(परिचालन प्रणाली; संगणक कार्य प्रणाली; Operating System). बहुवापरकर्ते संगणक परिचालन प्रणाली. युनिक्स ही परिचालन प्रणाली प्रामुख्याने इंटरनेट सर्व्हर (Internet Server), वर्कस्टेशन (कार्यथांबे; Workstation) आणि मेनफ्रेम संगणक यांकरिता वापरण्यात येते. युनिक्स संगणक परिचालन प्रणाली आज्ञावल्यांचा (प्रोग्राम्स; Programs) एक संच असून ती संगणक आणि वापरकर्ता यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. परिचालन प्रणाली एक प्रकारची अज्ञावली (सॉफ्टवेअर) असून ते फाईल व्यवस्थापन, स्मृती व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्थापन, आदान माहिती (इनपुट) आणि प्रदान माहिती (आउटपुट) हाताळणे आणि डिस्क ड्राइव्ह आणि मुद्रक (प्रिंटर) यांसारख्या परिघीय उपकरणांवर नियंत्रण ठेवणे यांसारखी सर्व मूलभूत कामे पार पाडते.

युनिक्स परिचालन प्रणालीमध्ये अनेक लोक, अनेक कामे एका वेळेस करू शकतात. ती विकसित करण्याचे काम एटी अँड टी कॉप. बेल लॅबोरेटरी येथे 1960च्या शेवटच्या दशकात करण्यात आले. त्यानंतर 1969 ला केन टॉमसन (Ken Thompson) आणि डेनिस रित्ची (Dennis Ritchie) यांनी ‍मिनी संगणकावरील पीडीपी-7 (PDP-7; Programmed Data Processor) यावर युनिक्स या प्रणालीची पहिली आवृत्ती तयार केली. दुसऱ्या संगणकांसाठी युनिक्सला सहज रूपांतरित करण्यात आले आणि 1970 च्या शेवटच्या दशकात पीडीपी-11 (PDP-11) यामध्ये तिला सुधारित करण्यात आले. 1970 च्या मध्यंतरी टॉमसन यांनी बेल लॅबोरेटरी सोडली परंतु त्यांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मिळून युनिक्सला अधिक विकसित केले. ती युनिक्सची नवीन आवृत्ती होती, त्यालाच पुढे बर्कली सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन (BSD) असे नाव देण्यात आले. बेल लॅबोरेटीत युनिक्सवर काम चालूच होते, 1983 ला युनिक्सची नवीन आवृत्ती सिस्टम-फाइव्ह (System-V) त्यांनी प्रकाशित केली. नंतर सन मायक्रोसिस्टम इनकॉ. आणि  सिलिकॉन ग्राफिक्स इनकॉ. यांनी तयार केलेले युनिक्स आवृत्ती समाविष्ट करण्यात आले. संगणक तंत्रज्ञानाच्या सुधारणांसह विकासाने युनिक्सला गती मिळाली. युनिक्स ‍लिनक्स (Linux) आणि फ्रीबीएसडी (FreeBDS) यांसारख्या विनामूल्य मुक्त-स्रोत परिचालन प्रणालींना साहाय्यभूत ठरली आहे.

युनिक्समधील सर्व माहिती (डेटा) फायलींमध्ये आयोजित केली जाते व सर्व फाईल्स निर्देशिकामध्ये (डिरेक्टरीज; Directories) व्यवस्थित साठवूण ठेवता येतात. या निर्देशिका फाईलसिस्टम नावाच्या झाडासारख्या संरचनेत संयोजित केल्या जातात. संगणक प्रोग्राम जे संगणक परिचालन प्रणाली संसाधनांचे वाटप करतात आणि संगणकाच्या अंतर्गत (इंटर्नल्सच्या) सर्व तपशीलांचे समन्वय करतात, त्यांना संगणक परिचालन प्रणाली किंवा कर्नल (Kernel) म्हणतात. शेल (Shell) म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रोग्रामद्वारे वापरकर्ते कर्नलशी संवाद साधतात. शेल हे आज्ञा (Command) ओळखणारी ओळ  आहे, जी वापरकर्त्यांनी दिलेल्या आज्ञाचे भाषांतर आणि कर्नलला समजेल अशा भाषेत रूपांतर करते.

बाजारात युनिक्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. सोलारिस युनिक्स (Solaris Unix), एआयएक्स (AIX), एचपी युनिक्स (HP Unix) आणि बीएसडी (BSD) ही काही उदाहरणे आहेत. लिनक्स हा युनिक्सचाच प्रकार आहे जे विनामुल्य उपलब्ध आहे. बरेच लोक एकाच वेळी युनिक्स संगणक वापरू शकतात; म्हणूनच युनिक्सला अनेक वापरकर्ते (मल्टीयूजर) प्रणाली म्हणतात. वापरकर्ता एकाच वेळी एकाधिक प्रोग्राम देखील चालवू शकतो; म्हणूनच युनिक्स एका वेळेस अनेक कामे (मल्टीटास्किंग) करण्यासाठी वातावरण निर्माण करते.

