आइन्स्टाइनियम मूलद्रव्य

आइन्स्टाइनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील ॲक्टिनाइड श्रेणीतील मानवनिर्मित/संश्लेषित धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Es अशी असून अणुक्रमांक ९९ आणि अणुभार २५२ इतका आहे.

आइन्स्टाइनियमच्या सर्वांत स्थिर असणाऱ्या समस्थानिकाचा अर्धायुकाल (Half life period) २७० दिवस असून त्याचा द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज) २५४ आहे. म्हणूनच आवर्त सारणीत आइन्स्टाइनियमाचा अणुभार २५४ असाच दाखवला जातो.

पार्श्वभूमी : दक्षिण पॅसिफिकमधील प्रथमच झालेल्या हायड्रोजन बाँबच्या स्फोटानंतर (नोव्हेंबर १९५२) साचलेल्या डबरीमधून निरीक्षणासाठी नमुने गोळा करण्यात आले. या औष्णिक-अणुकेंद्रीय स्फोटातील (Thermonuclear explosion) नमुन्यांचे बर्कली, कॅलिफोर्निया येथे प्रयोगशालेय परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून ॲल्बर्ट घिओर्सो (Albert Ghiorso) व त्यांचे सहकारी यांनी आइन्स्टाइनियम (२५३) या समस्थानिकाची ओळख पटवली. आइन्स्टाइन यांच्या गौरवार्थ त्याला आइन्स्टाइनियम हे नाव दिले गेले.

स्फोटातून तयार झालेल्या किरणोत्सर्गी ढगांमधून हवाई योजनेतून नमुने घेण्यात आले. नंतर एनीवेटॉक (Enewetak) कंकणद्वीपातील प्रवाळांच्या खडकांच्या चुऱ्यातून आइन्स्टाइनियम आणि फेर्मियम-१०० या मूलद्रव्यांची ओळख पटवण्यात आली. याकरिता रासायनिक विलगीकरण पद्धत वापरण्यात आली. तसेच संबंधित अणुकेंद्रीय विक्रियांचा अभ्यास देखील करण्यात आला.

आढळ : आइन्स्टाइनियम हे मूलद्रव्य निसर्गात आढळत नाही. परंतु सापेक्षत: अधिक हलक्या अशा मूलद्रव्यांच्या केंद्रांच्या कृत्रिम मूलद्रव्यांतरणाने (एका मूलद्रव्याचे दुसऱ्यात रूपांतर करण्याच्या क्रियेने) हे मूलद्रव्य तयार होते किंवा करता येते.

संश्लेषण : अमेरिकेतील आर्को (आयडाहो) येथील परीक्षण-विक्रियकात (अणुभट्टीत) प्‍लुटोनियम-२३८ वर न्यूट्रॉनांचा दीर्घ काल मारा करून या मूलद्रव्याचे उच्च समस्थानिक म्हणजेच आइन्स्टाइनियम-२५३ हे शुद्ध समस्थानिक (Isotope) प्रथम तयार करण्यात आले.

आइन्स्टाइनियम : भौतिक गुणधर्म

भौतिक गुणधर्म : आइन्स्टाइनियम हे मऊ, चंदेरी रंगाचे आणि समचुंबकीय (Paramagnetic) मूलद्रव्य आहे. आइन्स्टाइनियम-२५३ हे मूलद्रव्य अतिशय किरणोत्सर्गी असल्याने त्याचे तेज दृश्य असते (Visible glow).

आइन्स्टाइनियमच्या अल्प संशोधनावरून असे दिसून येत की, घन संयुगांमध्‍ये त्याची +३ ही ऑक्सिडीकरण अवस्था असते, तर जलीय (Aqueous) स्थितीमध्ये आइन्स्टाइनियम आयन (Es+) तयार होतात. घन, अजलीय (Non-aqueous) आणि वायू स्थितीमध्ये काही वेळा +२ अशी ऑक्सिडीकरण अवस्था असल्याचे दिसून आले आहे.

समस्थानिके : सायक्लोट्रॉनच्या साहाय्याने भारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकावर हीलियम-आयनांचा किंवा प्रवेगित ड्यूटेरॉनांचा (ड्यूटेरियम या हायड्रोजनाच्या समस्थानिकाच्या अणुकेंद्रांचा) मारा करून आइन्स्टाइनियमाचे अनेक समस्थानिक मिळविण्यात आलेले आहेत आणि ते सर्व किरणोत्सर्गी (Radioactive) आहेत. त्यांचे अर्धायुकाल काही थोडी मिनिटे ते सुमारे पाऊण वर्ष इतकेच असतात. आइन्स्टाइनियम-२५४ या मूलद्रव्याचा उपलब्ध असा एकूण साठा अत्यल्प भरेल. परंतु वापरून त्याच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांचे परीक्षण करता येईल, इतपत तो आहे.

आइन्स्टाइनियम-२५५ आणि आइन्स्टाइनियम-२५६ यांपासून इलेक्ट्रॉनचे उत्सर्जन होऊन फेर्मियम (अणुक्रमांक-१००) या मूलद्रव्याची समस्थानिके तयार करतात.

सायक्लोट्रॉनमध्ये आइन्स्टाइनियम-२५३ यावर आल्फा किरणांचा मारा केल्यास मेंडेलेव्हियम (अणुक्रमांक-१०१) या मूलद्रव्याची समस्थानिके तयार होतात.

रासायनिक गुणधर्म : त्याचे रासायनिक गुणधर्म ॲक्टिनाइड श्रेणीतील इतर त्रि-संयुजी मूलद्रव्यांच्या गुणधर्मांसारखे आहेत.

संयुगे : आइन्स्टाइनियमची आइन्स्टाइनियम (III) क्लोराइड, आइन्स्टाइनियम (III) आयोडाइड आणि आइन्स्टाइनियम (III) ऑक्साइड अशी संयुगे संश्लेषित करण्यात आली आहेत.

उपयोग : आइन्स्टाइनियम हे मूलद्रव्य अस्थिर असल्याने त्याचा व्यापारी दृष्ट्या वापर केला जात नाही. या मूलद्रव्याचा अधिकाधिक वापर संशोधनासाठी केला जातो.

पहा : आइन्स्टाइन, ॲल्बर्ट; मेंडेलेव्हियम; युरेनियमोत्तर मूलद्रव्ये.

संदर्भ :