विश्वबंधुत्व : मानवतावादी दृष्टिकोणातून विकसित झालेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व (किंवा विश्वबंधुत्व) या तत्त्वत्रयींपैकी एक संकल्पना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (सु. १७८९-९९) स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या संकल्पनांचा उद्‌घोष करण्यात आला. स्वातंत्र्यामध्ये विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, खाजगी मालमत्तेचा हक्क इ. गोष्टी अभिप्रेत होत्या. समतेमध्ये सरदार वर्गाचे खास अधिकार संपुष्टात आणून, सर्व नागरिकांस वर्गनिरपेक्ष समान संधी देणे व कायद्याबाबत समानता या गोष्टी अंतर्भूत होत्या. जगामध्ये स्वातंत्र्य व समता यांवर विश्वास असणारे व ती तत्त्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशातील असोत, ते एकमेकांचे बंधू आहेत, ही संकल्पना म्हणजे विश्वबंधुत्व होय. प्राचीन ग्रीसमध्ये प्रथमत: स्टोइक तत्त्वज्ञांनी विश्वबंधुतवाची कल्पना मांडली. विवेक हा सर्व माणसांना जोडणारा दुवा असून सर्वांना समान असणाऱ्या कायद्यावर आधारलेले विश्वराज्य स्थापन करावे, असे विचार त्यांनी मांडले. ख्रिस्ती व इस्लाम धर्मांत विश्वबंधुत्वाची भावना, आपण सर्व देवाची लेकरे असून एकमेकांचे भाऊ आहोत, या विचारांतून प्रकट झाली होती. धर्मसुधारणेच्या काळात सुधारणावादी धर्मपंथांनी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करून हे जग ईश्‍वराने निर्माण केंले आहे आणि आपण सर्व ईश्‍वराची लेकरे आहोत, असा विचार मांडला. देववादी (डीइस्ट) विचारवंतांनी धर्मसहिष्णुतेचा पुरस्कार करून असे सांगितले, की ईश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ आपल्याच धर्माचा मार्ग योग्य आहे, असा आग्रह धरणे बरोबर नाही.

युरोपमध्ये सतराव्या शतकात विश्वबंधुत्वाची कल्पना नैसर्गिक अधिकारांच्या संदर्भात मांडण्यात आली. ईश्‍वरापुढे जर सर्व माणसे समान आहेत तर व्यवहारातही ती समान असली पाहिजेत, असा या विचारवंतांचा आग्रह होता. सर्व माणसांना नैसर्गिक अधिकार जन्मत:च प्राप्त झाले आहेत, म्हणून ते समान आहेत, असे त्यांचे मत होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील (१७७५-८३) वसाहतवाल्या क्रांतिकारकांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (१७७६) घोषित केला. या जाहीरनाम्यात त्यांनी सर्वाच्या समान अधिकारांचा पुरस्कार केला. फ्रान्समध्ये त्या काळात मोठे वैचारिक मंथन झाले. व्हॉल्तेअर (१६९४-१७७८), दीद्रो (१७१३-८४), रूसो (१७१२-७८) वगैरे विचारवंतानी धर्मसहिष्णुतेचा आणि बंधुभावाचा विचार मांडला. फ्रेंच क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या तत्त्वत्रयीची घोषणा केंली. जगात समता, स्वातंत्र आणि विश्वबंधुत्वाच्या कल्पनेवर विश्वास ठेवणारी माणसे एकमेकांचे बंधू आहेत. धर्म, जात, वंश, भाषा आणि प्रदेश यांत भेद असला, तरी आपणा सर्वांमध्ये बंधुत्वाचा समान धागा आहे, असा विचार यामागे होता. फ्रेंच राष्ट्रीय सभेच्या जाहीरनाम्यात मानवी अधिकारांचा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्यात आला. फ्रेंच राज्यक्रांतिकारक आंतरराष्ट्रीय बंधुभावाचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे क्रांतीच्या काळात फ्रेंच क्रांतिकारक लाफाएत याने बॅस्तीलच्या किल्ल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यास देण्यासाठी इंग्लिश क्रांतिकारक टॉमस पेनच्या हवाली केल्या. टॉमस पेन आणि इंग्लिश तत्त्वज्ञ जेरेमी बेंथॅम यांना फ्रान्सने नागरिकत्वाचे हक्क बहाल केले. फ्रेंच क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय बंधुभावाचा पुरस्कार कम्युनिस्ट क्रांतिकारकांनी केला. १९१७ च्या बोल्शेव्हिक क्रांतीनंतर जागतिक कम्युनिस्ट चळवळीने सर्व कष्टकरी वर्गासाठी वैश्विक बंधुभावाची कल्पना मांडली.

स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या कल्पना परस्परांशी संबंधित आहेत. स्वातंत्र्यात व्यक्तीच्या अधिकारास आणि विकासास महत्व देण्यात आले आहे. समतेमध्ये सर्वांना सार्वजनिक आणि खाजगी जीवनात समानतेने वागवणे अभिप्रेत आहे. विश्वबंधुत्वात सामाजिक ऐक्य आणि एकात्मता यांस महत्व देण्यात आले आहे. आपल्याजवळ असणाऱ्या साधनांचा सर्वांच्या समवेत उपभोग घेणे, त्याचे आपापसांत योग्य वाटप करणे आणि त्याद्वारा समाजाचा समतोल विकास घडवून आणणे विश्वबंधुत्वात अभिप्रेत आहे. व्यक्तिगत स्वार्थाचा संकोच व परहितदक्षता हे त्यामागील तत्त्व आहे. विश्वबंधुत्वात परस्पर-साहाय्य, परस्पर-सहकार्य आणि ऐक्यभाव अंतर्भूत आहे. विश्वबंधुत्व ही भावात्मक कल्पना आहे आणि स्वातंत्र्य व समता या संकल्पनांना सामुदायिक अर्थ आणि अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे कार्य ती करते. ज्या समाजात स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित होते, त्याच समाजात विश्वबंधुत्व प्रसृत होते.

भारतामध्ये प्राचीन काळापासूनच बंधुत्व वा भ्रातृभाव समाजात रूजविण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न झाले. मुख्यत्वे संतांच्या कृति-उक्तीतून ही बंधुत्वाची प्रेरणा समाजाला मिळत गेली. वारकरी संप्रदायाचा या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागेल. संतांच्या अभंगवाणीतून प्रकटणारी बंधुत्वाची भावना ही मुख्यत्वे आध्यात्मिक पातळीवरची होती. त्या दृष्टीने प्राचीन भक्तिसंप्रदाय व संतांचे वाङ्‌मय विशेष लक्षणीय आहे. आधुनिक काळात महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले प्रभृती समाजसुधारकांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्त्वे समाजात रूजवण्यासाठी महान कार्य केले. महात्मा फुले यांनी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करताना असे सांगितले, की प्रत्येक माणसाने श्रम करून भाकर मिळवावी. एकमेकाच्या अधिकारांची बूज राखून ‘भाऊपणा’ निर्माण करावा. एकाच कुटुंबातील माणसांनी वेगवेगळ्या धर्मांचे पालन केले तरी हरकत नाही. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या तीन संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा जपणारी, राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता यांस सबळ करणारी विश्वबंधुत्वाची भावना वृद्धिगंत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

