हेमिमॉर्फाइट हे जस्ताचे पांढरे, रंगहीन, फिकट हिरवे, निळे वा पिवळे खनिज असून जस्ताचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. याची स्फटिक संरचना कॅलॅमाइन प्रमाणे असून यांना विद्युत् कॅलॅमाइन वा गॅल्मेई असेही म्हणतात. स्फटिक समचतुर्भुजी प्रसूच्याकार; स्फटिक बहुधा वडीसारखे व गटाने आढळतात. ते एका बाजूने टोकदार तर दुसर्‍या बाजुने बोथट असतात. शिवाय ते द्राक्ष घडासारखे, स्तनाकार, झुंबराकार, संपुंजित व कणमय रूपांतही आढळते. पाटन (110) स्पष्ट; कठिनता ४.५ –५; विशिष्ट गुरुत्व ३.४-३.५; चमक काचेसारखी; रंग पांढरा, काही बाबतींत फिकट निळसर वा हिरवट छटा, शिवाय पिवळा ते उदी; भंजन उपशंखाभ; पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी; तीव्रपणे उत्ताप विद्युतीय. रासायनिक संघटन Zn4(Si2O7) (OH)2.H2O. हे जस्ताचे सजल सिलिकेट (जस्त ६७.५%) असून त्यात अल्प प्रमाणात ॲल्युमिनियम व लोह असू शकतात. ते बंद नळीत तापविल्यास त्यातून पाणी मिळते. त्याच्या स्फटिकांचे समूह वैशिष्ट्यपूर्ण असल्याने स्मिथसोनाइटहून वेगळे ओळखता येते.

हेमिमॉर्फाइट हे द्वितीयक (नंतरच्या प्रक्रियांनी बनलेले) खनिज असून जस्ताच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत म्हणजेच जामिनीलगतच्या वरच्या भागात आढळते. स्मिथसोनाइट, स्फॅलेराइट, सेर्‍युसाइट, अँग्लिसाइट व गॅलेना यांच्याबरोबर तसेच लोहाची टोपी असणार्‍या भागात आढळणारे हे खनिज आहे. बेल्जियम, जर्मनी, रूमानिया, सार्डिनिया, कंबरलँड, इंग्लंड, अल्जीरिया, मेक्सिको व अमेरिका येथे ते आढळते. जस्ताचे धातुक म्हणून त्याचा उपयोग होतो. यांच्या खड्यांचा वापर फार पूर्वीपासून शारीरिक व मानसिक आरोग्यदायी म्हणून केला जातो. त्याच्या स्फटिकांच्या अर्धाकृती (हेमिमॉर्फिक) वैशिष्ट्यावरून त्याला हेमिमॉर्फाइट हे नाव दिले.

संदर्भ :

  • https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=10171966

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर