देव, शंकर श्रीकृष्ण : (१० ऑक्टोबर १८७१–२३ एप्रिल १९५८). निष्ठावंत समर्थभक्त, रामदासी संप्रदाय व साहित्य ह्यांचे संशोधक–अभ्यासक–प्रकाशक व सामाजिक–राजकीय कार्येकर्ते. धुळे येथे त्यांचा जन्म झाला. पुण्यास राहून बी. ए. एल्एल्. बी. झाल्यानंतर (१८९३, १८९८) धुळ्याला वकिली करू लागले. पुण्यास असताना चिपळूणकर, टिळक, आगरकर, गोखले आदींच्या विचारांचा प्रभाव पडून त्यांच्यातील देशभक्तीची भावना चेतली होती.

तिच्याच प्रेरणेतून ते समर्थ रामदासांच्या जीवनाकडे आणि साहित्याकडे आकृष्ट झाले. १८९३ मध्ये धुळ्यास त्यांनी ‘सत्कार्योत्तेजक सभे’ची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाचे आणि जुन्या मराठी साहित्याचे–विशेषतः रामदासी साहित्याचे संशोधन–प्रकाशन करणे, हे ह्या संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. ह्या संस्थेच्या ‘रामदास आणि रामदासी’ ह्या ग्रंथमालेने समर्थांचे दासबोधादी ग्रंथ तसेच रामदासी संशोधनपर लेखनही प्रकाशित केले. शेकडो रामदासी आणि इतर हस्तलिखित बाडांची वर्णनात्मक सूची उपलब्ध करून दिली. श्री रामदासींची ऐतिहासिक कागदपत्रेही प्रसिद्ध केली (१९३०). ह्या संस्थेने जमविलेली हस्तलिखित बाडे आणि ऐतिहासिक कागदपत्रे सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी देवांनी धुळ्यात श्रीसमर्थवाग्देवता मंदिर उभे केले आणि तेथे ती ठेवली. श्रीसमर्थसंप्रदायातील ग्रंथांचे प्रकाशन व विचारांचे विवेचन करण्यासाठी रामदास आणि रामदासी ह्या नावाचे एक मासिक ‘सत्कार्योत्तेजक सभे’तर्फे त्यांनी १९१५ मध्ये काढले. ह्याच नावाची उपर्युक्त ग्रंथमाला १९०५ मध्ये सुरू केलेली होती. तिला ह्या मासिकाची जोड देण्यात आली. इतिहास आणि ऐतिहासिक  हे सत्कार्योत्तेजक सभेतर्फे देवांनी चालविलेले आणखी एक मासिक. उपलब्ध झालेल्या मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रकाशन करणे आणि विविध ऐतिहासिक विषयांचे विवेचन करणे, हे हेतू हे मासिक काढण्यामागे होते. समर्थांचे मराठवाड्यातील जन्मग्राम जांब येथे समर्थांचे एक सुंदर मंदिर त्यांनी पुढाकार घेऊन उभारले. अनेक रामदासी मठांच्या वास्तूंचा त्यांनी जीर्णोद्धार केला. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्रीसमर्थचरित्रही (श्रीसमर्थावतार १९४९ श्रीसमर्थ हृदय १९४२, श्रीसमर्थसंप्रदाय १९४५) प्रसिद्ध आहे. राजकीय चळवळींतही त्यांनी भाग घेतला ब्रिटिश सरकारच्या अन्याय्य धोरणांविरुद्ध आंदोलने केली. स्वातंत्र्यप्रेमी क्रांतिकारकांच्या ‘अभिवनभारत’ ह्या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता तथापि त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. धुळे नगरपालिकेचे सदस्य, त्या नगरपालिकेच्या ‘स्कूल बोर्डाचे’ अध्यक्ष (१९१३–१५) आदी नात्यांनी त्यांनी धुळे शहराची सेवा केली. मुंबई कायदे मंडळाचे (बाँबे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल) सदस्य (१९१८–२७) म्हणूनही त्यांनी काम केले. राजकारणात आरंभी ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या ‘होमरूल लीग’ ला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी त्यांनी खानदेशात दौरा केला होता. १९२० नंतर मात्र त्यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव पडला. १९२८ नंतर रामदासांचे जीवन आणि साहित्य ह्यांसंबंधीच्या संशोधनाला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतले. श्रीसमर्थसंघ ही समर्थभक्तांची एक संघटनाही त्यांनी स्थापन केली होती. त्यांच्या वृद्धापकाळी त्यांचा एकुलता एक मुलगा निधन पावला. त्या दुःखाचा धक्का असह्य होऊन धुळे येथे ते निधन पावले.

संदर्भ :

  • https://maharashtranayak.in/daeva-sankara-saraikarsana

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.