समाजातील बंधुभाव वृद्धिगंत करण्याच्या उद्देशाने अमेरिका व ग्रेट ब्रिटन येथे अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत काही सामाजिक बंधुत्व-संघटना (फ्रॅटर्नल सोसायटीज) उदयास आल्या. समान हितसंबंध वा एकच व्यवसाय हा त्यांच्या सभासदांच्या एकत्र येण्यातील सामाजिक घटक होता. या संघटना बव्हंशी खाजगी, स्वयंसेवी, ना-नफा धर्तीच्या असत. त्यांच्या सदस्यांमध्ये परस्पर स्नेहभाव व एकोपा वाढीस लागावा ही भूमिका त्यांच्या स्थापनेमागे मुख्यत्वे होती. काही राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनाही निर्माण झाल्या. या संघटनांच्या सदस्यांना प्रसंगी आर्थिक साहाय्य देण्याची तरतूदही होती. अपघात, वृद्धत्व, आजारपण, मृत्यू अशा प्रसंगी हे आर्थिक साहाय्य दिले जात असे. त्यासाठी सामुदायिक परस्पराश्रयी विमापद्धती अवलंबली जात असे व त्यात प्रत्येक सदस्याला ठराविक विमाहप्ता नियमित भरावा लागत असे. सदस्यांच्या परस्पर बंधुत्वावर अधिष्ठित अशा काही गुप्त संघटनाही अस्तित्वात आल्या आणि काही अजूनही कार्यरत आहेत. उदा., फ्रीमेसनरी ही गुप्त संघटना. पूर्वी विमापद्धतीद्वारे अर्थसाहाय्य देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अनेक संघटना विमाकंपन्यांच्या व्यावसायिक विस्ताराबरोबरच नामशेंष झाल्या. काही संघटना धर्मादाय संस्था वा सामाजिक केंद्रे या स्वरूपात अस्तित्व टिकवून आहेत. काही सेवाभावी संघटना वेगवेगळ्या ज्ञानशांखामध्ये विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्या आयोजित करण्याचे कार्य करतात तर काही केवळ रंजनमंडळाच्या (क्लब) स्वरूपाच्या आहेत.

अमेरिकेत महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्तरावरच्या युवकांच्या बंधुत्व-संघटना (फॅटर्निटीज) अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत निर्माण झाल्या. ग्रीक आद्याक्षरांनी युक्त अशी नावे या संघटनांना दिली जात. उदा., ‘कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी’, विल्यम्सबर्ग, (व्हर्जिनिया) येथे १७७६ मध्ये स्थापन झालेली ‘फी वीटा कॅपा’ ही संघटना. तसेच ‘युनियन कॉलेज’, स्कनेक्‌टडी, (न्यूयॉर्क) येथे १८२५ मध्ये स्थापन झालेली व अद्यापही अस्तित्व टिकवून असलेली ‘कॅपा आल्फा’ ही संघटना. या नावांमुळे अशा संघटनांना ‘ग्रीक लेटर सोसायटीज’ असेही म्हणत. कॉलेज युवतींच्या अशा भगिनी-संघटनांना ‘सोरोरिटीज’ ही संज्ञा होती. बंधूसाठी ‘फ्रॅटर’ व भगिनीसाठी ‘सोरोर’ असे लॅटिन शब्द आहेत, त्यावरून फ्रॅटर्निटी व सोरोरिटी या संज्ञा आल्या. शिक्षणानिमित्त कुटुंबापासून दूर राहिलेल्या मुलांना घरगुती वातावरण मिळवून देणे, हाही उद्देश अशा संघटनांमागे होता. त्यासाठी एखादे ‘घर’ वा सामुदायिक निवासस्थान मुक्रर केले जाते, तिथे सर्व सदस्य एकत्र येऊ शकतात, तसेच सामाजिक उपक्रम चालवू शकतात.

विश्वबंधुत्वाची संकल्पना समष्टिवादी आहे. पूर्वीच्या काळी वैश्विक बंधुभावाला धार्मिक अधिष्ठान होत. त्याकाळी व्यक्ती वैयक्तिक रीत्या ईश्‍वराची उपासना समष्टीच्या कल्याणार्थ करीत असे. आधुनिक काळात ऐहिक पायावर विश्वबंधुत्वाची मांडणी करीत असताना, व्यक्तीने सामूहिक लोकसंग्रहासाठी आपले व्यक्तिमत्व समूहात पूर्ण विलीन करावे, असा विचार मांडला जातो. त्यामुळे व्यक्ती संकुचित स्वार्थाऐवजी परहितार्थ उच्चतर ध्येयांच्या विचारांनी प्रेरित होते. आज संज्ञापनाच्या नवनव्या साधनांमुळे समान विचारांनी प्रेरित झालेल्या समूहांच्या भावना उद्दीपित करून त्यांना जागृत अतिरेकी समूहवादी बनविणे सोपे झाले आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिविशिष्टता यांचा लोप होण्याची शक्यता असते. म्हणून व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व यांत योग्य असा समतोल प्रस्थापित करणे आवश्यक आहे.

संदर्भ :

  • Ward, Lee (Edi), Cosmopolitanism and Its Discontents,Lexington Books, UK, 2020.