शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे पित्त. जर पित्त आवश्यक प्रमाणात शरीरात उपस्थित असेल तर ते शरीरातील विविध व्यापार सुरळीतपणे चालण्यास मदत करते. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा पित्त कमी किंवा जास्त झाल्यास रोग उत्पन्न होतात, तेव्हा त्याला दोष म्हणतात. पित्ताचे प्राकृत स्वरूप बघितले असता ते तीक्ष्ण गुणाचे, पातळ, दुर्गंधित व गरम असते. त्याच्या मूळ स्वरूपात त्याचा रंग पिवळा व चव तिखट असते; तर विकृत स्वरूपात त्याचा रंग काळपट निळा व चव आंबट होते. पित्त सर्व शरीरव्यापी असले तरी नाभी, आमाशय, स्वेद, लसीका, रस, रक्त, यकृत, प्लीहा, हृदय, दृष्टी व त्वचा ही पित्ताची प्रमुख स्थाने आहेत. अन्नाचे पचन करणे, उष्णता निर्माण करणे, तहान व भूक निर्माण करणे, रुची उत्पन्न करणे, शरीर कोरडे करणे इत्यादी पित्ताची कार्ये आहेत. कार्य व कार्यक्षेत्राच्या दृष्टीने पित्ताचे पुढील पाच प्रकार मानले आहेत : पाचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त, आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त.

पाचक पित्त हे पक्वाशय व आमाशय यांमध्ये राहते. खाल्लेल्या अन्नाला पचविणे, त्यापासून वातादी दोष, रसादी धातू, मूत्र, विष्ठा वेगवेगळे करणे हे या पित्ताचे काम आहे. पाचक पित्त हे स्वत:च्या जागी राहूनच इतर चार पित्ताची व शरीरात जिथे अग्नीचा व्यापार सुरू आहे तिथे अग्नीची शक्ती वाढविते. रंजक पित्त यकृत व प्लीहेमध्ये राहते. पचलेल्या आहारापासून जो रस धातू तयार होतो, त्यावर रंजक पित्ताची प्रक्रिया होऊन त्याला लाल रंग प्राप्त होतो आणि रक्त तयार होते. साधक पित्त हृदयात राहते. इच्छित मनोरथ साधण्याचे काम यामुळे होते असे वर्णन आहे. डोळ्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या आलोचक पित्तामुळे समोर दिसणाऱ्या गोष्टींचे दर्शन घडते. भ्राजक पित्त हे त्वचेच्या आश्रयाने राहते. त्वचेवर लावल्या जाणाऱ्या विविध लेप व तेल इत्यादींचे पाचन या पित्तामुळे होते. शरीराची  विशिष्ट कांती प्रकाशित करण्याचे काम या पित्तामुळे घडते.

पहा : कफदोष, दोष (त्रिदोष), दोषधातुमलविज्ञान, वातदोष.

संदर्भ :

  • सुश्रुत संहिता —सूत्रस्थान, अध्याय २१ श्लोक १०, ११.

समीक्षक – जयंत देवपुजारी