युनिक्स संरचना : युनिक्स प्रणालीची मूलभूत आकृती.

युनिक्सच्या सर्व आवृत्त्यांना एकत्र करणारी मुख्य पुढील चार मूलतत्त्वे आहेत :

कर्नल (Kernel) – कर्नल संगणक परिचालन प्रणालीचे हृदय आहे. ते संगणकीय उपकरणे (हार्डवेअर) आणि स्मरणकक्ष (मेमरी) व्यवस्थापन, कार्यवेळापत्रक (टास्क शेड्युलिंग) आणि फाइल व्यवस्थापन यांसारख्या बर्‍याच कामांशी संवाद साधते.

शेल (Shell) – शेल ही वापरकर्त्याच्या विनंतीवर प्रक्रिया करते. जेव्हा वापरकर्ता आज्ञा देतो, तेव्हा शेल आज्ञेचा अर्थ लावतो आणि आपण इच्छित कार्यक्रमाला जोडतो. शेलमध्ये सर्व आज्ञेसाठी आदर्श मांडणी (Standard Syntax) असते. सी शेल (C Shell), बॉर्न शेल (Borne Shell) आणि कॉर्न शेल (Korn Shell) हे सर्वांत प्रसिद्ध शेल आहेत जे बहुतेक युनिक्सच्या बदलणाऱ्या आवृत्यांसह उपलब्ध आहेत.

आज्ञा आणि उपयुक्तता (Commands and Utilities) –  अनेक आज्ञा व उपयोगी कार्यक्रम यात आहेत, ज्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये करू शकता. सीपी (cp), एमव्ही (mv), कॅट (cat) आणि ग्रेप (grep) इ. आज्ञा आणि उपयोगी कार्यक्रम अशी काही उदाहरणे आहेत. तेथे 250 पेक्षा जास्त आदर्श आज्ञा आहेत. सर्व आज्ञा विविध पर्यायांसह उपलब्ध आहेत.

फायली आणि निर्देशिका (Files and Directories) – युनिक्सची सर्व माहिती फायलींमध्ये आयोजित केली जाते. सर्व फाइल नंतर निर्देशिकांमध्ये व्यवस्थित जतन केल्या जातात. या संचयिका पुढे फाईलसिस्टम नावाच्या झाडासारख्या संरचनेत संयोजित केल्या जातात.

वापर : युनिक्स उपयोगिता सर्व्हरसाठी डोमेन नेम सिस्टम किंवा डीएनएस, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल किंवा डीएचसीपी आणि वेब सर्व्हरसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. युनिक्स थेट वापरकर्त्याच्या संवादांची आवश्यकता नसलेल्या अनुप्रयोगांसाठी एक स्थिर आणि सुरक्षित व्यासपीठ देखील प्रदान करते.

फायदे : संरक्षित स्मृतीसह संपूर्ण मल्टीटास्किंग. एकाधिक वापरकर्ते एकमेकांना हस्तक्षेप न करता एकाच वेळी एकाधिक परिचालन प्रणाली चालवू शकतात. विविध प्रकारच्या संगणकावर उपलब्ध असल्यामुळे ही सुवाह्य परिचालन प्रणाली म्हणून ओळखली जाते.
असामान्य परिस्थितीत जे संशोधनातील नियम आहेत त्यांना अनुसरून ही प्रणाली बनवण्यासाठी अनुकूलित केली आहे.

युनिक्स कमीत-कमी स्मृती वापरून बहुवापरकर्ते, बहुकार्यप्रणाली, संरक्षित स्मृती प्रक्रिया प्रदान करते. युनिक्स त्याच्या खात्याचे प्रमाणीकरण आणि प्रमाणीकरणाद्वारे देखील वापरकर्त्यास ठोस सुरक्षा प्रदान करते.

तोटे : युनिक्स ही नवीन वापरकर्त्यासाठी अनुकूल परिचालन प्रणाली नाही. या प्रणालीचा मूलभूत इंटरफेस ओळ ही आज्ञा आहे आणि अनुभवी वापरकर्ते देखील हा इंटरफेस वापरून चुका करू शकतात आणि युनिक्समधील चुका त्रासदायक असू शकतात. काही आज्ञा तसेच त्यांचे पर्यायही गुप्त असू शकतात. बर्‍याच साधनांवरील कागदपत्रे शोधणे कठीण जाते आणि बर्‍याचदा अपूर्ण देखील असते.

कळीचे शब्द :  #कर्नल #शेल #युनिक्स.

संदर्भ :

समीक्षक : अक्षय  क्षीरसागर