गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. इटालियन गणितज्ज्ञ फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली हे पुस्तकपालनामध्ये दुप्पट पद्धतीविषयी लिहिणारे व त्याविषयी माहिती सांगणारे पहिले गणितज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांना लेखातंत्र आणि पुस्तकपालन यांचे जनक म्हणतात. त्यांचा जन्म बॉरगो सेन्सीपॉलक्रो तुस्कानी येथे झाला. त्यामुळे त्यांना लुका दी बॉरगो या नावानेही संबोधले जाते. त्यांनी गुंतवणूक दुप्पट कशी करता येईल, याबाबत सर्वप्रथम बहात्तरचा नियम ही संकल्पना मांडली; परंतु त्यांनी नियमाचे स्पष्टीकरण केले नाही. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या मते, ७२ चा नियम ही संकल्पना चक्रवाढ व्याजदर या संकल्पनेशिवाय स्पष्ट करता येऊ शकत नाही.

गुंतवणूक केलेली रक्कम किती वर्षांत दुप्पट होईल, याचे उत्तर मिळविण्याकरिता ७२ या संख्येस गुंतवणुकीवरील व्याजदराने भागल्यास जी संख्या येते, तेवढी वर्षे गुंतवणूक रक्कम दुप्पट होण्यास लागतात. उदा., बँकेतील ठेव योजनेमध्ये दहा हजार रुपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी द. सा. द. शे. नऊ टक्के व्याज देत असेल, तर ७२ या संख्येला ९ या संख्येने भागल्यास ८ हे उत्तर येते. म्हणजेच दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे बहात्तरच्या नियमानुसार दुप्पट रक्कम म्हणजे वीस हजार रुपये होण्याकरिता ८ वर्षे एवढा कालावधी लागेल.

७० चा नियम : सत्तरचा नियम म्हणजे भविष्यातील क्रयशक्तीचा अदमास होय. केलेली गुंतवणूक ही महागाईनंतर किती परतावा देते, म्हणजेच क्रयशक्तीत किती वाढ करते, हे पाहणे होय. महागाई वाढीचा दर जर जास्त टक्के आहे आणि बँकेतील ठेवीवर सात टक्के दराने परतावा मिळणार असेल, तर वर्षभरापूर्वी गुंतविलेले १०० रूपये हे १०७ रुपये झाले. त्यामुळे क्रयशक्तीतील वाढ ही शुन्यच ठरते. गुंतवणुकीवर या महागाईचा परिणाम मोजण्याचे सत्तरचा नियम हा एक ठोकताळा आहे. विशेषत: निवृत्तीनंतर नियोजनासाठी हा एक उपयुक्त निकष आहे; परंतु महागाईचा दर स्थिर न राहता सतत बदलत असतो.

सत्तरला प्रचलित महागाई दराने भागल्यास येणारी संख्या ही आपल्याजवळील रकमेची क्रयशक्ती तितक्या वर्षात अर्ध्यावर येईल, असे दर्शविते. उदा., प्रचलित महागाई दर सात टक्के गृहित धरल्यास, ७० ÷ ७  = १०. त्यामुळे आजच्या १०० रूपयांचे क्रयमूल्य हे १० वर्षांनंतर ५० वर येईल.

११४ चा नियम : गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांच तिप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. हा नियम बहात्तरच्या नियमाप्रमाणेच आहे. गुंतवणूक केलेली रक्कम किती वर्षांत तिप्पट होईल, याचे उत्तर मिळविण्याकरिता ११४ या संख्येस गुंतवणुकीवरील व्याजदराने भागल्यास जी संख्या येते, तेवढी वर्षे गुंतवणूक रक्कम तिप्पट होण्यास लागतात. उदा., बँकेतील ठेव योजनेमध्ये दहा हजार रूपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी द. सा. द. शे. नऊ टक्के व्याज देत असेल, तर ११४ या संख्येला ९ या संख्येने भागल्यास १२.६६ हे उत्तर येते. म्हणजेच दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे बहात्तरच्या नियमानुसार तिप्पट रक्कम म्हणजे तीस हजार रुपये होण्याकरिता १२.६६ वर्षे एवढा कालावधी लागेल.

१४४ चा नियम : गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत चौप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. हा नियमसुद्धा बहात्तरच्या नियमाप्रमाणेच आहे. गुंतवणूक केलेली रक्कम किती वर्षांत चौप्पट होईल, याचे उत्तर मिळविण्याकरिता १४४ या संख्येस गुंतवणुकीवरील व्याजदराने भागल्यास जी संख्या येते, तेवढी वर्षे गुंतवणूक रक्कम तिप्पट होण्यास लागतात. उदा., बँकेतील ठेव योजनेमध्ये दहा हजार रुपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी द. सा. द. शे. नऊ टक्के व्याज देत असेल, तर १४४ या संख्येला ९ या संख्येने भागल्यास १६ हे उत्तर येते. म्हणजेच दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे बहात्तरच्या नियमानुसार चौप्पट रक्कम म्हणजे चाळीस हजार रुपये होण्याकरिता १६ वर्षे एवढा कालावधी लागेल.

समीक्षक : अनिल पडोशी