परिचर्या संशोधन हे परिचारिकांनी करण्याच्या वेगवेगळ्या सेवाक्रिया व उपचार पद्धतीसाठी शास्त्रीय पुरावा निर्माण करून परिचर्या व्यवसायात शास्त्रीय ज्ञानाची भर घालते. परिचर्या संशोधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

परिमाणात्मक संशोधन (Quantitative research) : परिमाणात्मक संशोधन म्हणजे संख्यात्मक गोष्टी किंवा माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया होय. ही औपचारिक, वस्तुनिष्ठ, कठोर प्रणाली स्वरूप प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वेगवेगळी माहिती उत्पन्न केली जाते. हे संशोधन नवीन परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी, एखाद्या घटनेचे वर्णन करण्यासाठी किंवा एखादी संकल्पना मांडण्यासाठी केले जाते. यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी संख्यात्मक माहिती गोळा करून सांख्यिकीय पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जाते. या संशोधनाचा उपयोग प्रामुख्याने नमुना व सरासरी काढण्यासाठी, एखाद्या गोष्टीची भविष्यवाणी करण्यासाठी, कार्यकारिणी संबंध तपासण्यासाठी तसेच मिळालेले निष्कर्ष व्यापक लोकसंख्येसाठी सामान्यीकृत करण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या संशोधनाचे चार प्रकार पडतात.

  • वर्णनात्मक संशोधन (Descriptive Research) : जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी कमी किंवा अपुरी माहिती असते तेव्हा वर्णनात्मक संशोधन केले जाते. या प्रकारात वास्तविक जीवनातील परिस्थितीचा शोध घेऊन त्याचे वर्णन केले जाते. ह्यात व्यक्तीचे, गटाचे किंवा प्रसंगाचे वर्णन येते. यामध्ये संशोधक एखाद्या गोष्टीचे नवीन अर्थ शोधून काढतो किंवा जे अस्तित्वात आहे त्याचे स्पष्टीकरण देतो. तसेच एखाद्या घटनेची वारंवारता स्पष्ट करतो आणि माहितीचे वर्गीकरण करतो.
  • परस्परसंबंध संशोधन (Correlational research) : ह्या प्रकारामध्ये चलनामधील (Variable) किंवा चलादरम्यान असलेला परस्पर संबंध पद्धतशीरपणे तपासला जातो. यासाठी संशोधक त्याने निवडलेल्या चलनाचा संशोधनात समाविष्ट असलेल्या नमुना व्यक्तींमध्ये मोजमाप करून त्यानंतर संख्यात्मक पद्धतीचा वापर करून त्याचे परस्परातील संबंध तपासतो. याचबरोबर चलनातील परस्पर संबंधातील प्रकार, पायरी व सामर्थ्यही तपासता येते. ह्या संशोधनाचा प्रमुख व प्रथम हेतू हा दोन बाबी मधील किंवा चलनामधील परस्पर संबंधांचे स्पष्टीकरण देणे हा असतो.
  • अर्ध प्रायोगिक संशोधन (Quasi experimental research) : ह्या प्रकाराचा प्रमुख उद्देश चलनातील प्रासंगिक परस्पर संबंध स्पष्ट करणे किंवा एका चलनाचा दुसऱ्या चलनावर झालेला परिणाम तपासणे असतो. ह्या प्रकारात एखाद्या उपचार पद्धतीचा वापर करून त्याचा ठराविक निवडलेल्या चलनावर होणारा परिणाम मोजमापाच्या ठराविक पद्धतीने तपासला जातो. अर्ध प्रायोगिक संशोधनात उपचार पद्धतींवर, समाविष्ट व्यक्तीवर किंवा संशोधन क्षेत्रावर पूर्णपणे संशोधकाचे नियंत्रण शक्य नसते.
  • प्रायोगिक संशोधन (Experimental research) : हे संशोधन अत्यंत वस्तुनिष्ठ, पद्धतशीर व नियंत्रित चाचणी असून त्याचा प्रमुख उद्देश हा परिचर्या कृती विषयी भाकीत करणे किंवा त्यांना नियंत्रित करणे हा असतो. ह्या प्रकारात स्वतंत्र व आश्रित चल यातील करणीय संबंध अत्त्याधिक नियंत्रित स्थितीमध्ये तपासला जातो. ह्या प्रकारचे संशोधन परिमाणात्मक संशोधनातील सर्वात शक्तीशाली प्रकार आहे कारण यामध्ये चलांवर कठोर नियंत्रण ठेवले जाते.

