औषधी द्रव्यांनी योनीमार्ग, गर्भाशयमुख धुऊन काढणे (प्रक्षालन करणे) म्हणजे योनिधावन होय. हा एक स्थानिक चिकित्सेचा प्रकार असल्यामुळे सर्वदैहिक परिणाम यामध्ये अपेक्षित नाही. प्रक्षालनाबरोबरच रुक्षण (कोरडेपणा आणणे), स्तंभन (स्त्राव थांबवणे), अल्प स्वेदन (शेक देणे) हे सुद्धा कार्य योनिधावनामुळे होते.
जीर्ण श्वेतप्रदर (अंगावरून पांढरे जाणे), गर्भाशय ग्रीवा व्रण (गर्भाशयाच्या तोंडाला जखम होणे), जंतुसंसर्ग तसेच उत्तरबस्ती ह्या कर्माच्या पूर्वी योनिधावन करावे. कुमारिका, रजस्वला (पाळी चालू असताना), गर्भिणी, नव प्रसुता यांमध्ये योनिधावन करू नये.
योनिधावन विधी पुढीलप्रमाणे —
साधनसामग्री : रबरी शलाका (कॅथेटर) – नंबर ७, ५० मिली. अंत:क्षेपिका (सिरिंज) किंवा बस्तीपात्र व कापूस.
द्रव्य : आवश्यक वनस्पतींचा काढा किमान १ लिटर निर्जंतुक करून घ्यावा.
काळ : सुमारे २० मिनिट सलग ७ ते १० दिवस शक्यतो वात काळात म्हणजेच सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ५ ते ७ या वेळात द्यावा.
पूर्वकर्म : प्रथम रुग्णास उत्तानशयन स्थितीत (दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून उभे करणे) झोपवावे. नंतर योनिपरीक्षण करावे.
प्रधानकर्म : निर्जंतुक कॅथेटर योनीमध्ये ३ ते ४ इंच प्रविष्ट करून सुखोष्ण औषधी द्रव्याने १५ ते २० मिनिटांपर्यंत धावन करावे. बाहेर आलेले द्रव्य एका भांड्यात परीक्षणासाठी जमा करावे.
पश्चात कर्म : धावन झाल्यावर कापसाने योनिभाग पुसून घ्यावा. नंतर तैलचा पिचू (तेलयुक्त कापूस) योनीमार्गात ठेवावा. रुग्णास अर्धा तास झोपून राहण्यास सांगावे. संग्रहित द्रव्याचे निरीक्षण करावे. या द्रव्याबरोबर सुरुवातीला विशिष्ट स्त्राव बाहेर पडताना दिसतो. तसेच विशिष्ट गंध आढळतो. हळूहळू ही लक्षणे कमी होताना आढळतात.
कार्य : योनिधावनाचे स्थानिक तसेच गर्भाशयावर सुद्धा उपयोग सांगितले आहेत. योनिधावणामुळे योनीमार्गात जंतुसंसर्ग कमी होतो. तसेच योनिभागातील पीएच (हायड्रोजन आयनमान) देखील सुधारतो. औषधी द्रव्ये योनिभागातील पेशींमध्ये शोषली जाऊन ती गर्भाशयाला ताकद देतात.
पहा : योनिमार्ग (पूर्वप्रकाशित नोंद).
संदर्भ :
- नचिकेत वाचासुंदर, आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान, योनिधावन, श्री वैद्यनाथ आयुर्वेद भवन लि., नागपूर, २०११.
समीक्षक : कौस्तुभ चौंडे