एक आसनप्रकार. हे आसन तोलासन या नावानेही ओळखले जाते. विभिन्न परंपरांमध्ये शरीराचा तोल सांभाळणारे अनेक आकृतिबंध तोलासन या नावाने ओळखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कृती : पद्मश्री योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांच्या मतानुसार या आसनाची कृती पुढीलप्रमाणे आहे — कटिबंधाच्या (कंबरेच्या) रेषेत दोन पावलांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे रहावे. दोन्ही हात खांद्यासमोर सरळ रेषेत उचलावे. त्यांना जमिनीला समांतर ठेवत, टाचा वर उचलून चवड्यावर शरीराचा तोल सांभाळत, कंबरेत न वाकता गुडघ्यात ९० अंशात सावकाश वाकावे. असे केल्याने कटिबंध व गुडघे एका स्तरावर आणि मांड्या जमिनीला समांतर रेषेत येतील. दीर्घ अभ्यासाने डोळे मिटणे शक्य होते; परंतु, सुरुवातीला डोळे उघडे ठेवणेच इष्ट ठरेल. चेहरा, हात व धड जास्तीत जास्त शिथिल ठेवावेत (सजग भेदात्मक शिथिलीकरण). आसनाचा कालावधी ५ ते १५ श्वास घेण्याइतका ठेवावा. नंतर सावकाश पूर्वस्थितीत यावे. जास्त वेळ आसन ठेवता येत असल्यास एक आवर्तन करावे. अन्यथा दोन ते तीन आवर्तने करावीत. चवड्यांवर तोल राखणे सुरुवातीस कठीण वाटल्यास टाचा जमिनीवर ठेवण्यास हरकत नाही.
वरील कृती टाचा नितंबाला लागेपर्यंत पुढे चालू ठेवल्यास त्यास काही परंपरांमध्ये उत्कटासन असे म्हणतात. हे आसन करताना कंबरेत वाकणे, क्षमतेच्या पलीकडे तोल राखण्याच्या प्रयत्नात घसरून इजा होणे हे संभाव्य धोके टाळण्याची दक्षता घ्यावी.
लाभ : हे आसन केल्याने शारीरिक तोल राखण्याची क्षमता वाढते. मांड्या, गुडघे, पोटऱ्या, घोटे यांना हे आसन लाभदायक ठरते. या आसनामुळे वरील अवयवांतील स्नायू तसेच स्नायुबंध सशक्त व लवचिक होतात. तेथील रक्ताभिसरण सुधारते. मज्जातंतू कार्यक्षम होतात.
औदासिन्य (डिप्रेशन) सारख्या मानसिक आजारामध्ये उपचार म्हणून हे आसन अतिशय लाभदायक ठरते.
विधिनिषेध : पावले, घोटे, गुडघे, पोटऱ्या, मांड्या व कंबर इत्यादींमध्ये तीव्र वेदना असल्यास हे आसन टाळावे.
पहा : उत्कटासन.
समीक्षक : दीपक बगाडिया