गुणात्मक संशोधन (Qualitative research) : हा पद्धतशीरपणे व काल्पनिक दृष्टिकोन आहे, जो जीवनातील अनुभवाचे व त्यांच्या अर्थाचे विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो. गुणात्मक संशोधनामध्ये संख्यात्मक माहिती (उदा., काही मजकूर, दृक् किंवा श्राव्य फिती गोळा करून त्याचे विश्लेषण करून त्याचा उपयोग एखादी संकल्पना समजवण्यासाठी, मते मांडण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी केला जातो. तसेच त्याचा उपयोग एखाद्या प्रश्नामध्ये किंवा समस्यांमध्ये सखोल अंतर्ज्ञान मिळविण्यासाठी किंवा नवनवीन कल्पना निर्माण करण्यासाठी केला जातो. व्यक्ती कशा प्रकारे व त्या प्रकारे का वागतात ह्याचे उत्तर मिळविण्यासाठीसुद्धा गुणात्मक संशोधनाचा उपयोग होतो. ह्याच बरोबर व्यक्तींच्या वर्तणूकीबाबत सखोल माहिती सुद्धा गुणात्मक संशोधनातून मिळू शकते. या प्रकारच्या संशोधनात वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये संशोधन केले जाते.

  • मानसघटनाशास्त्रीय संशोधन (Phenomenological research) : या प्रकारात प्रामुख्याने व्यक्तींच्या एखाद्या विशिष्ट गटाने अनुभवलेल्या प्रसंगातील सामान्यतेवर प्रकाश झोत टाकला जातो. व्यक्तींनी अनुभवलेल्या प्रसंगाचे अन्वेषण ह्या प्रकारात केले जाते. ह्या प्रकाराचे एक ध्येय हे एखाद्या प्रसंगाचे स्वरूप वर्णन करणेही असते. यामध्ये प्रसंगातील सहभागी / प्रसंग अनुभवलेल्या व्यक्तींच्या अनुभवाच्या मूलतत्त्व किंवा सारा पर्यंत सुद्धा पोहोचले जाते.
  • प्रवृत्ती सिद्धांत संशोधन (Grounded theory research) : यामध्ये प्रामुख्याने एखाद्या गोष्टीची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते. या प्रकारात लोक एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची सत्यता कशा पद्धतीने व्यतीत करतात आणि कशा प्रकारे त्यांची श्रद्धा आणि कृती एकमेकांवर अवलंबून असते ह्याचे अन्‍वेषण केले जाते. हा प्रकार प्रामुख्याने ज्या गोष्टीविषयी किंवा क्षेत्राविषयी कमी किंवा अपुरी माहिती आहे त्यामध्ये करण्यात येतो. तसेच परिचित क्षेत्रांमध्ये नवीन दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठीही केला जातो. सिद्धांत निर्मितीसाठी व सिद्धांत सत्यापित करण्यासाठीही ह्या प्रकारच्या संशोधनाचा उपयोग होतो.
  • संस्कृती वर्णन संशोधन (Ethnographic research) : ह्या प्रकारात समाजाच्या एखाद्या विशिष्ट गटाचा किंवा समाजाच्या संस्कृतीचा किंवा सामाजिक संघटनेचा अभ्यास केला जातो. तसेच यामध्ये मानववंशशास्त्राविषयी माहिती गोळा करून लोकांविषयी किंवा ठिकाणाविषयी किंवा जीवनाच्या पद्धतींविषयी विश्लेषण केले जाते. आदिम, पाश्चात्त्य किंवा जुन्या संस्कृतीचाही यामध्ये अभ्यास केला जातो. या प्रकारचे संशोधन परिचर्या संस्कृतीवर आधारित सेवा देण्यासाठी उपयोगात येते.
  • ऐतिहासिक संशोधन (Historical research) : या प्रकारात भूतकाळातील घटनांचा सखोल अभ्यास केला जातो. ह्या संशोधनाचा उपयोग व उद्देश प्रामुख्याने भूतकाळातील घटनांचा अर्थ लावण्यासाठी व त्या घटनांमागील कारण जाणून घेऊन त्याचा वर्तमानात होणारा परिणाम पाहण्यासाठी व भविष्यात होणारा संभाव्य प्रभाव व परिणाम कथन करण्यासाठी केला जातो.‍

संदर्भ :

  • बसवंत अप्पा बि. टी. नर्सिंग  रिसर्च, तिसरी आवृत्ती, २०१४.
  • सामंत कुसुम, शुश्रूषा संशोधन, २०११.

समीक्षक : सरोज उपासनी