रॉबर्ट एमर्सन लूकास – धाकटा : (१५ सप्टेंबर १९३७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. लूकास यांना बुद्धीप्रणीत मीमांसा अर्थमिती गृहीतके विकसित केल्याबद्दल १९९५ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले. विसाव्या शतकाच्या अखेरच्या पाव शतकातील सर्वांत जास्त प्रभावशाली स्थूल अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहे.

लूकास यांचा जन्म वॉशिंग्टनमधील याकीमा या उपनगरात झाला. आईचे नाव जेन टेम्प्लेटन. लूकास यांनी १९५९ मध्ये शिकागो विद्यापीठातून इतिहास विषयात बी. ए. ही पदवी, तर १९६४ मध्ये अर्थशास्त्र विषयात पीएच. डी.  ही पदवी प्राप्त केली. ‘Substitution Between Labour And Capital In U. S. Manufacturing 1929 – 1958ʼ हा त्यांचा प्रबंध. त्यांचे लेखन त्यांनी आर्नोल्ड हर्बर्गर व एच. ग्रेग लेविस यांच्या मार्गदर्शनाखाली केले. डॉक्टरेटनंतर त्यांनी १९७१ अखेर कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील टेप्पेर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९७५ मध्ये ते पुन्हा शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. लूकास यांनी American Association व Econometric Society या संस्थांचे अध्यक्षपद भूषविले.

लूकास यांनी स्थूल अर्थशास्त्रप्रणाली, क्रीडासिद्धांत व विवेकी (Rational) निवडप्रणाली या संदर्भात संशोधन केले. त्यांनी विकसित केलेली विवेकी अपेक्षा (Rational Expectation), गृहीतके अर्थशास्त्राच्या अभ्यासकांकडून व्यापक प्रमाणात वापरली जातात. सदरची गृहीतके व त्यांचा अर्थव्यवस्थेतील विविध घटकांवर होणारा परिणाम यांबाबतच्या संशोधनासाठी लूकास हे नावाजले जातात. त्यांनी विकसित केलेल्या प्रणालीतील (Lucas Model) विविध आर्थिक घटक (Agent) उपलब्ध माहितीवर आधारित असून त्यांच्या साह्याने बाजारपेठेतील संभाव्य किंमत पातळी व वस्तू-सेवापुरवठा यांबाबतची भाकिते करणे शक्य होते. लूकास यांनी अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रिडमन (Milton Friedman)एडमंड फेल्प्स (Edmund Phelps) यांच्या पैशाच्या दीर्घकालीन तटस्थेबाबतच्या (Neutrality) दृष्टिकोणाची अतिशय प्रभावी, सैद्धांतिक व पायाभूत मांडणी करून उत्पादन व चलनवाढ यांतील नातेसंबंध स्पष्ट केले. १९७६ मध्ये त्यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांच्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना आव्हान दिले व सूक्ष्म अर्थशास्त्रप्रणाली (Micro Economics Theory) हाच स्थूल अर्थशास्त्र प्रणालीचा (Macro Economics Theory) आधार (पाया) असला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केले. लूकास यांच्या या संदर्भातील स्थूल अर्थशास्त्र विषयक संशोधनाला ‘Lucas Critiqueʼ असे संबोधण्यात येते. त्यांच्या आर्थिक धोरणनिश्चिती प्रणालीमुळे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांमधील परस्परसंबंध अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. उदा., चलनवाढ व बेरोजगारी यांतील परस्परसंबंध शासनाच्या आर्थिक धोरणनिश्चितीनुसार बदलणे शक्य असते. चलनवाढीमुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होते.

लूकास यांनी पुरवठा सिद्धांत (प्रणाली) विकसित केला. चलनविषयक विस्कळीत धोरणामुळे लोकांच्या मागणीवर व पर्यायाने वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो, अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी केली. त्यांनी आपल्या ‘लूकास-यूझावा प्रणालीʼद्वारे मानवी भांडवल संचयासंबंधीचे विश्लेषण केले. विकसित देशांकडून अविकसित देशांकडे भांडवल का प्रवाहित होत नाही, याची मीमांसाही त्यांनी केली. वर्तनवादी अर्थशास्त्राच्या मूलभूत संशोधनावरही त्यांनी भर दिला व त्याद्वारे एक किंमत प्रणाली (Law Of One Price) विकसित करून विचलनासंबंधी बौद्धिक विचारमंथन घडवून आणले. २००३ मध्ये त्यांनी असे उद्घोषित केले की, आर्थिक मंदी प्रतिबंधासंदर्भातील मध्यवर्ती समस्या व्यावहारिक दृष्ट्या सुटलेल्या असून त्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. गुंतवणूक सिद्धांत, आंतरराष्ट्रीय वित्त व आर्थिक वृद्धी यांबाबतही त्यांनी संशोधन केले. त्यांनी १९७० मध्ये लिहिलेले स्टडीज इन बिझनेस सायकल थिअरी या नावाचे तत्पूर्वीच्या लेखनकार्याचे संकलन, तसेच १९८७ मधील मॉडेल्स ऑफ बिझनेस सायकल हे दुसरे संकलन आर्थिक प्रणालीसंदर्भात दिशादर्शक मानले जाते.

लूकास याने स्वत: आणि सहकाऱ्यासह लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : स्टडीज इन बिझनेस सायकल थिअरी (१९८१), मॉडल्स ऑफ बिझनेस सायकल (१९८७), रिस्ट्रक्चरिंग दि मलेशियन इकॉनॉमी : डेव्हलपमेंट ॲण्ड ह्यूमन रिसोर्सेस (१९९९ – सहलेखक), लेक्चर्स ऑन इकॉनॉमिक ग्रोथ (२००२), इंटरनॅशनल मायग्रेशन ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट लेसन्स फ्रॉम लो-इन्कम कंट्रीज (२००५), कलेक्टेड पेपर्स ऑन मॉनेटरी थिअरी (२०१२).

लूकास यांनी १९९५ मध्ये लिहिलेला ‘Monetary Neutralityʼ हा विख्यात प्रबंध आहे. त्यांचे अर्थशास्त्रविषयक अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रासंबंधित अनेक नियतकालिकांचे संपादक व सहसंपादक म्हणूनही काम पाहिले आहे.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा