सत्यनारायण, विश्वनाथ : (६ ऑक्टोबर १८९५ – १८ ऑक्टोबर १९७६). सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक. ते ओजस्वी आणि शास्त्रीय दृष्टीने संपन्न असे कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक आणि निबंध लेखक आहेत. त्यांनी तेलगु साहित्यात आपले असे एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे. त्यांचा जन्म नन्दनूर, जिल्हा कृष्णा, आंध्रप्रदेश इथे झाला होता. आईवडिलांकडून त्यांना वारसाहक्काने केवळ ईश्वरभक्ती मिळाली. लहानपणी त्यांना नन्दनूरपासून ४० मैल दूरवर असलेल्या मछलीपट्टनम या गावी एका इंग्रजी शाळेत घातले होते. त्या शाळेत प्रसिद्ध तेलुगू कवी चेल्लपिल्ल वेंकटशास्त्री हे तेलुगूविषयाचे शिक्षक होते. त्यांच्या प्रेरणेनेच विश्वनाथ सत्यनारायण यांनी साहित्यक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. हायस्कूलमध्ये शिकत असतानाच विश्वनाथ सत्यनारायण यांनी तेलुगू, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व संपादन करून तेलुगू आणि संस्कृतमध्ये काव्य लेखनही केले होते. १९१९ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. मछलीपट्टनम् नॅशनल कॉलेजमध्ये तेलुगू भाषेचे अध्यापन ( १९२०-२६), मग गुंटूर डिग्री कॉलेजमध्ये अध्यापन केले. पुढे त्यांनी प्राध्यापकी केली. पण स्वतंत्र वृत्तीमुळे ते स्वतःला नोकरीच्या बंधनात बांधून घेऊ शकले नाहीत. त्यांची नोकरी काही काळातच सुटली आणि त्याच काळात त्यांच्या पत्नीचाही स्वर्गवास झाला होता.
विश्वनाथ सत्यनारायण यांच्या १०० पेक्षा जास्त साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यात ६० कादंबऱ्या, २० काव्यसंग्रह, ४ गीतिकाव्य, १३ नाटके, ७ समीक्षाग्रंथ यांचा समावेश आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमध्ये सौंदर्य, प्रेम आणि भक्तीचा संगम झालेला दिसतो. तारुण्यात पदार्पण करताच गिरीशकुमार यांची प्रेमगीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. आणि पुढे जाऊन शृंगारवीथि हा त्यांच्या काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला होता. पण विश्वनाथ सत्यनारायण यांचे प्रेम वासनेने कलुषित नव्हते. तर धार्मिक भावनेने ओतप्रोत भरलेले होते. प्रेम आणि भक्ती या दोन्ही भावनांनी त्यांची कविता ओतप्रोत होती.
नोकरी सुटल्यानंतरच्या काळात रामायण कल्पवृक्षमु या महाकाव्याचे बीज त्यांच्या मनांत रुजले होते. त्यांचे वडील त्यांना म्हणाले होते की, जगात सगळ्यात सुंदर आणि रोचक कहाणी भगवान रामाचीच आहे. बाकी कथा ह्या अन्नवस्त्राच्या कथा आहेत. जीवनातील रिक्त क्षणी रामकथेला काव्यरूप देण्याचा विचार विश्वनाथ यांच्या मनांत आला. जन्मजन्मांतरीचे संस्कार आणि जन्मजात वेदना बरोबर घेवून रामायण कल्पवृक्षमुची रचना करायला त्यांनी सुरुवात केली. ती रचना करायला त्यांना ३० वर्ष लागली. १९७० मध्ये भारतीय ज्ञानपीठद्वारा पुरस्कृत त्यांची ही रचना वाल्मिकी रामायणाप्रमाणे एक गंभीर, प्रौढ अशी रचना आहे. केवळ आशयाच्या दृष्टीनेच नव्हे, तर महानतेच्या दृष्टीनेही त्यांची रचना मूळ काव्याजवळ पोहोचते. कल्पवृक्षमुचे कथानक ६ खंडात विभागलेले आहे. उत्तरखंड त्यात नाही. रामायणात जी नावे आहेत ती नावे त्याना इतर कांडांना (विभागांना) दिली आहेत. त्यांनी प्रत्येक विभागाचे ५ भागात विभाजन केले आहे. उदाहरणार्थ बालकांडात इष्टी, अवतार, अहल्या, धनु आणि कल्याण या शीर्षकाचे ६ उपविभाग आढळतात. या प्रकारे अयोध्याकांड देखील ५ उपविभागात विभागलेले आहे. अभिषेक, प्रस्थान, मुनिशाप, पादुका आणि अनुसया हे ते पाच विभाग आहेत. अरण्यकांडात दशवर्ण, पंचवटी, मारीच, जटायू, आणि शबरी असे पाच उपविभाग आहेत. किष्किंधाकांडात पहिला खंड नुपूर आहे. सुग्रीव जेंव्हा सीतेची आभूषणे रामास दाखवतो, तेंव्हा रामाच्या डोळ्यात अश्रू उभे रहातात. त्यामुळे राम ती आभूषणे ओळखू शकत नाही. म्हणून ती आभूषणे बघून लक्ष्मणाने त्याची ओळख पटवावी असे सांगितले जाते. यावर लक्ष्मण म्हणतो, ‘ मी कानांतील, गळ्यातील आभूषणांबाबत काही जाणत नाही. कारण मी ती कधी पाहिलेलीच नाहीत. पण नुपूर (पायातील आभूषण) मी ओळखू शकतो. कारण दररोज पदस्पर्श करताना मी ती पाहिलेली आहेत. लक्ष्मणाच्या मनांतील पवित्र भावना प्रगट करणारा हा प्रसंग खूपच सुंदर आहे. यालाच कवीने नुपूरखंड असे म्हटले आहे. सगळ्यात सुंदर विश्लेषण कवीने सुंदरकांडात केले आहे. यात पूर्वरात्र, पररात्र, उषा, दिवा, आणि संध्या या नावांचे पाच खंड आहेत. ही पाचही नावे दिवसातील ५ प्रहारांची आहेत. यात संपूर्ण दिवसभरात घडणारे कथानक आहे. सुंदरकांडातील सर्वात प्रसंग त्रिजटेच्या स्वप्नांचा आहे. त्यात दर्शन, रहस्य आणि आनंद यांचे लोकोत्तर संमिश्रण आहे. युद्धकांडाची सुरवात संशयापासून होते. कुंभकर्ण आणि इंद्रजीत खंडात रामाच्या विजयाचे बिजारोपण केले जाते. संशय नि:संशायात बदलतो. शेवटचा खंड उपसंहरण हा आहे. त्यात रावणाचा संहार आणि रामाचा राज्याभिषेक समारंभ याचे अत्यंत मनोहर वर्णन आहे. या प्रकारे ६ कांडातील ३० खंडात आणि जवळजवळ ५० हजार ओळींमध्ये निबद्ध रामायण कल्पवृक्षमु ही आधुनिक तेलुगू साहित्यातील विशालकाय अशी कालातीत रचना आहे.
त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. वेयिपंगुल (कादंबरी) साठी त्यांना आंध्र विश्वविद्यालय पुरस्कार (१९३८, हिंदी अनुवाद सहस्त्रफणा या शीर्षकाने भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी केला), महाकाव्य श्री रामायण कल्पवृक्षमु या महाकाव्यासाठी त्याना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार (१९७१), मध्यक्करलु या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, तेलुगू साहित्य समाजाचा कवीसम्राट सन्मान, साहित्य अकादमी फेलोशीप, पद्मभूषण (१९७१) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश होतो. विधानसभेचे सदस्यत्वही त्यांनी भूषवले आहे.
संदर्भ :
- https://www.poemhunter.com/viswanatha-satyanarayana/biography/
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.