(सकर फिश/शार्कसकर). समुद्राच्या पाण्यात आढळणारा अस्थिमत्स्य वर्गाच्या एकिनीफॉर्म‍िस गणाच्या एकिनिइडी कुलातील मासा. लुचुक मासे उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात आढळतात. त्यांच्या १२ जाती असून भारतात ४ जाती आढळून येतात. भारतालगतच्या समुद्रात एकिनीज नॉक्रेटीज आणि रेमोरा रेमोरा या दोन जाती सर्वत्र दिसून येतात. समुद्राच्या पाण्यात जेमतेम बुडणाऱ्या प्रवाळ खडकांच्या सान्निध्यात तसेच निमखाऱ्या पाण्यात २०–५० मी. खोलीपर्यंत ते वावरतात. लुचुक मासे शार्क, रे मासा, कासव, व्हेल, डॉल्फिन, डुगाँग या मोठ्या प्राण्यांना तसेच होड्यांच्या खालच्या बाजूला चिकटलेले असतात.

लुचुक (रेमोरा रेमोरा)

लुचुक माशाची लांबी सु. ११० सेंमी. असून शरीर प्रवाहरेखित असते. शरीरावर लहान खवले असतात. डोके चपटे असून मुख जबड्यांनी वेढलेले असते. खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे असतो. डोक्याच्या दोन्ही बाजूस डोळे असून ते थोडेसे बाहेर व खालच्या बाजूस झुकलेले असतात. त्याच्या दोन्ही जबड्यांवर, तालूवर आणि जिभेवर दात असतात. कल्ल्यांच्या ७-८ जोड्या असतात. शेपटीवर पिवळसर तपकिरी रंगाचे पट्टे असतात. त्याला दोन पृष्ठपर, दोन वक्षपर, दोन गुदपर आणि एक पुच्छपर असतो. लुचुक माशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोक्यावर एक चूषक चकती असते. त्याच्या पहिल्या पृष्ठपराचे रूपांतर चूषक चकतीमध्ये झालेले असते. ती लंबवर्तुळाकार, बळकट व आडवे पडदे असलेली असते. या चकतीला शीर्षचूषक असेही म्हणतात. या शीर्षचूषकाने लुचुक मासे वेगाने पोहणाऱ्या मोठ्या प्राण्यांना अथवा बोटींना घट्ट चिकटतात.‍ केवळ आधार, संरक्षण आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते असे करतात, मात्र ते केव्हाही परजीवी नसतात. व्हेल आणि डॉल्फिन या सस्तन प्राण्यांच्या अधर बाजूला ते चिकटून राहतात. त्यामुळे ते मोठ्या प्राण्यांचे भक्ष्य होऊ शकत नाहीत. लहान मासे हे त्यांचे अन्न आहे. बांगडा व तरळी यांची झुंड जवळ आल्यावर ते मोठ्या प्राण्यांपासून अलग होऊन भक्ष्य पकडतात आणि पुन्हा मोठ्या प्राण्यांना चिकटतात. प्लवक, मोठ्या प्राण्यांवरील परजीवी आणि त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले मांसाचे तुकडे हेही लुचुक मासे खातात.

पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथे लुचुक माशांचे संवर्धन केले जाते. शार्क, कासव व डुगाँग या प्राण्यांना पकडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. लुचुक माशाच्या शेपटीला दोर बांधून शिकार दृष्टिपथात आल्यावर त्या दिशेने हे मासे सोडतात. शिकारी प्राण्यांना चिकटल्यानंतर शिकारीसह ते बोटीवर ओढून घेतात. लुचुक मासे खाण्यासाठी वापरतात. मात्र त्यांना पकडणे अवघड असते. ते मोठ्या संख्येने बोटीच्या तळाला चिकटून राहतात. त्यामुळे बोटीचा वेग कमी होतो, बोट एकाच जागी थांबते किंवा बोट बुडू शकते. पाणबुड्याच्या पायांना ते चिकटल्यामुळे त्यांना जखमा होतात. या माशाला ‘लुष्का’ अथवा ‘चूषमीन’ अशीही नावे आहेत.