस्थेचा भाग मानल्या जातात.

लसीका द्रव : लसीका द्रव पारदर्शक व रासायनिक दृष्ट्या रक्तद्रवाप्रमाणे असतो. त्यात क्षार,ग्लुकोज, यूरिया, प्रथिने, रक्तातील विद्राव्य घटक आणि लसीका पेशी व एककेंद्रक पेशी या पांढऱ्या पेशी निलंबित स्थितीत असतात. लसीका द्रवात रक्तद्रवाच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण कमी असते.

लसिका वाहिन्या : अनेक लसीका केशवाहिन्या एकत्र येऊन लसीका वाहिन्या तयार होतात. लसीका वाहिन्यांचे जाळे शरीरभर असते. हृदय, फुप्फुसे, आतडी, यकृत, त्वचा अशा अनेक इंद्रियांमध्ये लसीका वाहिन्या पोहोचलेल्या असतात, परंतु मेंदू व अस्थी यांमध्ये त्या नसतात.

लसीका वाहिन्यांमध्ये लसीका द्रव एकाच दिशेने वाहतो. या वाहिन्यांमध्ये असलेल्या झडपांमुळे हा द्रव उलट फिरत नाही. लसीका द्रव लहान व शाखायुक्त लसीका केशवाहिन्यांतून वाहत मोठ्या लसीका वाहिन्यांमध्ये शिरतो. अखेर तो वक्ष वाहिनी आणि उजवी लसीका वाहिनी या दोन मुख्य व मोठ्या लसीका वाहिन्यांद्वारे रक्तप्रवाहात मिसळतो. उजव्या छातीकडचा भाग वगळता, शरीराच्या सर्व भागांतील लसीका द्रव छातीच्या डाव्या भागात असलेल्या वक्ष वाहिनीत येतो. वक्ष वाहिनी पाठीच्या कण्याच्या पुढच्या भागात असते. वक्ष वाहिनीतून हा लसीका द्रव मान व डावा खांदा जेथे जुळतात तेथील शिरेमध्ये मिसळतो. कमरेवरील उजव्या भागातील लसीका द्रव उजव्या लसीका वाहिनीत वाहतो आणि मान व उजवा खांदा जेथे जुळतात त्या भागातील शिरेत मिसळतो. लसीका वाहिन्यांच्या भित्तिकांमध्ये असलेल्या स्नायूंच्या पातळ स्तरांच्या आकुंचनामुळे लसीका द्रव पुढेपुढे ढकलला जातो.

लसीका ग्रंथिका : लसीका वाहिन्यांमध्ये अनेक ठिकाणी लसीका ग्रंथिका असतात. त्या एखाद्या उंचवट्याप्रमाणे दिसतात व घेवड्याच्या आकाराच्या असतात. त्यांचा व्यास १–२५ मिमी. असतो. मानेमध्ये व काखेमध्ये, जांघेच्या वरच्या बाजूला, वेगवेगळी इंद्रिये आणि मोठ्या रक्तवाहिन्या इत्यादींच्या जवळ त्या गुच्छाने असतात. या ग्रंथिकांमध्ये बृहत्‌भक्षी पेशी असून त्या हानिकारक पदार्थ व मृत ऊती यांचे भक्षण करतात.

लसीका पेशी : हा पांढऱ्या पेशींचा एक प्रकार असून त्या लसीका ग्रंथिका व लसीका द्रव यांमध्ये मोठ्या संख्येने असतात. या पेशी शरीराचे संक्रामणांपासून संरक्षण करतात. जेव्हा अपसामान्य पेशी किंवा बाह्यपदार्थ लसीका ग्रंथिकांमध्ये प्रवेश करतात तेव्हा लसीका पेशी प्रतिद्रव्ये निर्माण करतात. ही प्रतिद्रव्ये शरीरबाह्य व अपसामान्य पदार्थांचा नाश करतात किंवा त्यांना निष्प्रभ करतात.

लसीकाभ ऊती : या ऊती लसीका ग्रंथिकांसारख्या परंतु आकारमानाने मोठ्या असतात उदा., प्लीहा, गिलायू (टॉन्सिल), यौवनलोपी ग्रंथी (थायमस) इ. इंद्रियांमध्ये लसीका पेशी तयार होऊन साठतात. ही इंद्रिये लसीका संस्थेचा भाग असून संक्रामणांपासून शरीराचे रक्षण करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असल्याने त्यांना लसीकाभ ऊती म्हणतात.

लसीका संस्थेचे कार्य : लसीका संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे अंतराली द्रव लसीका वाहिन्यांद्वारे शोषून घेणे आणि तो पुन्हा रक्तप्रवाहात मिसळणे. एखाद्या ऊतीच्या संबंधित लसीका वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला, तर अंतराली द्रव त्या ऊतींच्या आजूबाजूला साचून राहतो व त्या भागाला सूज येते.

लसीका पेशी आणि बृहत्‌ भक्षी पेशी या शरीराला रोगसंक्रामणांपासून सुरक्षित ठेवतात. या कार्यात लसीका पेशी प्रतिद्रव्ये तयार करतात व ती शरीरात बाहेरून शिरलेल्या हानिकारक पदार्थांचा नाश करतात. बृहत्‌ भक्षी पेशी हानिकारक कणांना गिळून टाकतात. संक्रामण स्थितीत बाधित भागाची सफाई ज्या ज्या लसीका ग्रंथिकांमुळे होते त्या सुजतात व दुखू लागतात. बाधित भागाला आलेली सूज हे दाखविते की, लसीका पेशी आणि बृहत्‌ भक्षी पेशी संक्रामणाचा प्रतिकार करीत असून त्याचा फैलाव होण्यापासून रोखत आहेत.

लसीका पेशी रक्तप्रवाहात देखील असतात व संक्रामणाचा प्रतिकार करण्यासाठी बाधित भागाकडे वाहत जातात. अनेक लसीका पेशी त्वचेच्या खाली असतात. तेथे त्या जीवाणू व अधिहर्षता निर्माण करणाऱ्या पदार्थांचा प्रतिकार करण्यासाठी योग्य प्रतिद्रव्ये तयार करतात.

आतड्याच्या भित्तिकांमध्ये असलेल्या लसीका वाहिन्या मेद शोषून घेण्यास मदत करतात. या वाहिन्यांना दुग्धवाहिनी म्हणतात. आतड्यात पचलेले मेद पदार्थ व काही प्रथिने एकत्र होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पदार्थकण दुग्धवाहिनीत शिरल्यामुळे लसीका द्रव दुधी बनतो. याला मेदलसीका किंवा वसालसीका म्हणतात. तेथून हा द्रव वक्ष वाहिनीच्या खालच्या भागात असलेल्या मेदलसीका कुंडामध्ये जमा होतो. त्यानंतर लसीका द्रव आणि मेदलसीका हे द्रव वक्ष वाहिनीत एकत्र येऊन रक्तप्रवाहात मिसळतात. अशा प्रकारे मेद पदार्थांचे शोषण होऊन ते यकृताकडे वाहून नेले जातात. यावरून मेद पदार्थांचे शोषण हे कर्बोदके आणि प्रथिने यांच्यापेक्षा वेगळे असते, हे दिसून येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा