संत फ्रान्सिस झेव्हिअर यांचे शव

एक ख्रिस्ती धार्मिक स्थळ. कॅथलिक व्रतस्थ संघांमध्ये जो ‘जेज्वीट संघ’ उदयाला आला त्याचा संस्थापक संत इग्नेशियस ह्याच्याबरोबर एक पाईक होता, त्याचे नाव संत फ्रान्सिस झेव्हिअर (इ.स. १५०६–१५५२). इ.स. १५४० मध्ये या संघाला पोप महोदयांची संमती मिळून त्याला मूर्तस्वरूप येण्याअगोदरच भारतभूमीत धर्मप्रचार करण्यासाठी दिनांक ७ एप्रिल १५४१ रोजी फादर झेव्हिअर यूरोपमधून निघाले. १५४२ च्या मे महिन्याच्या ६ तारखेला त्यांनी या भारतभूमीवर पाऊल ठेवले. त्यांच्या अंतर्यामी धर्मप्रसाराची तळमळ इतक्या तीव्र प्रमाणात होती की, त्याची पावले एका ठिकाणी कुठेच स्थिरावून राहू शकली नाहीत. दि. १५ एप्रिल १५४९ रोजी धर्मप्रचार करत करत गोव्याहून निघून दक्षिण भारताचा किनारा पार करून श्रीलंकामार्गे हिंदी महासागरातील अनेक बेटांना भेटी देत देत ते जपानपर्यंत गेले. यूरोपपर्यंत निघाल्यापासून जवळजवळ ३८,००० मैलांचा सागरी प्रवास त्यांनी पूर्ण केला होता. तेथे शुक्रवार, दि. २ डिसेंबर १५५२ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या जगाची त्यांची जीवनयात्रा संपल्यानंतर त्यांची दुसरी एक यात्रा सुरू झाली, ती होती त्यांच्या शवाची यात्रा.

जीवघेण्या आजाराने मृत्यू ओढवताच जपानमधील सिंचियन या बेटावर त्यांना रवि. दि. ४ डिसेंबर १५५२ रोजी किनाऱ्यावरच पुरण्यात आले. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर दि. १७ फेब्रुवारी १५५३ रोजी ‘सांताक्रूझ’ नावाच्या एका जहाजाने त्यांचे शव गोव्याला पाठविण्याचे ठरले होते; परंतु ते उकरून काढताच त्याचे विघटन न होता ते शव मूळ अवस्थेत असल्याचे व फादरांचा चेहरा पूर्वस्थितीत व टवटवीत असल्याचे दिसून आले.

बाँ जेझूस चर्च, गोवा.

२२ मार्च १५५३ रोजी हे मालवाहू जहाज मलाक्का बंदरात जाऊन पोहोचले. तेथे मोतमावलीच्या सन्मानार्थ असलेल्या एका छोटेखानी चर्चमध्ये ते शव तेथे काही काळापुरता एका थडग्यात दफन करण्यात आले. तेथून १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी ते उकरून काढण्यात आले व पुढे गोव्याच्या दिशेने त्याची यात्रा सुरू झाली. दि. १६ मार्च १५५४ या शुक्रवारच्या दिवशी (म्हणजे ‘गुडफ्रायडे’च्या आदल्या शुक्रवारी) त्यांचे शव गोव्याच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले. शासकीय व धार्मिक वरिष्ठजन यांच्या उपस्थितीत गोव्याच्या व्हॉईसरॉयने चर्चघंटाच्या निनादांत त्या शवाचे जंगी स्वागत केले.

लोकांच्या अलोट गर्दीमुळे सलग तीन दिवस सदर शव दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले; परंतु गर्दीला अंतच नव्हता. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी तो मृतदेह शवपेटीत घालण्यात आला. फा. फ्रान्सिस झेव्हिअर यांचा मृतदेह सिंचियन बेटावरून उकरून काढल्यापासून ते गोव्यात शवपेटीत घालेपर्यंत या संपूर्ण प्रवासात ते ताजे व टवटवीतच होते. मूळ अवस्थेत होते, याची साक्ष देण्यासाठी साठ-सत्तर वर्षांनंतर दि. २७ एप्रिल १६१९ रोजी त्यांच्या उजव्या हाताचा वरचा भाग धडावेगळा करण्यात आला व तो रोम नगरीत त्या संघाचे जे सर्वोच्च धर्माधिकारी राहतात तेथे जेझूया चर्चमध्ये पाठविण्यात आला.

गेले ४५० वर्षांहून अधिक काळ सदर शव गोव्यातील ‘बाँ जेझूस’ या चर्चमध्ये ठेवण्यात आले आहे. लोकांच्या आग्रहास्तव महत्त्वाच्या सोहळ्याप्रसंगी ते त्याच्या मूळ ठिकाणाहून काढून लोकांच्या सार्वजनिक दर्शनासाठी चर्चमध्ये खाली ठेवले जाते. सार्वजनिक दर्शनाचा सदर प्रघात १७८२ पासून चालू आहे व अलीकडच्या काळात तर दर १० वर्षांनी ३ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते लोकदर्शनासाठी खुले ठेवले जाते. जवळपास सहा-सात आठवड्यांच्या या कालावधीत जगभरचे भाविक त्या शवाचे दर्शन घेत असतात. आजवर अशी १५ जाहीर दर्शने आयोजित करण्यात आली आहेत.

१२ मार्च १६२२ रोजी ‘संत’ म्हणून जाहीर झालेल्या या महात्म्याचा या जगीचा जीवनप्रवास होता अवघा ४६ वर्षांचा; परंतु त्यांच्या शवाचा प्रवास झाला आहे ४६० हून अधिक वर्षांचा. या थोर संताचे शव गोवा येथे दि. १९ फेब्रुवारी १६२४ पासून कलाकुसरयुक्त अशा एका चांदीने मढवलेल्या पेटिकेत असल्यामुळे त्या बाँ जेझूस चर्चला तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

संदर्भ :

  • Mausofe, A. J. M.; Mausolfe, J. K. Saint Companisons, Mumbai, 2004.
  • Schurhammer, Georg, Francis Xavier : His Life, His Times, Vol. II, 1980.
  • Thekkedath, J. The History of Christanity in India, Vol. II, Banglore, 1982.
  • कोरिया, फ्रान्सिस, संत फ्रान्सिस झेविअर, मुंबई, २०१४.
  • कोरिया, फ्रान्सिस, सामवेदी ख्रिस्ती समाज (सांस्कृतिक इतिहास), मुंबई, १९९८.
  • सरदेसाई, मनोहर हि. गोमंतकीय खिश्चन समाज : निर्मिती व कार्य, कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा, २००१.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो