व्याजदर मुदतीच्या संरचनेस उत्पन्न अथवा लाभ वक्र असेसुद्धा संबोधले जाते. यामध्ये अल्प मुदतीकडून दीर्घ मुदतीमध्ये समान गुणवत्ता असलेल्या रोख्यांचे (बाँड्स) उत्पन्न आकृतीद्वारे दर्शविण्यात येते. व्याजदर मुदतीची संरचना ही वेगवेगळ्या मुदतीसाठी चालू परिस्थितीत रोख्यांवर देऊ केलेले विविध लाभ अथवा उत्पन्न दर्शविते. त्यामुळे गुंतवणूकदारास अल्प, मध्यम व दीर्घ मुदतींच्या रोख्यांवरील देऊ केलेल्या लाभांची तुलना तत्परतेने करता येते.

प्रकार : व्याजदर मुदतीची संरचना प्रामुख्याने तीन प्राथमिक आकाराची असते.

(१) सकारात्मक अथवा सामान्य उत्पन्न वक्र : जर रोख्यांचे अल्प मुदतीचे लाभ अथवा उत्पन्न दीर्घ मुदतीच्या उत्पन्नापेक्षा कमी असतील, तर वक्र वरच्या दिशेने झुकलेला असतो आणि त्यास सकारात्मक अथवा सामान्य उत्पन्न वक्र असे म्हटले जाते. हा वक्र खालील आकृतीत दर्शविण्यात आला आहे.

 

(२) नकारात्मक अथवा उलट उत्पन्न वक्र : जर रोख्यांचे अल्प मुदतीचे लाभ अथवा उत्पन्न दीर्घ मुदतीच्या उत्पन्नापेक्षा अधिक असेल, तर वक्र खालच्या दिशेने झुकलेला असतो आणि त्यास नकारात्मक किंवा उलट (इन्व्हरटेड) उत्पन्न वक्र असे म्हटले जाते. १९९० मध्ये अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठाचे प्राध्यापककॅम्पबेल हार्वे यांनी उलट उत्पन्न वक्राचा शोध मांडला. हा वक्र पुढील आकृतीद्वारे दर्शविला आहे.

(३) स्थिर अथवा समांतर उत्पन्न वक्र : अंतिमत: जेव्हा रोख्यांचे अल्प व दीर्घ मुदतीच्या लाभ दरात थोडी तफावत असते अथवा अजिबात नसते, तेव्हा व्याजदराची स्थिर अथवा समांतर मुदतीची संरचना असते. या संरचनेचा वक्र खालील आकृतीद्वारे दर्शविला आहे.

या वक्रामध्ये फक्त समान जोखीम असणारे रोखे उत्पन्न वक्रावर दर्शविणे महत्त्वाचे असते. अधिक सामान्य प्रकारचे उत्पन्न वक्र कोषागार रोख्यांची रचना निर्माण करतात; कारण ते जोखीममुक्त समजले जातात.

उत्पन्न वक्राचा आकार कालानुरूप बदलत असतो. जो गुंतवणूकदार व्याजदर मुदतीची संरचना भविष्यात कशाप्रकारे बदलू शकते, याचा अंदाज करू शकतो आणि त्या आधारे गुंतवणूक करू शकतो, तो रोख्यांच्या किमतीतील बदलांचा फायदा घेतो.

सामान्यत: व्याजदर मुदतीची संरचना वक्र हा सकारात्मक असतो. हा दीर्घ मुदतीकरिता वाढलेली जोखीम पत्करून अधिक परताव्याच्या दराची गुंतवणूकदाराची आकांक्षा प्रगट करतो. अनेक अर्थतज्ज्ञ असे मानतात की, चढता सकारात्मक वक्र म्हणजे गुंतवणूक भविष्यातील सक्षम आर्थिक वृद्धी, त्याच बरोबर तेजी (अधिक व्याजदर) अपेक्षित करतात; तर उतरता (उलटा) वक्र म्हणजे गुंतवणूकदार भविष्यातील मंद आर्थिक वृद्धी, त्याच बरोबर कमी प्रमाणातील तेजी (कमी व्याजदर) करतात. स्थिर अथवा समांतर वक्र सर्वसाधारणपणे असे दर्शवितो की, गुंतवणूकदार भविष्यातील आर्थिक वृद्धी व तेजी यांबाबत शाश्वत नाही.

सर्वसाधारणपणे व्याजदर मुदतीची संरचना ही भविष्यातील व्याजदरांची दर्शक असते, जी अर्थव्यवस्थेचा विस्तार किंवा आकुंचन याचीसुद्धा दर्शक असते. यासंदर्भात उत्पन्न वक्र आणि त्या वक्रांमधील बदल मोठ्या प्रमाणात माहिती प्रदान करतात.

सिद्धांत किंवा गृहीतकृत्ये : (१) अपेक्षा गृहीतकृत्य (एक्स्पेक्टेशन थिअरी) : अपेक्षा गृहीतकृत्यामध्ये अल्प मुदतीत व्याजदर वृद्धीची अपेक्षा सामान्य वक्राची निर्मिती करते.

(२) रोखता पसंती गृहीतकृत्य (लिक्विडिटी प्रिफरन्स हायपोथेसिस) : रोखता पसंती गृहीत त्यामध्ये गुंतवणूकदार अल्प मुदतीच्या ऋणाकरिता नेहमी अधिक रोखतेस पसंती देतो. त्यामुळे सामान्य वक्राचे कोणतेही विचलन (डिव्हिअन्स) फक्त तात्पुरत्या गोष्टी किंवा घटना सिद्ध करते. या गृहीत कृत्याच्या संदर्भात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी आपला प्रसिद्ध व्याजाचा रोखता पसंती सिद्धांत मांडला आहे.

(३) विभागीय बाजार गृहीतकृत्य (सिग्मेंटेड मार्केट हायपोथेसिस) : विभागीय बाजार गृहीतकृत्यामध्ये वेगवेगळे गुंतवणूकदार ठराविक मुदतीच्या विभागास (मॅच्युरिटी सिग्मेंट्स) दुजोरा देतात. म्हणजेच, व्याजदर मुदतीची संरचना ही प्रचलित गुंतवणूक धोरणाचे प्रतिबिंब (परावर्तीत प्रतिमा) असते.

व्याजदर मुदतीची संरचना ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘फेडरल रिझर्व्ह’ आणि इतरही अनेक वित्तीय संस्थांकडून मोजली जाते व प्रकाशित केली जाते.

समीक्षक : अनिल पडोशी