सुंदरजी, जनरल कृष्णस्वामी : (३० एप्रिल १९२८‒९ फेब्रुवारी १९९९). भारताचे अकरावे सरसेनापती. जन्म चिंगलपुट (तमिळनाडू) येथे. त्यांनी बालपणापासूनच सुंदरजी हे नामाभिधान पतकरले. वडील अभियांत्रिक, तर माता शिक्षणक्षेत्रात तज्ज्ञ होत्या. जनरल अरुणकुमार वैद्य हे ३१ जानेवारी १९८६ रोजी सेवानिवृत्त झाल्यावर सुंदरजी यांची सरसेनापती म्हणून नेमणूक झाली.
मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची सैनिकी पेशाकरिता निवड झाली (१९४५). त्यांना महार रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले (२८ एप्रिल १९४६).
त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांनी श्रीमती वाणी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे व दोन मुली अशी अपत्ये आहेत.
वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते स्नातक असून, त्यांनी मद्रास विद्यापीठाची एम्.एस्सी. ही पदवी मिळविली आणि पुढे अलाहाबाद विद्यापीठाची एम्.ए. ही आंतरराष्ट्रीय राजनीतिशास्त्र या विषयातील पदवी मिळविली.
मेजर असताना ते आफ्रिकेमध्ये काँगो (झाइरे) येथे आंतरराष्ट्रीय शांतता पथकाबरोबर चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करीत होते (१९६१). त्या वेळी राष्ट्रद्रोही सैनिकांचे निःशस्त्रीकरण करण्यात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना बहुमानाचा (मेन्शन इन डिस्पॅचिस) पुरस्कार मिळाला. भारत-पाक युद्धापूर्वी त्यांनी कच्छच्या वाळवंटात आंतरराष्ट्रीय सीमेवर नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना दुसरा बहुमानाचा पुरस्कार मिळाला. सुंदरजींनी कमांडर, स्टाफ निदेशक व निर्देशक इत्यादी उच्च पदे यशस्वीपणे भूषविली आहेत. १९७१ च्या बांगला देश युद्धात सुंदरजींनी ब्रिगेडियर जनरल स्टाफ म्हणून उत्तम कार्य केले. तसेच युद्ध योजना व नियंत्रणखात्यांमध्ये गौरवास्पद कामगिरी बजाविली. ते अमेरिकेत आर्मी कमांड व जनरल स्टाफ या उच्च पदाधिकाऱ्यांच्या शिक्षणसंस्थेत दाखल झाले (१९७२). त्यानंतर ते गुणोत्कर्षाने उच्च पायरी चढतच राहिले.
१९७४‒७९ इन्फन्ट्री डिव्हिजन, तसेच आर्म्ड फोर्सिस (चिलखती विभाग) डिव्हिजनचे समादेशक म्हणून त्यांनी १९७९ मध्ये सेनादलात प्रथमच नवीन यांत्रिकीकरण सेना (मेकॅनाइझड रेजिमेंट) उभारली, त्याचे ते पहिले समादेशक झाले. लेफ्टनंट जनरल या हुद्यावर कोअर कमांडर म्हणून नेमणूक झाल्यावर १९८० मध्ये कॉलेज ऑफ काब्रेट (युद्धशास्त्र विद्यापीठ) चे प्रमुख, १९८१-८२ मध्ये डेप्युटी चीफ ऑफ आर्मी एच्.क्यू. व १९८३-८४ मध्ये जी.ओ.सी. इन सी वेस्टर्न कमांड आणि जून १९८४ च्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार, अमृतसर येथे प्रमुख संचालक होते. पुढे ते भूदलाचे सरसेनापती झाले (१ फेब्रुवारी १९८६). या पदावर ते ३० एप्रिल १९८८ पर्यंत होते.
आधुनिक युद्धशास्त्र, आण्विक युद्ध, लष्कराची गतिशील व आक्रमक हालचाल इत्यादी क्षेत्रांत सुंदरजींचे विचार, उच्चार आणि आचार हे युद्धेतिहासांतील एक कूट प्रश्न म्हणून भावी इतिहासकार चर्चितीलच.
नवी दिल्ली येथे त्यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले.