शरीराला धारण करणाऱ्या सात धातूंपैकी एक धातू. धातुपोषण क्रमात मेद धातू चौथा आहे. आयुर्वेदानुसार एका धातूच्या सार भागापासून पुढच्या धातूची निर्मिती आणि पोषण होत असते. याप्रमाणे मांसधातूपासून मेदधातूची निर्मिती होते. थोडक्यात चांगला, सारवान मेद धातू निर्माण होण्यासाठी मांसधातू देखील सारवान असायला हवा. शरीरातील स्निग्धता कायम ठेवणे, स्वेद (घाम) निर्मिती करणे, शरीराला सघनता देणे तसेच अस्थिधातूचे पोषण करणे ही मेदधातूची महत्त्वाची कार्ये आहेत.

आयुर्वेदानुसार प्रत्येक धातूपासून पोषक भाग आणि त्याज्य भाग तयार होत असतात. मेदधातूच्या पोषक भागापासून अस्थिचे पोषण होते, तर मेदाचा त्याज्य भाग स्वेद ह्या स्वरूपात शरीराबाहेर टाकला जातो. म्हणूनच लठ्ठ लोकांना घाम जास्त येतो.

ज्या व्यक्तींचा मेदधातू उत्तम असतो, त्यांचा वर्ण तुकतुकीत असून स्वर, डोळे स्निग्ध असतात. केस, त्वचेवरील लोम, नखे, दात, ओठ, मूत्र, मल हे सर्व देखील स्निग्ध असतात. ह्या व्यक्तींना जास्त परिश्रम सहन होत नाहीत. अजिबात व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, स्निग्धता वाढवणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करणे आणि अतिमद्यपान करणे ही मेदधातू बिघडण्याची कारणे आहेत. तसेच सतत कफ वाढवणारा आहार घेणे, पहिले खाल्लेले अन्न पचले नसताना पुन्हा खाणे या कारणांनीही मेदधातू बिघडतो.

मेदधातू आवश्यकतेपेक्षा कमी झाला असता कंबरेचा भाग बधीर झाल्यासारखा वाटतो, शरीर रोडावते, त्वचा खरखरीत होते, स्निग्ध पदार्थ खाण्याची इच्छा होते. डोळ्यावर झापड असल्यासारखे वाटणे, थकवा येणे, पोट पूर्वीपेक्षा कमी होणे ही देखील मेदधातू क्षीण झाल्याची लक्षणे आहेत. मेदधातू आवश्यकतेपेक्षा वाढला असता थोड्या श्रमाने दम लागणे, नितंब, पोट तसेच स्तन लोंबू लागणे ही लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीराला दुर्गंध येतो. मेदधातूत विकृती निर्माण झाल्यास लठ्ठपणा तसेच मधुमेह देखील होऊ शकतो.

पहा : धातु-२, दोषधातुमलविज्ञान.

संदर्भ :

  • अष्टांग हृदय — सुत्रस्थान, अध्याय १० श्लोक ११, अध्याय ११ श्लोक ४.
  • अष्टांग हृदय — शारीरस्थान, अध्याय ३ श्लोक ६३.
  • सुश्रुत संहिता — सुत्रस्थान, अध्याय ५ श्लोक ७, अध्याय १४ श्लोक १०, अध्याय १५ श्लोक १३, १९व ३७, अध्याय २४ श्लोक १३, अध्याय ३५ श्लोक १८.
  • चरक संहिता — विमानस्थान, अध्याय ५ श्लोक १६, अध्याय ८ श्लोक १०६.
  • चरक संहिता — सुत्रस्थान, अध्याय १७ श्लोक ६६.

समीक्षक – जयंत देवपुजारी