शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी मांस हा तिसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. रक्ताच्या सार भागापासून मांसाची उत्पत्ती होते. मांसवह स्रोतस असलेल्या मांस धातूच्या अग्निद्वारे मांसाची उत्पत्ती होते. काही तज्ञांच्या मते ही उत्पत्ती तीन दिवसांत, तर काहींच्या मते दहा दिवसांत होते. गुळगुळीत, घट्ट व किंचीत लालसर असे मांसाचे स्वरूप आहे.
ज्या व्यक्तीचा मांसधातू परिपूर्ण व उत्तम प्रतीचा असतो, त्यास मांससार असे म्हणतात. मांससार व्यक्तींचे सर्व अवयव छिद्र विरहित, चांगले परिपुष्ट तसेच दिसायला सुरेख असतात. कानशीळ, कपाळ, डोळे, हनुवटी, मान, खांदे, पोट, छाती, हातापायांचे सांधे हे सर्व घट्ट, मजबूत, सुंदर आणि भरदार असतात. अवयवांवर लेप करणे आणि शरीर पुष्ट ठेवणे असे मांसाचे कर्म (कार्य) सांगितले आहे. एकमेकांपासून वेगळे दिसणाऱ्या मासाच्या घट्ट भागांना पेशी म्हणतात.
आयुर्वेदानुसार मांसधातूपासून वसा आणि सहा त्वचा हे उपधातू निर्माण होतात. तसेच शरीरावरील रोमरंध्रातून निघणारा मळ हा मांस धातूचा मळ समजला जातो.
मांसक्षय म्हणजेच मांसधातू आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास इंद्रियांची दुर्बलता, सांध्यांमध्ये वेदना, गाल आणि कुल्ले यांचा आकार कमी होणे ही लक्षणे जाणवतात. ज्या व्यक्तीचा मांसक्षय झाला आहे, त्याला दह्यापासून बनविलेले आंबट पदार्थ कोशिंबीरी आणि मांसाहारी हिंस्र प्राण्यांचे मांस जास्त आवडते, असे सुश्रुत संहितेचे टीकाकार श्री डल्हणाचार्य यांनी म्हटले आहे. मांसवृध्दी म्हणजचेच मांसधातू आवश्यकतेपेक्षा वाढल्यास गाल, पोट, कुल्ले, मांड्या आणि गळा या ठिकाणी मांसवृध्दी दिसून येते. तसेच फोड, गाठी, अर्बुद, पूतिमांस, ॲलर्जी (अधिहर्षता) यांसारखे रोग होतात, असे चरक संहितेत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार शरीर बळकट करणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये मांसाहार सर्वश्रेष्ठ मानला आहे.
पहा : धातु-२, रक्तधातु, दोषधातुमलविज्ञान.
संदर्भ :
- अष्टांग संग्रह —सूत्रस्थान, अध्याय १ श्लोक ३२; शारिरस्थान अध्याय ६ श्लोक ६६.
- अष्टांग हृदय —सूत्रस्थान, अध्याय ११ श्लोक ४, १०, १८.
- चरक संहिता —चिकित्सास्थान, अध्याय १५ श्लोक १६, १७, २९.
- चरक संहिता —विमानस्थान, अध्याय ८ श्लोक १०५.
- चरक संहिता —सूत्रस्थान, अध्याय २८ श्लोक १३-१५.
- सुश्रुत संहिता —सूत्रस्थान, अध्याय १४ श्लोक १४, अध्याय १५ श्लोक २९ डल्हण टीका, अध्याय ३५ श्लोक १६, अध्याय ४६ श्लोक ५२९.
- सुश्रुत संहिता —शारीरस्थान, अध्याय ५ श्लोक ३९ डल्हण टीका.
समीक्षक – जयंत देवपुजारी