योसा बुसान : (१७१६–१७ जानेवारी १७८४). जपानमधील एडो काळातील कवी आणि चित्रकार. मात्सुओ बाशो आणि कोबायाशी इसा या दोन कवींबरोबर एडो काळातील अत्यंत प्रभावी कवी म्हणून त्याची ख्याती आहे. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान. सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला.
कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. वयाच्या विसाव्या वर्षी तो घराबाहेर पडला आणि हाइकू ह्या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याने हानायो हाजीन यांसारखे अनेक गुरू केले. तांगो आणि सानुकी अशा वेगवेगळ्या प्रांतात गेल्यानंतर तो क्योटो येथे स्थायिक झाला. १७५१ मध्ये क्योटो येथे व्यावसायिक चित्रकार म्हणून तो काम करू लागला. १७५४ ते १७५७ ही तीन वर्षे त्याने तांगो प्रांतातील योसा येथे काढली. तेथे असतानाच योसा बुसान हे नाव त्याने घेतले. हाइकू ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न करणाऱ्या मात्सुओ बाशो (१६४४–९४) ह्या श्रेष्ठ जपानी कवीबद्दल त्याला नितांत आदर होता. हाजीन या आपल्या पहिल्या गुरूच्या निधनानंतर त्याने मात्सुओ बाशो याला आपले गुरु मानले होते. क्योटोला स्थायिक झाल्यावर वयाच्या ४५ व्या वर्षी त्याने लग्न केले, त्याला कुनो नावाची एक मुलगी होती. आपली गुरुपरंपरा जोपासण्यासाठी त्याने कविता शिकविण्याचे कार्य सुरु ठेवले होते. बुसानच्या कवितेवर त्याच्यातल्या चित्रकाराचा ठसा उमटल्याचे दिसून येते. संपन्न दृश्यात्मकतेचा प्रत्यय हा त्याच्या कवितेचा एक विशेष होय.
क्योटो येथे तो निधन पावला.
संदर्भ :
- “Buson (Japanese artist and poet) – Britannica Online Encyclopedia”. Britannica.com. Retrieved 2013-02-17.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.