परिचर्या संशोधनाचे महत्त्व हे परिचर्या क्षेत्रातील परिचर्या प्रशिक्षण, परिचर्या रुग्णसेवा, परिचर्या व्यवस्थापन आणि परिचर्या व्यवसाय या सर्व घटकांशी संबंधित आहे.

१) परिचर्या  ‌प्रशिक्षण : परिचर्या संशोधन हे परिचर्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असून त्याचे असाधारण महत्त्व व गरज परिचर्या शिक्षणात आहे. परिचर्या संशोधन हे शिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण  देण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रथम हस्त अनुभव उपलब्ध करून देण्यासाठीही संशोधनाची गरज असते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नवनवीन व अद्यावत बाबींचा समावेश करून, त्याचे महत्‍त्‍व अंगीकारणे व त्याचे अवलोकन करण्यासाठीही संशोधन महत्त्वाचे ठरते. परिचर्या शिक्षणात व्यवसायिक ज्ञानाचे स्वतंत्र व्यासपीठ विकसित करण्यासाठीही संशोधन निकडीचे आहे.

स्वतंत्र शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी व शिक्षणातील अभ्यासक्रमात गरजेप्रमाणे व वेळेप्रमाणे बदल करण्यासाठी ही परिचर्या संशोधन आवश्यक असते. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी परिचर्या संशोधन महत्त्वाचे व गरजेचे आहे. तसेच शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत माहिती व वारंवार होणारे नवनवीन वैद्यकीय व संलग्नित क्षेत्रातील शोध व बदल आणि त्या सर्वांचा रुग्णसेवा व रुग्ण सुविधांवर होणारा परिणाम याविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी परिचर्या संशोधन गरजेचे असते. जुन्या ज्ञानामध्ये किंवा माहितीमध्ये काळानुसार व गरजेनुसार योग्य ते बदल घडून आणण्यासाठी ही परिचर्या संशोधनाची गरज व महत्‍त्‍व असामान्य आहे. स्पर्धेच्या युगामध्ये वैद्यकीय शिक्षणाची बरोबरी साधून परिचर्या व्यवसायाचे महत्‍त्‍व व गरज टिकवून ठेवण्यासाठीही परिचर्या संशोधन गरजेचे असते. एकंदरपणे परिचर्या शिक्षणाची  गुणवत्ता वाढविण्यासाठी व ती जोपासण्यासाठी व समाजात उच्च दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी परिचर्या संशोधन हे महत्त्वाचे व अत्यंत गरजेचे असते.

) परिचर्या रुग्ण सेवा : रुग्णालयात केल्या जाणाऱ्या रुग्ण सेवेमध्ये परिचर्या संशोधन  रुग्णसेवेशी निगडीत सेवा प्रणाली, शुश्रूषा पद्धती, उत्तम रुग्णसेवा या सर्वांमध्ये महत्त्वाचे व गरजेचे आहे. परिचर्या संशोधन प्रामुख्याने रुग्णांना व समाजाला गुणात्मक व दर्जेदार सेवा व शुश्रूषा देण्यासाठी, रुग्णांचे व समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर रुग्णाशी व्यावसायिक व सुदृढ नाते संबंध जोपासण्यासाठी संशोधनातील निष्कर्ष महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सामाजिक आरोग्य परिचारिकेचे कार्य करतानाही परिचर्या संशोधन उपयुक्त ठरते. आरोग्य क्षेत्रामध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी व आरोग्य क्षेत्रातील कणा म्हणून असलेली ओळख जोपासण्यासाठी व तसेच आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवून व्यवसायाची गरज टिकवून ठेवून त्याची प्रतीमा उंचविण्यासाठीही परिचर्या संशोधन महत्त्वाचे व गरजेचे आहे.

३) परिचर्या व्यवस्थापन : रुग्ण सेवेतील परिचर्या धोरणे व शिष्टाचार ठरविण्यासाठीही परिचर्या संशोधन उपयुक्त ठरते. तसेच परिचर्याच्या भूमिका मांडण्यासाठी ही परिचर्या संशोधनाची  गरज भासते. हॉस्पिटल मधील परिचर्या व्यवस्थापना अंतर्गत  परिचर्याची भरती प्रक्रिया, परिचर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी,त्यांच्या कल्याणासाठी   व्यवस्थापनाशी निगडीत परिचर्या संशोधनातील निकष कामी येतात.रुग्ण सेवेतील व्यवस्थापनामध्ये सातत्याने बदल व विकास घडवून आणण्यासाठी परिचर्या संशोधन उपयुक्त ठरते.  परिचारिकांना स्वतःची निर्णयक्षमता वाढविण्यासाठी व रुग्ण सेवेमध्ये रुग्णांच्या फायद्याचे निर्णय घेण्यासाठी तसेच रुग्णांच्या हिताचे बोलण्यासाठी परिचर्या संशोधन महत्त्वाचे ठरते. रुग्णसेवा देत असताना वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रियांना प्राधान्य देऊन त्यांना क्रमवार आयोजित करण्यासाठी संशोधन मदत करते. परिचर्या हस्तक्षेपांचा रुग्ण सेवेमध्ये एखाद्या प्रश्नावर झालेला परिणाम व त्यातून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना वर झालेले सकारात्मक परिणाम यांची नोंद करण्यासाठीही परिचर्या संशोधन गरजेचे असते आणि त्याच बरोबर रुग्ण सेवेच्या सर्वोत्तम पद्धती ठरविण्यासाठी व त्या पद्धतींचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा करून देण्यासाठी ही  परिचर्या संशोधन महत्त्वाचे व अत्यंत गरजेचे आहे.

) परिचर्या व्यवसाय : परिचर्या संशोधनातील निरनिराळे शोध, निकष व निरीक्षणांचा अवलंब परिचर्या शिक्षण, परिचर्या सेवा व परिचर्या व्यवस्थापन यामध्ये सातत्याने करून परिचर्या व्यवसायाची उंची व गुणवत्ता  वाढविण्यासाठी  परिचर्या संशोधन अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये परिचर्या व्यवसायाची गरज वृद्धिंगत करून त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढविण्यासाठी ही परिचर्या संशोधन महत्त्वाचे व गरजेचे असते.

संदर्भ :

  • Burns, Nancy; Gray, Jennifer; Grove, Susan, Understanding Nursing Research, 4 th ed., 2008.
  • बी. टी. बसवन्नथापा, नर्सिंग रिसर्च, तिसरी आवृत्ती, २०१४.
  • सामंत, कुसुम, शुश्रूषा संशोधन, पुनर्मुद्रण २०११.

समीक्षक : सरोज उपासनी