शिलर, रॉबर्ट जेम्स. (Shiller, Robert James) : (२९ मार्च १९४६). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. शिलर यांना यूजीन एफ. फॅमा (Eugene F. Fama)लार्स पिटर हॅन्सेन (Lars Peter Hansen) या अमेरिकन अर्थतज्ज्ञांबरोबरीने मालमत्ता मूल्यनिर्धारणासंबंधीची अनुभवजन्य विश्लेषणप्रणाली विकसित केल्याबद्दल २०१३ मध्ये अर्थशास्त्रविषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेषत: शिलर यांना भाग व रोख्यांच्या किंमतीत दीर्घकालीन होणाऱ्या बदलांच्या स्वरूपाविषयीचे अनुमान व गुंतवणूकदारांच्या भविष्यकालीन मोबदल्याबाबतच्या अवाजवी अपेक्षा यांबाबतच्या संशोधनासाठी सदरचा पुरस्कार दिला गेला. जगातील पहिल्या शंभर प्रभावशाली अर्थतज्ज्ञांमध्ये शिलर यांचा समावेश होतो.

शिलर यांचा जन्म अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डीट्रॉइट येथे झाला. त्यांनी कालामाझू कॉलेज तसेच मिशिगन विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत १९६७ मध्ये अर्थशास्त्र विषयात बी. ए. पदवी मिळविली. मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.)मधून १९६८ मध्ये एम. एस. आणि १९७२ मध्ये तेथूनच पीएच. डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. तदनंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील वार्टन स्कूल आणि मिनिसोटा विद्यापीठ येथे अर्थशास्त्रविषयाचे अध्यापन केले. १९८२ पासून ते प्रसिद्ध अशा येल विद्यापीठात अध्यापन करीत होते. नंतर तेथेच अर्थशास्त्रविषयाचे स्टर्लिंग प्राध्यापक होते. सध्या ते आय़.एस.एम. विद्यापीठात व्यवस्थापनशास्त्र व अर्थशास्त्र या विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

शिलर यांनी रोखे बाजारातील चढउतार व पातळी मूलत: बुद्धिगम्य (Rational) असते, या फॅमा यांच्यावर पगडा असलेल्या गृहीतकाच्या विरोधी आपली भूमिका मांडली. गुंतवणूकदारांच्या या संदर्भातील अतिउत्साहाला त्यांनी अबुद्धिगम्य किंवा अविवेकी आशावाद असे संबोधले. वित्तीय बाजारपेठातील रोख्यांच्या किंमती बऱ्याचदा अनपेक्षितपणे अत्युच्च पातळीवर पोचतात व त्याचे आकलन वा विश्लेषण करणे कठीण होते. शिलर यांनी यासंदर्भात २००२ मध्ये झालेल्या माहिती तंत्रज्ञान व २००६ मधील स्थावर मालमत्ता या क्षेत्रांतील रोख्यांच्या चढ्या किंमतींचा दाखला दिला. शेअरबाजार व मालमत्तामधील गुंतवणूकदारांचे आर्थिक वर्तन अभ्यासण्यासाठी मानसशास्त्र व सामाजिकशास्त्रांचा आधार घेणारा तो पहिलाच अर्थतज्ज्ञ मानला जातो. कार्ल केज यांच्या सहकार्याने त्यांनी एस. ॲण्ड पी/केस-शिलर होम प्राइस इंडेक्स हे अमेरिकेतील मोठ्या शहरामधील निवासी इमारतींच्या किंमतीतील बदल अभ्यासण्यासाठी तंत्र विकसित केले. रोख्यांच्या दीर्घकालीन किंमतीसंबंधीचे भाकित करणे शक्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. १९८१ मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘डू स्टॉक प्रायसेस मूव्ह टू मच टू बी जस्टिफाइड बाय सब्स्क्वेंट चेंजेस इन डिव्हिडंड्सʼ या लेखात गुंतवणूकरदार भाग व रोख्यांपासून मिळणाऱ्या लाभाच्या आधारे किंमतीच्या पातळीसंबंधी अपेक्षा ठेवतात, हे आपल्या अमेरिकन शेअरबाजारासंबंधीच्या अभ्यासाच्या आधारे दाखवून दिले.

ऑक्टोबर १९८७ मध्ये अमेरिकन शेअरबाजार (Share Market) जेव्हा ढासळला, त्या वेळी शिलर याचे गुंतवणूकदारांच्या वित्तविषयक वर्तनाचे निरीक्षण खरे ठरल्याचे दिसून आले. १९८९ मध्ये त्याने यासंदर्भात गुंतवणूकदार व शेअरबाजारातील दलालांच्या रोखे खरेदी-विक्री प्रेरणासंबंधी व्यापक स्वरूपाच्या मुलाखती केल्या आणि असे दाखवून दिले की, गुंतवणूकीसंबंधीचे त्यांचे निर्णय (वर्तन) बुद्धीगम्य (विवेकी) नसून भावनिक पातळीवरचे होते. त्यांनी १९९१ पासून व्यावहारिक अर्थ ते रिअल इस्टेट जोखीम व्यवस्थापनापर्यंत मोठे लिखाण केले आहे. ते १९९१ पासून व्यवहारिक वित्तव्यवस्थेत अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल विजेते रिचर्ड एच. थेलर (Richard H. Thaler) यांच्याबरोबर एन.बी.आर. कार्यशाळेचे सहसंयोजक आहे. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या न्यूयॉर्कमधील सर्वाधिक खपाच्या इंटरनॅशनल एक्सूबेरन्स या त्यांच्या ग्रंथात तेथील शेअरबाजार मार्च २००० मध्ये अत्युच्च पातळीवर पोहचले असून त्यानंतर त्यात मोठी घट संभवत असल्याचा इशारा दिला. २००६ मध्ये दि वॉल स्ट्रीट जर्नलमधील आपल्या लेखात अमेरिकन वित्तीय व्यवस्थेपुढे कठीण काळ संभवत असून वस्तू व मालमत्तांची विक्री व शेअरबाजारात पडझड होऊन थकबाकीदारांची संख्या वाढेल व आर्थिक मंदी येईल, असा धोक्याचा इशारा त्याने दिला. त्याचे भाकित खरे ठरून २००७ मध्ये लेहमन ब्रदर्ससारखी बलाढ्य वित्तीय संस्था ढासळली. निवासी घरांच्या मागणीत कमालीची घट होऊन आर्थिक अरिष्ट उद्भवले. वित्तीय सिद्धांताच्या मांडणीबरोबरच जोखीम विभाजन (Risk Allocation) वित्तीय बाजारपेठातील बाष्पनशीलता (Volatility), शेअरबाजारातील चढउतार यासंबंधी व्यावहारिक उपाय सूचवून शास्त्रकर्त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास साह्य केले. बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षित वाटचालीच्या दृष्टीनेही त्यानी काही उपाययोजना प्रस्तावित केल्या. २०१० मध्ये वित्तीय संशोधन कार्याबद्दल फॉरेन पॉलिसी या मासिकाने उच्च अशा जागतिक विचारवंतामध्ये त्यांचा समावेश केला.

शिलर यांनी स्वत: व सहकाऱ्यांबरोबर लिहिलेली ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : इस्टिमेटींग दि कंटिन्युअस टाइम कन्झम्प्शन बेस्ड ॲसेट प्राइसिंग मॉडेल (१९८५–सहलेखन), मार्केट वोलॅटिलिटी (१९८९), मॅक्रो मार्केट्स (१९९३), दि न्यू फायनान्सियल ऑर्डर (२००३), दि केस ऑफ ट्रिल्स (२००८–सहलेखन), दि सबप्राइम सोल्यूशन्स (२००८), ॲनिमल स्पिरीट्स (२००९), न्यू फायनॅन्शिअल ऑर्डर-रिस्क इन दि २१स्ट सेंच्युरी (२००९), ॲकरलॉफ, ॲनिमल स्पिरिट्स (२०१०–सहलेखन), रिफॉर्मिंग यू. एस. फायनॅन्शिअल मार्केट्स (२०११–सहलेखन), फायनान्स ॲण्ड गूड सोसायटी (२०१२), फिशींग फॉर फुल्स (२०१५–सहलेखन). शिवाय त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

शिलर यांना नोबेल पुरस्काराबरोबर त्याच्या संशोधनकार्यासाठी पुढील सन्मान लाभले : येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे फेलो, नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चचे संशोधक सहयोगी (१९८० पासून), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (२००५), डच बॅक प्राइझ (२००९).

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा