भिजकी वही : सुप्रसिद्ध मराठी कवी अरुण कोलटकरांचा भिजकी वही हा कवितासंग्रह २००३ मध्ये प्रास प्रकाशनाकडून प्रकाशित झाला. एकूण ३९३ पृष्ठांचा हा संग्रह असून त्यामध्ये पंचवीस कवितांचा समावेश आहे. या संग्रहातील ‘डोहाळगाणं’, ‘पो-च्यु-ई’,‘किकांळी’,‘दृष्टमध’,‘शेवटचा अश्रू’ या पाच कविता वगळता इतर वीस कविता या मालाकविता आहेत. एका कवितेच्या शीर्षकाखाली चार ते पाच कवितांपासून बारा कवितापर्यंत अशा उपकवितांचा समावेश झालेला दिसतो. या उपकवितांमध्ये परस्पर असे एक जैविक नाते असलेले दिसते. कोलटकरांच्या यापूर्वीच्या कवितांपेक्षा या संग्रहातील कवितांचे स्वरूप खूपसे वेगळे आहे. आशयाच्या अंगाने विचार करता त्या वेगळया आहेतच पण रूपबंधाच्या दृष्टीने त्या दीर्घ आहेत.
या कविता संग्रहातील कविता एकूणच विश्वाला कवेत घेऊन मानवजातीविषयी भाष्य करु पाहत आहे. या संग्रहातील कविता वेगवेगळया काळात घडून गेलेल्या घटनांचे कथन करतात. त्या कथनात्म स्वरुपाच्या आहेत. या घटना ग्रीकांच्या इसवीसनापूर्वी घडलेल्या आहेत. काही ऋग्वेदातील आहेत तर काही येशू ख्रिस्ताच्या जीवनचरित्राशी निगडित आहेत. रशियातील स्टॅलिनशाही, व्हिएतनामचे युद्ध,महाभारतातील खांडवनाचे दहन, त्यामुळे घडलेले सर्पसत्र या साऱ्या घटनांचे कथन या कवितेत आहे. प्रसंगी यामधील अनेक कथांची पुननिर्मिती केली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या ऐवजी दास्य द्वेष,विषमता, सूड यांना खतपाणी घालणारी व्यवस्था काम चोख बजावते, याचे चित्रण या कवितांमधून येते. इतिहासात घडून गेलेल्या घटनांचे कथन इथे समकालीन संदर्भात केलेले दिसते. या पुनर्मांडणीत वर्तमानाचा जिवंत धागा या सर्व रचनामध्ये असल्याचे जाणवते. यातील काही कवितांची दृष्य मांडणीचा वाचकांवर परिणामकारक प्रभाव पडतो.
कोलटकरांच्या कवितांमध्ये अतिवास्तववादी प्रतिमा मोठया प्रमाणात आहेत. दोन भिन्न काळ व अवकाश एकत्र करुन त्यांच्या कवितेत प्रतिमांची निर्मिती झालेली आहे. आंबेमोहोर, अश्रूंची खीर, तादंळाच्या अश्रूंवर कोरलेली रामायणं, अश्रूनां छिद्र पाहून बनवलेला माळा आणि यासारख्या अनेक प्रतिमांमधून कोलटकर आशयाला अधिक टोकदार करतात. या संग्रहातील कवितामधून येणाऱ्या प्रतिमा या रुढ व वैशिष्टयपूर्ण अशा आहेत. त्यांच्यामधून व्यक्त होणाऱ्या संवेदनकृतीच भावनिक वैचारिक अर्थ एकत्र आणले असता त्यामधून व्यक्त होणारा तिसरा अर्थ हा अतिशय गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते. ‘संग झाल्यावीण गुहा झाली बांळतीण’ या ओळीत ‘गुहा’ हा एकमेव वस्तुवाचक आहे. पण त्याद्वारे याठिकाणी निर्माण झालेली संवेदनाकृती मात्र अमूर्त आहे. मातेच्या गर्भाशयाची प्रतिमा गुहेद्वारे याठिकाणी डोळयासमोर उभी राहते. कोलटकर शब्दांतील संवेदनाद्वारे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष त्या घटनेचे दृश्यरुपच उभे करतात. एखाद्या प्रतिमेतून थेट व्यक्त होणारा अर्थ आणि त्याच्याशी संबधित निर्माण होणारा संलग्न अर्थ याद्वारे कवी वाचकासमोर एक अमूर्त उभे करताना दिसतो. अशा स्वरुपाच्या प्रतिमा या कवितेत खूप ठिकाणी येताना दिसतात. कोलटकरांच्या या संग्रहातील कवितांचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे यामध्ये येणाऱ्या स्त्रीप्रतिमा हे आहे. त्यांच्या इतर सर्व संग्रहामध्ये आलेल्या स्त्रीप्रतिमापेक्षा त्या वेगळया आहेत. त्या पुराणकथात्मक साहित्यातून ज्या प्रकारे येतात त्याचप्रकारे आधुनिक जीवनातील वेगवेगळया घटना प्रसंगामधून येताना दिसतात. ग्रीक कथेतील विपाशा असेल किंवा विसाव्या शतकातील मैमून असेल किंवा वेदकाळातील अपाला असेल, कोलटकर स्त्रीप्रतिमेचा एक सर्जक आविष्कार कवितांमूधन करतात. कवी विश्वात्मक अशा आदि स्त्रीला नवनिर्मितीसाठी आवाहन करतो आहे. याठिकाणी येणाऱ्या पुराणकथात्मक प्रतिमांमधील स्त्रीप्रतिमा या आदि स्त्री प्रतिमेची विविध काळातील रूपे आहेत. उदा. प्रेमानुभवाचे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या शोकात्म अवस्थेचे लैला ही स्त्रीप्रतिमा, भविष्याचे ज्ञान असणारी, गर्भाशयच नाकारणारी हाडम्मा या आणि अशा अनेक स्त्री प्रतिमांद्वारे स्त्रीच्या दुःखी, शोषित रूपाचे आविष्करण झाले आहे. याबरोबरच स्त्रीच्या सत्त्वाचा, तिच्या ठायी असलेल्या सर्जनशीलतेचा ठाव घेतला आहे. पुराणकथेमध्ये तिच्या वाटयाला अन्यायाचे, अपमानाचे दुःख वर्तमानात अधिक धारधार होताना दिसते. कोलटकरांच्या कवितेत येणाऱ्या विरोधी प्रतिमांची संख्या इंग्रजी, उर्दू, पारषी भाषेतील संदर्भ सहजगत्या वाचकाचे लक्ष वेधून घेते. गतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण ठेवून त्या नोंद करत, काही ठिकाणी त्यातील पुराव्यांची नोंद करत घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ सांगत कोलटकर घडून गेलेली घटना परत एकदा सांगतात आणि वाचकाला खिळवून ठेवतात. फक्त या घटनाच तपशील ते सांगत नाहीत तर त्यामुळ माणसामाणसामधील संघर्ष,द्वेषभाव याची विविध रूपे ते वाचकासमोर मांडतात. सर्पसत्रसारख्या कवितेतून द्वेषावर आधारित सामुहिक स्मृती कशा प्रबळ ठरतात याचे उत्तम उदाहरण दिसते.
या संग्रहातील कवितांच्या रूपबंधाचे एक महत्वाचे वैशिष्टय म्हणजे यामधील कथनात्मकता हे होय. यातील कवितेमध्ये एकच कथनकर्ता अस्तित्त्वात नाही. कधी कधी कवी स्वतः एखाद्या घटनेचे कथन करतो तर कधी यामधील वेगवेगळया व्यक्तिरेखा कथनकर्त्याच्या जागी येताना दिसतात. कोलटकरांच्या कवितेचा रुपबंध हा वैविध्यपूर्ण आहे.
संदर्भ : मूळग्रंथ