फेसाटी : नवनाथ गोरे यांची फेसाटी ही पहिलीच कादंबरी. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून ही कादंबरी २०१७ मध्ये प्रकाशित झाली. सन २०१८ चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार या कादंबरी ला प्राप्त झाला आहे. नाथा गोरे हा या कादंबरीचा नायक. सांगली-जत परिसरातील धनगर समूहातील हा तरुण. त्याच्या बालपणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा प्रवास या कादंबरीत रेखाटला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करुन उदरनिर्वाह करणारा कष्टकरी समूह सर्वत्र आढळतो. पशुपालन करणाऱ्या समूहाची स्वतःची एक स्वतंत्र जीवनसंस्कृती पहावयास मिळते. नायकाची जडणघडण या पशुपालक कुटुंबात झाली आहे. अशा पशुपालक समाजाच्या संघर्षमय जीवनकहाणीचे स्वरुप नाथाच्या प्रातिनिधीक स्वरुपात कादंबरीत उलगडले गेले आहे. नाथाच्या, त्याच्या कुटुंबाच्या आणि एकूणच कृषीजनसमूहाच्या वाट्याला येणारे दुख-दारिद्र्य यांचे वास्तव चित्र या कादंबरीतून दृष्टीस पडते. घरचे प्रचंड दारिद्रय, कर्जाचा डोंगर, अल्प शेती, शैक्षणिक अनास्था, खाण्या-राहण्याची आबाळ अशा अत्यंत वैफल्य स्थितीत नाथाची झालेली जडणघडण, त्याचे भावविश्व, नातेसंबंध याचा उलगडा सहजसोप्या भाषेत केला आहे. आई-वडील, बहिण-भाऊ यांच्या नातेसंबंधातील करुण स्वर कादंबरीत पदोपदी जाणवतो. परिस्थिती बिकट असली तरी नाथाच्या शिक्षणासाठी कुटुंबियांनी विशेषतः बहिणीने केलेली धडपड नव्या पिढीची शैक्षणिक आस्था दाखवून देते. या कादंबरीला कृषी समूहातील कष्टकरी लोकांच्या वेदनेची किनार आहे.
या कादंबरीतील स्त्रीचित्रण वर्तमानातील स्त्रिजीवनाचे अनेक पदर उलगडणारे आहे. नाथाची आई (जिला तो काकू म्हणून संबोधतो) आणि त्याच्या बहिणी या संपूर्ण कादंबरीभर व्यापून राहिल्या आहेत. कष्टाचा डोंगर उपसून यांच्या वाट्याला शेवटी निराशा ठरलेली, तरीही जीवनावरील अढळ निष्ठा हे त्यांचे विशेष नवी जीवनदृष्टी देणारे आहे. कुटुंब आणि एकूणच गावगाडा उभारण्यात स्त्रियांचे असलेले योगदान दुर्लक्षित करता येत नाही. त्यांची स्वतःची एक मूल्यव्यवस्था ठरलेली आहे. पण व्यवस्थेचे काच तिला कायम टोचत राहतात. विशेषतः गावगाड्यातील स्त्रियांना अजूनही पारंपरिक व्यवस्थेने जखडून ठेवले आहे. वर्तमानात महिला सबलीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरीही गावगाड्यातील स्त्रीचे जगणे जैसै थे असल्याचा प्रत्यय कादंबरीतील काही प्रसंगावरुन येतो. हुंड्यासाठी नाथाच्या बहिणीची भोगावे लागलेले मरणप्राय जीवन आणि तिच्या मृत्यूनंतरचा नाथाचा आक्रोश भयंकर अस्वस्थ करणारा आहे. फेसाटीतून केवळ नाथाची नाही तर संपूर्ण धनगर समूहाची जीवनकहाणी अधोरेखित झाली आहे. सांगली-जत परिसराची जैविक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये, समूहातील परस्पर भावबंध, त्यांची जीवनपद्धती यातून नेमकेपणाने मांडली गेली आहे.
घरच्या दारिद्रय परिस्थितीतून शिक्षण घेताना नाथाला आलेले बरेवाईट अनुभव कादंबरीत येतात. अडचणींना तोंड देत त्याने पाहिलेली स्वप्ने नंतर त्याला अस्वस्थ करु लागतात. त्यातून आलेली वैफल्यग्रस्तता आणि नैराश्यता त्याला असहाय्य बनवते. पण त्या पडझडीतून त्याची वाटचाल पुन्हा सुरु होते. सभोवतालच्या निरीक्षणातून स्वतःच्या जाणीवकक्षा विस्तृत झाल्या की काहीतरी जीवनधडपड सुरु होते. हे जीवनविषयक तत्त्वज्ञान काही प्रसंगातून लेखकाने अधोरेखित केले आहे. भाषिक पातळीवर अनेकविध प्रयोग कादंबरीत आढळतात. सुंबरानख्यान ही पशुपालक समाजाची सांस्कृतिक देण आहे. सुंबरान आख्यान स्वरुपात हे कथानक गुंफले आहे. यातून कादंबरीला भाषिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. पशुपालक समाजाच्या लोकपरंपरा, लोकरिती, लोकपरंपरा यातून उद्धृत झाल्या आहेत. मौखिक परंपरेने आलेल्या दैवतकथा आणि लोककथा पशुपालक संस्कृतीचे वेगळेपण दर्शवतात. उदा. मलकारसिद्ध, बाळ चिलीया, मरगुबाई इत्यादी. लोकसाहित्याच्या अंगाने अनेक संदर्भ कादंबरीभर पसरले आहेत. या परिसराच्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पर्यावरणाकडे ही कादंबरी लक्ष वेधते. कादंबरीचा प्रारंभ आणि शेवटही आख्यानाने होतो. जत-निगडी परिसराची बोलीभाषा या कादंबरीभर व्यापून राहिली आहे. या परिसरातील नवीन शब्दकळा फेसाटीतून अवतरल्या आहेत. सहजसोपी, नैसर्गिक भाषा आणि प्रवाही निवेदन हे कादंरीचे विशेष आहेत. नाथाच्या आयुष्याची कहाणी सांगत पशुपालक समूहाचे आणि परिसराचे समग्र विश्व मांडणारे हे सुंबरानख्यान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
फेसाटीला राष्ट्रीय तसेच अनेक नामांकित राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये युवा साहित्य अकादमी २०१८, मनोरमा साहित्य पुरस्कार सोलापूर, बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार, वर्धा, भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार कोपरगाव, अस्मितादर्श साहित्य पुरस्कार औरंगाबाद, पद्मगंधा साहित्य पुरस्कार, नागपूर इ. पुरस्कारांनी या साहित्यकृतीला सन्मानित केले आहे. संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या एम. ए भाग-२ च्या अभ्यासक्रमात फेसाटी कादंबरीचा समावेश झाला आहे.
संदर्भ : मूळ ग्रंथ