डांगोरा एका नगरीचा : साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त त्र्यं. वि. सरदेशमुख ह्यांची कादंबरी. मराठी साहित्यसृष्टीतील विख्यात समीक्षक, साहित्यिक, कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख ह्यांची ही कादंबरी १९९८ साली प्रकाशित झाली आहे. २००३ मध्ये या कादंबरीस साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला. सरदेशमुखांच्या पात्र आणि आशय ह्यांच्या अनुरोधाने एकच समान सूत्र असलेल्या बखर एका राजाची  (१९७२), उच्छाद (१९७८) आणि डांगोरा एका नगरीचा  (१९९८) ह्या तीन कादंबऱ्या आहेत.

साइखेड नावाच्या छोट्या नगरीशी जोडलेल्या ह्या कादंबऱ्यांचा कालपट १९१० ते १९६० या दरम्यानचा आहे. १९१० ते १९२२ हा ‘ बखर एका राजाचीचा कालपट, १९२२ ते १९२९  हा डांगोरा एका नगरीचा  कालपट आणि १९३० ते १९६० हा उच्छादचा कालपट आहे. डांगोरा एका नगरीचा  ही कादंबरी त्रयीमधील आशयाच्या दृष्टीने दुसरी कादंबरी आणि रचनेच्या दृष्टीने तिसरी कादंबरी आहे. या कादंबरीने पार्श्वभूमीदाखल बखर एका राजाची या कादंबरीचे कथानक आपल्या पोटात रिचवले आहे, आणि उच्छादमधील भविष्यकालीन चिंताही वाहिली आहे. बखर एका राजाची  या कादंबरीचे उत्तरकांड म्हणून प्रस्तुत कादंबरीकडे पाहता येते. व्यक्तिरेखांचा, कथानकाचा आणि भाषेच्या वैविध्याचा महापट असणारी ही कादंबरी व्यक्तीजीवनाचे सूक्ष्म पातळीवरील मानसिक व्यवहार, मनोव्यापार, भावनिक आंदोलने आदींचे उत्कट दर्शन घडविणारी आहे. स्वतःच्या संवेदनांत संपूर्णपणे बुडाल्याशिवाय अनुभवांना कलात्मक घाट येत नाही, शब्दांमध्ये जिवंतपणा उरत नाही. याची जाणीव सरदेशमुखांना असल्यानेच वास्तव जगण्याचे सार आणि कल्पित ह्यांचे बेमालूम मिश्रण प्रस्तुत कादंबरीच्या कथानकात वाचकांच्या प्रत्ययाला येते.

प्रस्तुत कादंबरीत १९२२ ते १९२९ पर्यंत साइखेड या संस्थानाने भोगलेल्या अनुभवांची कहाणी आहे. विस्मयाचे, भयावहाचे आणि हिंसेचे धक्केखोर बीज या शतकाच्या पूर्वार्धातच जगभर पेरले गेले आहे. दिसामाजी ते फोफावत आहे. ‌सामान्य जनांचा जीव तापल्या तव्यावर भाजून निघत आहे, अशी संवेदना ह्या कादंबरीतील मनोगतात लेखकाने व्यक्त केली आहे. कोणाही संवेदनशील, चिंतनशील माणसाला ग्रासणारा हा प्रश्न आहे. प्रत्येकच व्यक्तीला घटनापरत्वे, प्रसंगपरत्वे केव्हा ना केव्हा तरी याविषयी विचार करावा लागतो. एक अतिभौतिकीय प्रश्न तसेच विचार मांडण्यासाठी वर्तमानकाळाकडे आणि त्यालाही लगटून असलेल्या नजीकच्या भूतकाळाकडे चिंतनशीलवृत्तीने पाहिल्यावर जे मर्म गवसले ते लेखकाने या कादंबरीमध्ये आविष्कृत केले आहे. ‘करारे हाकारा, पिटारे डांगोरा’ ही लोकसाहित्यातील कहाणीची ओळ कादंबरीचे गाभासूत्र आहे. साइखेडातील भ्रष्टाचाराचा, व्यभिचाराचा, अडाणी – हतबल प्रजेच्या असहाय्यतेचा डंका या कादंबरीत सतत ऐकू येतो.

१३१ व्यक्तीरेखा असलेल्या ह्या कादंबरीतील प्रत्येक पात्र जीवनरसाने ओथंबलेले आहे. प्रत्येकाची चव, अपेक्षा मात्र वेगळी आहे. ह्या व्यक्तीचित्रांच्या सहाय्यानेच सरदेशमुख वाचकास मानवी जीविताच्या समस्यांची तीव्रता पटवून देतात. जीवनातील काठिण्यावर, राक्षसीपणावर प्रहार करतात. प्रत्यक्ष हाडामांसाच्या वाटतील, आपल्या अगदी ओळखीच्या वाटतील अशा व्यक्तींच्या स्वभावचित्रणाच्या व जीवनकथेद्वारे सरदेशमुख मानवी जीवनाचा चित्रपट आपल्यापुढे उलगडवतात. आपल्या हृदयाच्या अंत:हृदयतील संवेदना वाचकाच्या हृदयात संक्रांत करतात. आपल्या मानवतापूर्ण वृत्तीशी वाचकाला तल्लीन करतात. ते राजे रघुवीरसिंह ह्यांचा जीवनपट व त्यापुढील साइखेडातला घटनाक्रम इतक्या कुशलतेने आपल्यापुढे पसरवतात की त्यातील प्रमुख व्यक्तीबरोबरच तिच्या सर्व संबंधितांच्या मूर्ती आपल्यापुढे स्पष्टपणे वावरू लागतात. त्यातील अनेक व्यक्ती तर समाजातील विशिष्ट प्रवृत्तीचे प्रातिनिधिक रूपच आहेत. राजा रघुवीर सिंह – राणी दमयंती व राजस ह्या प्रेमाच्या त्रिकोणाची कहाणी आणि त्यानंतर आलेले सचोटीप्रिय – न्यायप्रिय देसाई, त्यांच्या विरोधातील कारवाया, त्यात त्यांची झालेली ससेहोलपट या दोन प्रमुख कथानकांबरोबरच अनेक लहानमोठी कथानके जीवनकहाण्या या कादंबरीने आपल्या अंतरंगात मुरवून घेतल्या आहेत.’खळांची वक्रता’ हे सूत्र घेऊन सरदेशमुखांनी या कादंबरीचे जग निर्माण केले आहे.  वाचकाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे न देणारी,  सुखात्म शेवट नसणारी मात्र वाचकांचे सहनबळ वाढवणारी ही कादंबरी आहे.

सरदेशमुख यांचा मूळ पिंड कविमनाचा आहे. त्याची प्रचिती या कादंबरीतील भाषाविशेषातून येते. अनुभवसमृद्ध जीवनातून मिळवलेल्या निष्कर्षांची, नीतिमूल्यांची त्यांनी केलेली मांडणी वाचकाचे भावविश्व समृद्ध करणारी आहे. प्रस्तुत कादंबरीत सरदेशमुखांच्या आत्मपर लेखनाचा भाग असल्याने त्यातून तटस्थपणे, अलिप्तपणे कादंबरी कोरून काढणे कठीण आहे. येथे डांगोरा मूल्यहीन समाजव्यवस्थेचा आणि मानवी दुर्वर्तनाचा आहे. व्यक्तिगत दुःखाचा, वेदनेचा आहे. व्यक्तिगत जीवनापासून ते व्यापक समाजजीवनापर्यंतच्या अपप्रवृत्तींचा आहे. कधी व्यक्ती तर कधी घटना केंद्रस्थानी असणाऱ्या या कादंबरीतील संघर्ष स्थूलरूपात धार्मिक अथवा जातीय दिसत असला तरी तो मूलत: अंत:करणातील प्रवृत्तींमधला आहे. नीती – अनिती, न्याय – अन्याय, सुष्ट – दुष्ट असा आहे. येथे भूक हा एक घटक सरदेशमुखांनी ठळक केला आहे. अन्नाची, पैशाची, सत्तेची, प्रतिष्ठेची, कामवासनेची तसेच शुद्ध प्रेमभावनेची भूक सरदेशमुखांनी विविध घटना – प्रसंगांमधून, व्यक्तीरेखांच्या वर्तनातून  प्रत्ययकारीतेने मांडली आहे.

सरदेशमुखांची जडण-घडण ज्या समाजात, कौटुंबिक वातावरणात झाली आणि सतत बदलत गेलेल्या ज्या सामाजिक प्रवाहात झाली, त्याचे समग्र व सम्यक दर्शन त्यांच्या या कादंबरीतून घडते. वृत्तीत नैराश्यभाव असूनही निसर्गातील शक्ती आणि माणसातील सौहार्द यावर अफाट विश्वास ठेवत सरदेशमुखांनी ही कादंबरी वाचकांपुढे ठेवली. त्यातून मिळणारे सद्भावाचे, सद्वर्तनाचे, सकारात्मकतेचे बीज आजही वाचकांमध्ये अंकुरते. हेच या कादंबरीचे यश म्हणता येईल. आस्था आणि सद्भाव हेच अंतिमतः जीवनाचे प्राणपंख आहेत हे प्रस्तुत कादंबरीतून वाचकांच्या मनावर ठसते. ह्यातच प्रस्तुत कादंबरीची कालातीतता आहे. मराठी कादंबरी विश्वात मानाचे स्थान मिळविणाऱ्या या कादंबरीस प्रियदर्शनी अकादेमी पुरस्कार (२०००), महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (२०००), केशवराव कोठावळे पुरस्कार (१९९९) आदी अन्य पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

संदर्भ :

  • सरदेशमुख, त्र्यं.वि., डांगोरा एका नगरीचा, मौज प्रकाशन, मुंबई, १९९८.
  • निघोजकर, प्रि. प्र., त्र्यं. वि. सरदेशमुख:आत्मनिष्ठ लेखकाची बखर, राजहंस प्रकाशन,  पुणे, २०१९.