स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या मृग कुलातील (सर्व्हिडी कुलातील) एक प्राणी. त्याचे शास्त्रीय नाव रँगिफर टॅरँडस आहे. ते आर्क्टिक व उपआर्क्टिक शीत प्रदेशांत आढळतात. उत्तर ध्रुवाकडील प्रदेश, टुंड्रा व तैगा येथे त्याच्या अनेक उपजाती आढळतात. स्कँडिनेव्हिया, पूर्व यूरोप, ग्रीनलंड, रशिया, मंगोलिया व ५० अक्षांशावरील चीनचा उत्तरी प्रदेश या सर्व ठिकाणी पूर्वीपासून रेनडियर आढळत होते. नॉर्वे, फिनलंड, सायबीरिया, ग्रीनलंड, कॅनडा व अलास्का या प्रदेशांत अजूनही रेनडियर मोठ्या संख्येने वन्य स्थितीत आढळतात. उत्तर अमेरिकेत मोठ्या आकारमानाचे रेनडियर आढळतात. त्यांना कॅरिबू म्हणतात.

रेनडियर (रँगिफर टॅरँडस) : मादी आणि नर

रेनडियरच्या रंगांत व आकारमानांत स्थानानुसार भिन्नता आढळते. नर आकाराने मादीपेक्षा मोठा असतो. नराच्या शरीराची लांबी १८०–२१४ सेंमी. आणि वजन १५९–१८२ किग्रॅ. असते. मादीच्या शरीराची लांबी १६२–२०५ सेंमी. आणि वजन ८०–१२० किग्रॅ. एवढे असते. खांद्यापर्यंतची उंची ८५–१५० सेंमी. असून शेपूट १०–२१ सेंमी. लांब असते. पाळीव रेनडियरचे पाय आखूड असून वन्य रेनडियरच्या तुलनेत त्यांचे वजन जास्त असते. रेनडियरचा रंग प्रामुख्याने तपकिरी किंवा करडा असतो. पोटाकडची बाजू पांढरी किंवा फिकट रंगाची असते. त्याच्या फरचा रंग उपजातीनुसार तसेच ऋतूनुसार बदलतो. हिवाळ्यात तपकिरी रंगाचे रूपांतर फिकट पांढऱ्या रंगात होते. उत्तर ध्रुवाकडून जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे रेनडियरांचे आकारमान मोठे होत जाते व रंगही पांढरटापासून जास्त गडद होत जातो. रेनडियरच्या त्वचेवरील दाट लोकरीचा आतील थर आणि २–४ सेंमी. लांब केसांचा बाहेरील थर यांमुळे कडाक्याच्या थंडीपासून त्याचे संरक्षण होते. केस पोकळ असून त्यांत हवा भरलेली असते. खूर रुंद, पसरट व त्यांमध्ये मोठी फट असल्यामुळे मऊ जमीन किंवा बर्फावरून चालणे त्यांना सोपे जाते. चालताना त्यांच्या घोट्याचा मोठा आवाज होतो. दृष्टी चांगली असल्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ भागात ते सहजपणे वावरू शकतात आणि तग धरू शकतात.

रेनडियर प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे नर आणि मादी या दोघांनाही शिंगे असतात. परंतु मादीची शिंगे नरापेक्षा आकाराने लहान असतात. काही समूहांत मात्र मादीला शिंगे अजिबात नसतात. दरवर्षी हिवाळ्यात शिंगे गळून पडतात व लगेच नवीन शिंगे उगवायला सुरुवात होते. उगवणारी शिंगे सुरुवातीला मऊ व स्पंजाप्रमाणे छिद्रांकित असतात. त्यांना रक्ताचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो. शिंगांवर मखमलीसारखे आच्छादन असते. कालांतराने शिंगे कठीण बनतात. सर्वांत मोठ्या आकाराच्या रेनडियरच्या जातीत, प्रौढ नराची शिंगे सु. १०० सेंमी. रुंद आणि सु. १३५ सेंमी. लांब असू शकतात.

रेनडियर कळप करून राहतात. सप्टेंबरच्या अखेरीस हजारो रेनडियर वृक्षहीन प्रदेशातून दाट वनात स्थलांतर करतात. त्यांच्या प्रवासाची गती साधारणपणे ताशी ३२ किमी. एवढी असते. ते पोहू शकतात आणि अनेकदा त्यांच्या मार्गात आलेल्या नद्या, सरोवरे पोहून पार करतात. हिवाळा संपल्यावर मार्च-एप्रिल महिन्यांत ते परत येतात. ते रवंथ करणारे असून त्यांच्या जठरात चार कप्पे असतात. झाडांची कोवळी पाने व गवत हे त्यांचे मुख्य अन्न आहे. हिवाळ्यात ते दगडफूल किंवा शैवाक खातात. ध्रुवीय अस्वले, डास, सोनेरी गरूड व लांडगे हे त्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत. स्थलांतराच्या सुमारास रेनडियरचे नर व माद्या माजावर येतात. सामान्यपणे एका कळपात एक नर आणि ६–१३ माद्या असतात. गर्भावधी सु. २४० दिवसांचा असतो. मादी १-२ पिलांना जन्म देते. एक ते दीड वर्षांत पिले वयात येतात. रेनडियरचा आयु:काल सु. पंधरा वर्षांचा असतो.

मागील काही शतकांपासून रेनडियर मनुष्याच्या सा‍न्निध्यात राहिल्यामुळे तो माणसाळला गेला आहे. त्याच्या दुधातून गायीच्या दुधापेक्षा चौपट लोणी निघते. स्कँडिनेव्हिया, रशिया इत्यादी देशांमध्ये गायीगुरांप्रमाणेच रेनडियरांचे संवर्धन केले जाते.

२०११ मध्ये इंग्लंडमधील संशोधनात असे आढळून आले आहे की, रेनडियरला अतिनील प्रकाशातही चांगले दिसते. मानवी दृष्टी ४०० नॅमी.पेक्षा कमी तरंगलांबीच्या प्रकाशात काम करू शकत नाही. रेनडियरला ३२०नॅमी. तरंगलांबीपर्यंतच्या प्रकाशात दिसू शकते. ही क्षमता बर्फाळ प्रदेशांत संचार करताना उपयुक्त असावी, असे वैज्ञानिकांना वाटते. बर्फाळ प्रदेशांत ज्या गोष्टी दृश्य प्रकाशात स्पष्ट दिसू शकत नाहीत, त्या अतिनील प्रकाशात त्यांना सहज दिसू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा